सोहराबुद्दीन चकमक प्रकरण : न्यायाधीशांच्या मृत्यूची चौकशी करा, उच्च न्यायालयात याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:16 AM2018-01-09T00:16:56+5:302018-01-09T00:17:03+5:30

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाच्या खटल्याची २०१४ मध्ये सुनावणी घेणा-या न्यायाधीशांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

Sohrabuddin encounter case: Investigate the death of judges, plea in High Court | सोहराबुद्दीन चकमक प्रकरण : न्यायाधीशांच्या मृत्यूची चौकशी करा, उच्च न्यायालयात याचिका दाखल

सोहराबुद्दीन चकमक प्रकरण : न्यायाधीशांच्या मृत्यूची चौकशी करा, उच्च न्यायालयात याचिका दाखल

googlenewsNext

मुंबई : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाच्या खटल्याची २०१४ मध्ये सुनावणी घेणा-या न्यायाधीशांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. न्या. बी. एच. लोया यांच्या संशयास्पद झालेल्या मृत्यूची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने करावी, अशी विनंती बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने याचिकेत केली आहे.
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी ४८ वर्षीय न्या. लोया यांच्यापुढे होती. या खटल्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुख्य आरोपी होते, तर गुजरात व राजस्थानचे वरिष्ठ आयपीएस अधिकारीही यामध्ये सहआरोपी होते. मात्र, २०१४ मध्ये न्या. लोया यांचा नागपूरमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. ते एका लग्नाला उपस्थिती लावण्यासाठी नागपूरला गेले होते. आता या सर्व आरोपींची विशेष न्यायालयाने आरोपमुक्तता केली आहे.
एका प्रसिद्ध नियतकालिकासाठी मुलाखत देताना न्या. लोया यांच्या कुटुंबीयांनी लोया यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे म्हटले. यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तांचा आधार घेत बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे.
न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी काहीही विधान केलेले नाही. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे, असे बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्या एका सदस्याने सांगितले.
न्या. लोया यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना एका लहान रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी ते स्वत: रुग्णालयाचे पायºया चढले. त्यांच्याबरोबर काही न्यायाधीशही होते. रुग्णालयाकडे पुरेशी साधनसामग्री नसल्याने त्यांनी लोया यांना अन्य मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, मोठ्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. लोया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना दिली नाही. तसेच त्यांच्या शवविच्छेदन अहवालावरही एका अज्ञात व्यक्तीने सही केली. त्याशिवाय लोया यांच्या शर्टावर रक्ताचे डागही होते. त्यांचा मोबाइलही त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला नाही. लोया यांच्या मृत्यूनंतर तीन ते चार दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांना मोबाइल देण्यात आला. मात्र, त्यातील कॉल रेकॉर्ड व काही मेसेज डिलिट केले होते, असा दावा लोया यांची बहीण अनुराधा बियानी यांनी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

सर्व परिस्थिती संशयास्पद
विशेष न्यायालयाने अमित शहा व सहआरोपींची आरोपमुक्तता केल्यानंतर सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन उच्च न्यायालयात अपिलात गेला. मात्र, त्याने तो अपील मागेही घेतला. न्या. लोया यांचा मृत्यू, रुबाबुद्दीनचे अपील मागे घेणे, ही सर्व परिस्थिती संशयास्पद आहे. त्यामुळे न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील आयोगापुढेच व्हावी, अशी विनंती असोसिएशनने याचिकेत केली आहे.

Web Title: Sohrabuddin encounter case: Investigate the death of judges, plea in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.