जनसंघर्षाचे वादळ भाजपाची सत्ता उलथवून लावेल- खा. मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 09:35 PM2018-08-29T21:35:23+5:302018-08-29T21:35:42+5:30

 देशात दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींवर अत्याचार करणा-यांना सरकार संरक्षण देत आहे.

The storm of Jan Sanghsh prevailed with BJP's rule- eat Mallikarjun Kharge | जनसंघर्षाचे वादळ भाजपाची सत्ता उलथवून लावेल- खा. मल्लिकार्जुन खर्गे

जनसंघर्षाचे वादळ भाजपाची सत्ता उलथवून लावेल- खा. मल्लिकार्जुन खर्गे

Next

मुंबई - देशात दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींवर अत्याचार करणा-यांना सरकार संरक्षण देत आहे. त्यामुळेच अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या अत्याचारी व हुकुमशाही सरकारविरोधात जनसंघर्षाचे वादळ सुरु झाले असून हे वादळ भाजपची सत्ता उधळवून लावेल, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून सरकार सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात समाजसुधारकांच्या हत्या करणारे मोकाट आहेत. सरकारी यंत्रणेकडून पुरोगामी विचारांच्या लोकांच्या मानवी हक्कांचे हनन सुरू आहे. सरकारविरोधात बोलणा-यांवर दडपशाही केली जाते आहे. त्यांना नक्षलवादी, राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी विचारधारेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. काँग्रेस पक्षाने देशात जातीयवाद, धर्मांधता पसरवणा-या या विचारधारेचा नेहमीच विरोध केला आहे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष तिरंग्याला राष्ट्रध्वज मानले नाही, ते आज आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवण्याचा प्रयत्न करित आहेत असा टोला खर्गे यांनी लगावला.

नरेंद्र मोदी ना खाऊंगा ना खाने दूंगा अशी थाप मारून सत्तेवर आले पण मोदींच्या सत्ताकाळात बँकांचे घोटाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या घोटाळेबाजांना सरकारचे संरक्षण आहे असे दिसते आहे. राफेल विमान खरेदी, गुजरात स्टेट गॅस कॉर्पोरेशन मधील हजारो कोटींचा घोटाळा असो, मॉब लिंचिंगच्या घटना असो वा दलित अत्याचारांच्या घटना असो जाहीर सभांमधून लांबलचक भाषणे देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयांवर संसदेत बोलत नाहीत असे खर्गे म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक व विश्वासघात केला आहे. शेतकरी, कष्टकरी, दलित अल्पसंख्यांक, महिला, विद्यार्थी असे सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत. मराठा, मुस्लीम, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करित आहेत. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. राज्यातील जनतेच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आयोजित केली असून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरातून अंबाबाईचा आशिर्वाद घेऊन 31 ऑगस्ट रोजी या जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ होईल. 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात लोकांशी संवाद साधून सरकारच्या जनविरोधी धोरणांचा पर्दाफाश करेल. पुणे शहरात 8 सप्टेंबर रोजी विशाल जाहीर सभेने जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या जनविरोधी धोरणांबाबत जनजागृती करण्यात येणार असून काँग्रेस पक्षाची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवली जातील. या जनसंघर्ष यात्रेत राज्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी श्रीमती सोनल पटेल, आशिष दुआ, संपत कुमार, वामशी रेड्डी, बी. एम. संदीप, खा. हुसेन दलवाई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, राजू वाघमारे उपस्थित होते.

Web Title: The storm of Jan Sanghsh prevailed with BJP's rule- eat Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.