‘सोशल मीडियाच्या अफवाही भाववाढ घडविण्यास कारणीभूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 02:46 AM2017-09-02T02:46:42+5:302017-09-02T02:46:51+5:30

सोशल मीडियावरील एखादा मेसेजही भाववाढीला कारणीभूत ठरतो. मध्यंतरी अशाच एका मेसेजमुळे उत्तर प्रदेशात मिठाचे दर तीनशेवर गेले होते. अशा वातावरणात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणे

'Social media rumors cause inflationary pressures' | ‘सोशल मीडियाच्या अफवाही भाववाढ घडविण्यास कारणीभूत’

‘सोशल मीडियाच्या अफवाही भाववाढ घडविण्यास कारणीभूत’

Next

मुंबई : सोशल मीडियावरील एखादा मेसेजही भाववाढीला कारणीभूत ठरतो. मध्यंतरी अशाच एका मेसेजमुळे उत्तर प्रदेशात मिठाचे दर तीनशेवर गेले होते. अशा वातावरणात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणे आव्हानात्मक बनल्याचे मत देशाचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री सी.आर. चौधरी यांनी व्यक्त केले. देशातील पहिल्याच साखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
साखर उद्योगासमोरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी साखर कारखानदार, व्यापारी, वाहतूकदार आदी घटकांच्या तीन दिवसीय परिषदेचे शुक्रवारी राज्यमंत्री सी.आर. चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी माजी मंत्री आणि वारणा उद्योग समूहाचे विनय कोरे यांच्यासह साखर उद्योगाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. साखर उद्योग हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा उद्योग असल्याचे सांगून चौधरी म्हणाले की, सुमारे साडेपाच कोटी लोक या उद्योगाशी निगडित आहेत. त्यामुळे या क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. साखरेच्या दरातील चढ-उतारामुळे उत्पादकांनासुद्धा योग्य किंमत मिळत नाही. ऊस उत्पादक शेतकºयांच्या मानसिकतेचाही विचार करावा लागणार आहे. उसातून फायदा होत नसल्याचे दिसताच शेतकरी तेलबिया किंवा डाळींसारख्या उत्पादनांकडे वळतो. त्यामुळे साखर उत्पादनावरील खर्च कमीत कमी ठेवण्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा, असे चौधरी यांनी सांगितले. साखर उद्योग मात्र कटकटींचा बनला असल्याचे विनय कोरे म्हणाले. सर्व बाजूंनी साखर उद्योगावर दबाव असतो. डाळींची किंमत दोनशेवर गेली तरी चालते, परंतु साखर मात्र ३०-४० रुपये किलोच मिळायला हवी, अशी आपली भूमिका असते. ऊस उत्पादक शेतकरी, त्यांच्या संघटना व त्या माध्यमातून चालणारे राजकारणही महत्त्वाचे बनून जाते. साखरेबाबत उलटसुलट भूमिकाच शासनस्तरावर घेतली जाते. अल्पकालीन धोरणे आखून वेळ मारून नेण्याची सवय सोडावी लागेल. साखरेबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता असल्याचे विनय कोरे म्हणाले.

Web Title: 'Social media rumors cause inflationary pressures'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.