सोहराबुद्दीन खटला; निकालांमध्ये शंकास्थळे, हायकोर्टाने दखल घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:16 AM2018-02-15T01:16:16+5:302018-02-15T01:16:22+5:30

गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्यात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने काही आरोपींच्या जामीन अर्जांवर आणि काही आरोपींना आरोपमुक्त करताना दिलेल्या निकालांमध्ये अनेक विसंगती आहेत. तसेच हे निकाल शंका उपस्थित करणारे आहेत, असे मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. अभय ठिपसे यांनी म्हटले आहे.

 Sohrabuddin case; Inquiries, the High Court should take cognizance | सोहराबुद्दीन खटला; निकालांमध्ये शंकास्थळे, हायकोर्टाने दखल घ्यावी

सोहराबुद्दीन खटला; निकालांमध्ये शंकास्थळे, हायकोर्टाने दखल घ्यावी

Next

मुंबई : गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्यात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने काही आरोपींच्या जामीन अर्जांवर आणि काही आरोपींना आरोपमुक्त करताना दिलेल्या निकालांमध्ये अनेक विसंगती आहेत. तसेच हे निकाल शंका उपस्थित करणारे आहेत, असे मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. अभय ठिपसे यांनी म्हटले आहे.
हे निकाल पाहता या खटल्यात न्यायव्वस्था न्याय करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसते. त्यामुळे उच्च न्यायालयाने, कोणी अपील केले नाही तरी, प्रसंगी विशेष अधिकार वापरून या निकालांचा फेरविचार करायला हवा, असे मतही न्या. ठिपसे यांनी व्यक्त केले.
या खटल्यातील निकालांवर सटीप भाष्य करणारी न्या. ठिपसे यांची मुलाखत बुधवारी सकाळी एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर दिवसभर न्या. ठिपसे यांनी अनेक वृत्तवाहिन्यांनांही त्याच धाटणीच्या मुलाखती दिल्या. त्यानंतर ‘लोकमत’ने न्या. ठिपसे यांच्याशी संपर्क साधला असता व्यक्त केलेल्या मतांवर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. जो खटला अजूनही सुरु आहे त्यात सध्या पदावर असलेल्या न्यायाधीशाने दिलेल्या निकालांवर एखाद्या निवृत्त न्यायाधीशाने गुणात्मक भाष्य करावे, असे सहसा घडत नाही. शिवाय हाच खटला पूर्वी चालविणारे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या कथित संशयास्पद मृत्यूचा वाद सध्या सुरु असल्याने आणि भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही याच खटल्यात एकेकाळी आरोपी राहिलेले असल्याने न्या. ठिपसे यांच्या या मुलाखतीने न्यायवर्तुळात खळबळ उडाली.
न्या. ठिपसे यांनी सांगितले की, याच खटल्यातील चार आरोपींच्या जामीन अर्जांवर उच्च न्यायालयात मी निकाल दिले होते. आता न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूचा वाद नव्याने सुरु झाल्यावर उत्सुकता म्हणून मी सोहराबुद्दीन खटल्यातील विशेष न्यायालयाच्या निकालांचा चिकित्सक अभ्यास केला. त्यात मला असे दिसले की, पुरावे तेच असूनही काही आरोपींना जामीन देण्यात आला किंवा आरोपमुक्त केले गेले तर इतरांना वेगळा न्याय लावला गेला. ज्या आरोपींना सकृद्दर्शनी पुरावे असल्याचे नमूद करून आधी कित्येक वर्षे जामीन नाकारला गेला त्यांना नंतर पुरावे नसल्याचे कारण देत आरोपमुक्त केले गेले. साक्षीदार उलटणे हेही मला संशयास्पद वाटते.

लोयांचा मृत्यू अनैसर्गिक नाही
न्या. ठिपसे म्हणाले की, न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूविषयी मला भाष्य करायचे नाही. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक होता हे म्हणणे मला पटत नाही. लोया यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासले जावे, असे वाटते. न्या. ठिपसे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सोहराबुद्दीन खटला गुजरातमधून महाराष्ट्रात वर्ग केला तेव्हा खटल्यासाठी नेमलेला न्याायधीश शेवटपर्यंत बदलू नये, असे स्पष्ट आदेश दिले होते. तरीही न्यायाधीश का बदलले गेले, याची चौकशी व्हायला हवी. लोया यांना नेमण्याआधी न्यायाधीश जे. टी. उत्पात यांची बदली केली गेली. या बदल्या व नेमणुकांच्या वेळा व त्यामागची कारणे, याचा शोध घेतला जावा, असे मला वाटते.

Web Title:  Sohrabuddin case; Inquiries, the High Court should take cognizance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.