झोपडपट्ट्या बोगस डॉक्टरांच्या विळख्यात

By Admin | Published: July 3, 2015 02:28 AM2015-07-03T02:28:03+5:302015-07-03T02:28:03+5:30

गोरगरीब रुग्णांची फसवणुक रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिकेच्या अनुभवी डॉक्टरांना सोबत घेऊन बोगस डॉक्टरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

The slum is known by bogus doctors | झोपडपट्ट्या बोगस डॉक्टरांच्या विळख्यात

झोपडपट्ट्या बोगस डॉक्टरांच्या विळख्यात

googlenewsNext

मनीषा म्हात्रे, मुंबई
गोरगरीब रुग्णांची फसवणुक रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिकेच्या अनुभवी डॉक्टरांना सोबत घेऊन बोगस डॉक्टरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या वर्षी सहा महिन्यांत आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ३९ तोतया डॉक्टरांना गजाआड केले आहे. या सर्वच तोतया डॉक्टरांनी दाट वस्तीच्या झोपडपट्ट्यांमध्ये आपली दुकाने थाटली होती,
मानखुर्द, शिवाजीनगर, साकीनाका, विक्रोळी पार्कसाइट, दहिसर, शिवडी, जुहू, कुरार, दिंडोशी या परिसरात झालेल्या कारवाईतून हे वास्तव समोर आले. त्यातही गोवंडीचे शिवाजी नगर, विक्रोळी पार्कसाइट आणि शिवडी परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.
२०१२ ते २०१४ मध्ये बोगस डॉक्टरांवरील कारवाई कासवगतीने सुरू होती. या तीन वर्षांत अवघ्या १६ बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. या वर्षी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळत खिसे भरणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम उघडली. अवघ्या सहाच महिन्यांत त्यांच्या गळाला ३५ बोगस डॉक्टर लागले. तर उर्वरित चार डॉक्टर स्थानिक पोलिसांनी पकडले. यात बोरीवली, कस्तुरबा, एमएचबी आणि आरे पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
पालिकेच्या आरोग्य खात्यातील डॉक्टरांना हाताशी धरून ही कारवाई सुरू आहे. पूर्वी आर्थिक गुन्हे शाखा स्वतंत्रपणे ही कारवाई करत होती. बोगस डॉक्टरांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या शाखेने पालिकेशी समन्वय साधून विशेष मोहीम राबवली. त्यानुसार साहाय्यक पोलीस आयुक्त रमेश खकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र मोहिते, साहाय्यक निरीक्षक संजय खेडकर यांचे तपास पथक तयार करण्यात आले आहे.

मुंबईतील झोपडपट्टी परिसराला बोगस डॉक्टरांचा विळखा पडलेला दिसून आला. येथील अशिक्षित आणि गरीब रुग्णांना गंडा घालणे सहज शक्य असल्याने या बोगस डॉक्टरांचा धंदा सुरू राहतो. महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांची डिग्री पाहण्याऐवजी गरीब रुग्ण दवाखान्यावर ‘डॉक्टर’ असा बोर्ड पाहून उपचारासाठी येतात. त्यामुळे गरीब रुग्णांना गंडा घालणे बोगस डॉक्टरांना शक्य होते.


पालिकेच्या यादीत
९५ बोगस डॉक्टर
पालिकेने मुंबईत ९५ बोगस डॉक्टरांची यादी आर्थिक गुन्हे शाखेला दिली. पैकी ३० बोगस डॉक्टर कार्यरत होते. दरम्यान, या धाडींमध्ये बोगस डॉक्टरांव्यतिरिक्त काही ठिकाणी क्लिनिकला टाळे आढळून आले. झोपडपट्ट्यांमध्ये वाढते बोगस डॉक्टरांचे जाळे लक्षात घेता, ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यासाठी बोगस डॉक्टर सेल कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कारवाईचे स्वरूप
कलम ४१९ - फसवणुकीसाठी शिक्षेचे कलम
एखाद्याची फसवणूक केल्यास आरोपीला या कलमांतर्गत ३ वर्षांची शिक्षा व दंडाची तरतूद
कलम ४२० - फसवणूक महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्टमधील ३३, ३६ कलमान्वये गुन्हा दाखल होतो.

बोगस डॉक्टरांविरोधात चार वर्षांत झालेली कारवाई
वर्षगुन्हेअटक
२०१२ ४ ४
२०१३ ५ ५
२०१४ ७ ७
२०१५ ३४ ३५
(२०१५ची आकडेवारी ३० जूनपर्यंतची)

Web Title: The slum is known by bogus doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.