सोशल मीडिया, पक्ष संघटनेवर सारी भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 06:45 AM2018-06-24T06:45:51+5:302018-06-24T06:45:54+5:30

मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या बहुचर्चित निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी थांबला.

Social media, party organization trust all | सोशल मीडिया, पक्ष संघटनेवर सारी भिस्त

सोशल मीडिया, पक्ष संघटनेवर सारी भिस्त

Next

गौरीशंकर घाळे
मुंबई : मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या बहुचर्चित निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी थांबला. नियमानुसार औपचारिक प्रचाराचा कालावधी संपला असला, तरी फॉरवर्डेड मेसेज आणि सोशल मीडियातून विरोधकांना लक्ष्य करण्याचा नवा फंडा या निवडणुकीच्या निमित्ताने रूढ झाला. नोंदणी केलेल्या जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे मोठे आव्हान या निवडणुकीतील उमेदवारांसमोर आहे.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघासह कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेने विद्यमान आमदार आणि मंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कापून विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली, तर भाजपाने अमितकुमार मेहता यांना मैदानात उतरवले आहे. याशिवाय, लोकभारती, बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवारांसह अन्य आठ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार, राजू बंडगर या अपक्ष उमेदवारांमुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भलतीच चुरशीची बनली आहे. १९८८ पासून पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचा कब्जा आहे. त्यापैकी २००० पासून दीपक सावंत यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. अमितकुमार मेहता यांच्या रूपाने भाजपाने दिलेला तुल्यबळ उमेदवार, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे कामाला लागलेली भाजपाची पक्ष संघटना या कारणामुळे शिवसेनेसमोर आपला गड राखण्याचे आव्हान असेल. त्यातच दीपक पवार यांच्यासारख्या अपक्ष उमेदवारांमुळे पदवीधर मतदारसंघातील पारंपारिक गणिते बिघडण्याची शक्यता आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार कपिल पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, भाजपापुरस्कृत अनिल देशमुख, बहुजन मुक्तीचे शेख मोहम्मद यांच्यासह अन्य सहा अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे. कपिल पाटील सलग दोनवेळा या मतदारसंघातून विधान परिषदेत पोहोचले होते. सलग बारा वर्षांच्या आमदारकीमुळे निर्माण झालेली ‘अँटी इन्कम्बन्सी’, भाजपाने विशेषत: शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लावलेला जोर आणि पक्ष संघटनेच्या जोरावर मतदान फिरविण्याच्या पवित्र्यात असलेली शिवसेना यामुळे कपिल पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. केवळ अडीच हजार मतदारांच्या भरवशावर कपिल पाटील बारा वर्षे आमदार राहिले. त्यांच्या अडीच हजार मतांचे गणित बिघडविण्याची खेळी विरोधकांनी आखली आहे. कपिल पाटील यांनी शिवसेना व विरोधकांकडून पैशाचे वाटप होत असल्याचा आरोप केला आहे. तर, पाटील यांनी शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा अन्य विषयात अधिक रस घेतल्याचा विरोधकांचा दावा आहे. त्यासाठी पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या मुद्दयांची जंत्रीच विरोधकांकडून मतदारापर्यंत पोहोचवली जात आहे. शिवाय, शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिक्षकाकडेच असावे, अशी भूमिका हिरीरीने मांडली जात आहे.

विजयाचे आव्हान
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रितसर नोंदणी आवश्यक असते. मुंबईत लाखो पदवीधर असले, तरी नोंदणी मात्र काही हजारांचीच असते. कमी नोंदणी, अनेक उमेदवार आणि मतदानासाठी पसंतीक्रमाची पद्धत यामुळे विजयाचे गणित जुळविण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. हक्काचा मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी पक्ष संघटना प्रभावीपणे राबविण्यावर शिवसेना, भाजपाने लक्ष्य केंद्रीत केले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी पसंतीक्रमाचा योग्य वापर करण्याची रणनीती आखण्यात येत आहे. त्यासाठी या निवडणुकीचा अनुभव असणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांकडे सूत्रे सोपविण्यात आली आहेत.
अशी आहे स्थिती
मुंबई शिक्षक मतदारसंघ : मतदार-१०,०४१, उमेदवार - १०
मुंबई पदवीधर मतदारसंघ : मतदार-७०,६३६, उमेदवार - १२
कोकण पदवीधर मतदारसंघ : मतदार-१,०४,२६४, उमेदवार - १४
नाशिक शिक्षक मतदारसंघ : मतदार-५३,८९२, उमेदवार - १६

मुंबईत केवळ सोमवारी ड्राय डे
मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपुष्टात आला. या निवडणुकीच्या मतदानादिवशी सोमवारी दिवसभर मुंबई शहर व मुंबई उपनगरमध्ये केवळ एक दिवस मद्यविक्रीसाठी कोरडा दिवस (ड्राय डे) घोषित करण्यात आला आहे.

मुंबईत विधान परिषद निवडणुकीचे केवळ मतदान असून मतमोजणी नवी मुंबईत होणार आहे. त्यामुळे मुंबईत केवळ एक दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला असून मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान होईपर्यंत हा ड्राय डे लागू राहील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई शहरचे अधीक्षक अनिल चासकर व उपनगरचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ जून ते २५ जून दरम्यान व मतमोजणीच्या दिवशी २८ जून रोजी ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे येथील अधीक्षक एन.जी. घुले यांनी हे आदेश दिले आहेत. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन निवडणुकांची मतमोजणी नेरूळ येथील सेक्टर २४ मधील आगरी कोळी संस्कृती भवन येथे होणार आहे.

Web Title: Social media, party organization trust all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.