सशक्त माणुसकीच्या दिशेने टाकलेले पाऊल - प्रवीण दवणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 08:39 PM2017-12-08T20:39:41+5:302017-12-08T20:40:15+5:30

निसर्गामुळे मिळालेल्या लैंगिकतेचा अहंकार बाळगून एका विशिष्ट घटकाला दुर्लक्षित ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही. परंतु, दुर्दैवाने समाजात असे घडताना दिसते तो समाजच ख-या अर्थाने झापडे लावून जगत असतो.

Steps towards Strong Humanity - Praveen Dave | सशक्त माणुसकीच्या दिशेने टाकलेले पाऊल - प्रवीण दवणे

सशक्त माणुसकीच्या दिशेने टाकलेले पाऊल - प्रवीण दवणे

Next

मुंबई : निसर्गामुळे मिळालेल्या लैंगिकतेचा अहंकार बाळगून एका विशिष्ट घटकाला दुर्लक्षित ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही. परंतु, दुर्दैवाने समाजात असे घडताना दिसते तो समाजच ख-या अर्थाने झापडे लावून जगत असतो. या पुस्तकातून ही झापडं दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून किन्नरांकडे दयेच्या नजरेने न पाहता ‘माणूस’ म्हणून पाहण्याची नवी दृष्टी याद्वारे मिळते. हे पुस्तक म्हणजे सशक्त माणुसकीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी केले.
व.पु.काळे यांच्या कन्या असलेल्या स्वाती चांदोरकर लिखित 'हिज डे' या त्यांच्या ९ व्या कादंबरीचे प्रकाशन तृतीयपंथीयांच्या हस्ते प्रकाशन गुरुवारी अंधेरी येथे पार पडले. याप्रसंगी, कवी प्रवीण दवणे, अभिनेते प्रदीप वेलणकर ,चंद्रकांत मेहंदळे, प्रमोद पवार, माधवी बांदेकर आणि प्रमुख अतिथी म्हणून ट्रान्सजेंडर संजीवनी माधुरी शर्मा, विक्रम शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी, दवणे म्हणाले की, या कादंबरीत समाजातील ट्रान्स जेंडर घटकाच्या वेदना, क्लेश, समस्या यावर आधारित असून त्यात वास्तव आणि काल्पनिकतेची अत्यंत खोल गुंफण आहे. या प्रकाशन सोहळ्यात तृतीयपंथीयांच्या समस्या प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकण्याची संधी मिळाली. यात तृतीयपंथीयांचे भावविश्व , त्यांची घराणी, रितीरिवाज, परंपरा उलगडण्यात आल्या.
प्रकाशनानंतर मनोगत व्यक्त करताना लेखिका स्वाती चांदोरकर म्हणाल्या की, तृतीयपंथीयांविषयी आजपर्यंत लिखाण झालेले नाही असे नाही. लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते, परंतु भीतीही असते म्हणून लोक त्यांना टाळतात. त्यामुळे आधुनिक जगात ते समाजापासून दुरावलेले आहेत. मला त्यांच्या समस्या जाणून घेण्याची इच्छा होती तसेच त्यांच्या समाजाकडून असलेल्या मागण्या लोकांपर्यंत पोहोचवणे मला गरजेचे वाटले. याचसाठी जे जे काही त्यांच्याकडून मला समजले ते मी या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक कादंबरी म्हणून सर्व प्रसंग जरी काल्पनिक असले त्याला सत्याची साथ आहे हे निश्चितच. त्यांना चांगले आयुष्य हवे आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचे आणि चांगल्या आयुष्यासाठी त्यांचे एक मागणे आहे, ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या’ मी त्यांचे हेच मागणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 

समाज नक्की स्विकारेल
- माधुरी शर्मा, ‘डान्सिंग क्वीन’ समूहाच्या संस्थापक सदस्या
हा प्रकाशन सोहळा सुरु असताना प्रकाश ते माधुरी होईपर्यंतचा प्रवास डोळ््यांसमोरुन गेला. लहानपणी कायमच चुकीच्या शरीरात कैद असल्याची भावनाम मनात येत असे. त्यानंतर मोठे झाल्यावर आपण चुकीच्या समाजातही अडकल्याची जाणीव झाली. मात्र त्यावेळी बरेच अडथळे, अपयश आणि धक्के सहन केलेत. या सर्व अनुभवामुळेच इथे समोर येऊन बोलू शकण्याची हिंमत आली आहे. हळुहळू का होईना, गेल्या काही वर्षांत समाजात बदल होताना दिसताहेत त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत समाज आम्हाला नक्की स्विकारेल ही सकारात्मकता बाळगून आहे.

पुस्तकामुळे घालमेल होते
- प्रदीप वेलणकर, ज्येष्ठ अभिनेते
आपल्याला अंदाज लागत नाही, इतका या पुस्तकाचा आवाका आहे. या पुस्तकातील पात्रांचा जन्म, विस्तार आणि मृत्यू सर्व गोष्टी आपल्याला वेगळ््या विश्वात नेतात. पुस्तक वाचताना मनात प्रचंड घालमेल होते, त्यामुळे हा अनुभव आपल्याला सहजासहजी न पचणारा आहे. एकूणच, मराठी साहित्य विश्वात या पुस्तकाचे स्थान वरचे आहे. 

हा हूँ मैं किन्नर -
या प्रसंगी, माधुरी शर्मा यांनी रायपूरच्या रविना यांची किन्नरांविषयी लिहिलेली कविता वाचून दाखविली, या काव्य वाचनाला रसिकांनी मनापासून दाद दिली. ‘हा हूँ मैं किन्नर... मैं ना भिकारी हूँ , ना फरिश्ता हूँ, मैं इन्सान हूँ...’ अशा या कवितेच्या ओळींनी सर्वांचेच मन जिंकले.

आम्हाला स्विकारा एवढचं मागणं-
 आम्ही ‘तो’ किंवा ‘ती’ यांपेक्षा वेगळं असणे हा गुन्हा नाही. त्यामुळे या पुस्तक प्रकाशनच्या निमित्ताने समाजाकडे एकच मागणे आहे, असे पाणावलेल्या डोळ््यांनी म्हणत समुपदेशक असलेल्या ट्रान्सजेंडर संजीवनी चव्हाण हिने सांगितले की, तुमच्या घरांत किंवा समाजात तृतीयपंथी म्हणून जन्माला आला तर त्याचा स्विकार करा. आम्ही जे सोसेलं, ते त्यांच्या वाटेला येऊ नये हीच इच्छा आहे.

Web Title: Steps towards Strong Humanity - Praveen Dave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई