STचे अर्थचक्र पुन्हा हमरस्त्यावर; सवलतींमुळे मिळाली उभारी, १२०० कोटीचा महसूल प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 06:23 AM2023-12-30T06:23:30+5:302023-12-30T06:23:53+5:30

येत्या महिनाभरात प्रवाशांना फोन पे, गुगल पे, युपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा कोणत्याही स्वरूपामध्ये पैसे देऊन तिकीट काढणे शक्य होणार आहे.

st economic cycle is back on track and revenue boosted due to concessions | STचे अर्थचक्र पुन्हा हमरस्त्यावर; सवलतींमुळे मिळाली उभारी, १२०० कोटीचा महसूल प्राप्त

STचे अर्थचक्र पुन्हा हमरस्त्यावर; सवलतींमुळे मिळाली उभारी, १२०० कोटीचा महसूल प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरोना आणि कर्मचाऱ्यांचा दीर्घकाळ चाललेला संप यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) रुतलेले चाक यंदाच्या वर्षात प्रगतीच्या हमरस्त्यावर आले. महिला सन्मान योजनेने एसटीला मोठा आधार दिला. या योजनेमुळे महिलावर्गाची एसटी प्रवासाला पसंती मिळून गेल्या आठ-नऊ महिन्यांत महामंडळाला १२०० कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. 

एसटी महामंडळमार्फत १७ मार्च, २०२३ पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिला प्रवाशांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, सध्या दररोज सुमारे १८-२० लाख महिला या सवलतीचा फायदा घेत आहे.

ई-शिवनेरीतून प्रवास 

ई-शिवनेरी ही विद्युत ऊर्जेवर चालणारी पर्यावरणपूरक, अत्याधुनिक, वातानुकूलित बस आहे. १ मे, २०२३ रोजी  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई पुणे आणि ठाणे पुणे या मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसेस प्रवाशांना स्वच्छ, प्रसन्न आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा आनंद देत आहेत. 

प्रवाशांना स्वच्छ, टापटीप आणि सुशोभित बसस्थानके, त्याचा परिसर व बसस्थानकावरील स्वच्छतागृहे देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ०१ मे २०२३ पासून राज्यभरात “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबविले जात आहे. परंतु दोन सर्वेक्षणात अद्यापही अनेक बसस्थानके अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे.

एसटीतल्या सर्व वाहकांना नवे अँड्रॉइड तिकीट मशीन मिळाले असून येत्या महिनाभरात त्याद्वारे प्रवाशांना फोन पे, गुगल पे, युपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा कोणत्याही स्वरूपामध्ये पैसे देऊन तिकीट काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये सुट्या पैशावरून होणारे वाद पूर्णतः संपुष्टात येतील. तसेच खिशात रोख रक्कम न घेता कॅशलेस प्रवास करण्याची संधी प्रत्येकाला मिळणार आहे. 

Web Title: st economic cycle is back on track and revenue boosted due to concessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.