उत्तम आरोग्यासाठी खाद्यसंस्कृतीत बदल करायलाच हवा- सुनीत जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:44 AM2017-12-03T01:44:31+5:302017-12-03T01:44:55+5:30

गेल्या दोन-तीन वर्षांपासून भारतीय शरीरसौष्ठवचा चेहरा बनलेल्या मराठमोळ्या सुनीत जाधवने नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देत, शरीरसौष्ठव खेळ आणि त्याचे देशातील भविष्य यावर चर्चा केली.

Should change the foodstuff for better health - Suneet Jadhav | उत्तम आरोग्यासाठी खाद्यसंस्कृतीत बदल करायलाच हवा- सुनीत जाधव

उत्तम आरोग्यासाठी खाद्यसंस्कृतीत बदल करायलाच हवा- सुनीत जाधव

Next

गेल्या दोन-तीन वर्षांपासून भारतीय शरीरसौष्ठवचा चेहरा बनलेल्या मराठमोळ्या सुनीत जाधवने नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देत, शरीरसौष्ठव खेळ आणि त्याचे देशातील भविष्य यावर चर्चा केली. शिवाय, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये सामान्य व्यक्तीला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यातूनच अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. तंदुरुस्ती आजच्या काळाची गरज बनली असताना, नेमके याच गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच सर्वसामान्य वर्गाला किमान पौष्टिक आहार घेऊन आपले आरोग्य चांगले राखावे, असा सल्लाही सुनीतने या वेळी दिला. दोन वेळचा ‘भारत श्री’ आणि चार वेळा ‘महाराष्ट्र श्री’ सुनीत जाधवसोबत ‘लोकमत’चे रोहित नाईक यांनी केलेली बातचीत....

अलीकडे गल्लोगल्ली जीम उभे राहिले असून, लोकांमध्ये खूप क्रेझ निर्माण झाली आहे. याबद्दल काय सांगाल?
ही क्रेझ नसून हे अनिवार्य होणार आहे. कारण आजची जीवनशैली खूप धावपळीची असल्याने, लोकांना निरोगी आरोग्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आज अनेक आजारही बळावले आहेत. भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू नयेत, यासाठी आतापासूनच तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे. यामुळे आपण डॉक्टरकडेही जाणे टाळू शकतो. पूर्वीची जीवनशैली आतापेक्षा खूप कमी धावपळीची होती. त्या वेळी घरच्यांना अधिक वेळ दिला जायचा, आहार चांगला असायचा, पण आता लोकांना जेवायलाच वेळ नसल्याने अवेळी खाणे होते. नोकरीची वेळ अनिश्चित असते. वेगवेगळ्या शिफ्टमुळे शरीरात खूप बदल होतात. त्यामुळे तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. आज लोकांना चालायला वेळ नाही, तर व्यायाम कुठे करणार?

शरीरसौष्ठव क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी आहेत का?
नक्कीच. आज प्रत्येक ठिकाणी जीम तयार झाल्याने टेÑनर्स म्हणून चांगला रोजगार निर्माण झाला आहे. ज्यांना सुरुवातीपासून वैयक्तिक टेÑनर ठेवायचा असतो, ते मोठी किंमत मोजून टेÑनर ठेवतात. यातून त्या टेÑनरला चांगले उत्पन्न मिळते, शिवाय एका वेगळ्या क्षेत्रात स्वत:चे नाव चमकविण्याची संधीही मिळते.

आज देशामध्ये शरीरसौष्ठव खेळाची काय स्थिती आहे?
या खेळाने खूप प्रगती केली असून, खेळाडूंना खूप चांगले दिवस आले आहेत. आज अनेक स्पर्धा प्रायोजकांसह होत असल्याने खेळाडूंना आर्थिक फायदाही होतो. त्यामुळेच आर्थिक पाठिंबा मिळत असल्याने, खेळाडूंना अधिक आवड निर्माण झाली आहे. या आधी रोख पारितोषिके कमी प्रमाणात असल्याने खेळाडूंपुढे अनेक समस्या होत्या, पण आज निदान मुंबई-महाराष्ट्रामध्ये या खेळाचे चित्र बदलत आहे. रोख रकमेमुळे महाराष्ट्राचे खेळाडू इतरांच्या तुलनेत चांगले स्थिरावू शकले आहेत. शिवाय बहुतेक खेळाडू आज टेÑनर म्हणून काम करतात. अनेक मोठ्या व्यक्तींसाठी वैयक्तिक टेÑनर म्हणूनही काम करत आहेत.

नवोदितांना काय सल्ला देशील?
प्रत्येक खेळाला आर्थिक पाठिंबा लागतोच. शरीरसौष्ठव शारीरिक वजनावर अवलंबून आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास ५५ किलो वजनी गटातील खेळाडूच्या महिन्याचा खर्च ३०-४० हजार रुपयांच्या आसपास असतो. जसे वजन वाढते, त्याप्रमाणे प्रोटीन घ्यावे लागतात. १०० किलो वजनी माणसाला मासिक ८० हजार रुपये खर्च आहे. त्यामुळे हा खेळ खर्चिक आहे. सर्वसामान्य घरातीलच मुले आज या खेळामध्ये आहेत. त्यामुळे नवोदितांनी पुढे जाण्यासाठी कठोर मेहनत घ्यावीच, त्याशिवाय संयमही बाळगावा.

राष्ट्रीय संघटना ‘आयबीबीएफ’च्या कामगिरीबाबत काय?
पूर्वी या खेळात खूप संघटना होत्या. त्यामुळे खेळाडूही विभागले गेले. कोणती स्पर्धा खेळायची, कोणती संघटना मान्यताप्राप्त आहे, याबाबत खेळाडूंमध्ये कायम गोंधळ असायचा, पण आता ‘आयबीबीएफ’ला मान्यता मिळाल्याने सर्व खेळाडू एकत्र आले. संघटनेचे सचिव चेतन पाठारे यांनी सर्व संघटनांना एकत्र आणण्यास खूप प्रयत्न केले. सर्व संघटना एकत्र आल्याने खेळाला आणि खेळाडूंना फायदा होईल, अशी त्यांना कल्पना होती. तिन्ही संघटना एकत्र आल्याने खेळाची प्रगती होत आहे.

बॉलीवूड कलाकार अनेकदा शरीरसौष्ठवपटूंची मदत घेतात. ती मदत नेमकी कशी असते?
बॉलीवूड कलाकारांना आपल्या क्षेत्रात खूप तंदुरुस्त आणि एका विशिष्ट शरीरयष्टीमध्ये राहावे लागते. त्यासाठी अनेकदा ते शरीरसौष्ठवपटूंना वैयक्तिक मार्गदर्शन (पीटी) म्हणून ठेवतात. अनेकदा विशेष भूमिकेनुसार कलाकारांना वजन घटवावे किंवा वाढवावे लागते. यासाठीही त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे बॉलीवूड कलाकार अशा वेळी आवर्जून आमची मदत घेतात. यातून आम्हालाही एक नवी संधी मिळते.

‘भारत श्री’पर्यंतचा प्रवास कसा असतो?
कोणी ‘भारत श्री’ व्हायचे ठरविले, तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकते, पण त्यासाठी खूप मेहनत आणि जिद्द लागते. महत्त्वाचे म्हणजे संयम ठेवावा लागतो. एका वर्षात भारत श्री बनता येत नाही. तुम्ही लवकरही यशस्वी होऊ शकता किंवा त्याला १० वर्षांहून अधिक वेळही लागू शकतो. मी १२ वर्षांपासून खेळतोय आणि सलग दोन वेळा बाजी मारली, पण २००६ पासून राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यास सुरू केल्यानंतर, मला उच्च दर्जाच्या शरीरसौष्ठवपटूंना पहिल्यांदा जवळून पाहता आले. त्यांची तयारी, त्यांची मेहनत, जिद्द कोणत्या पातळीची असते, हे कळाले. मी त्या दृष्टीने स्वत:ला तयार केले. यानंतर मागे वळून पाहिले नाही. माझे ध्येय गाठण्यासाठी चिकाटी कधीच सोडली नाही.

डोपिंग चाचणी कशा प्रकारे होते?
खेळांमध्ये ड्रग्ज घेणे हे उघड सत्य आहे. शरीरसौष्ठवसाठी ड्रग्ज घेणे जरुरी असते, पण ते मर्यादेत घ्यावे. जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जायचे असेल तर हे गरजेचे आहे, पण नियमाप्रमाणे ते घेतले गेले पाहिजे. कारण मानवी शरीराच्या काही मर्यादा असतात, त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. प्रत्येक क्रीडामध्ये डोपिंग असते, तशीच शरीरसौष्ठवमध्येही असते. त्यामुळे काही काळाकरिता आम्हाला ड्रग्ज घेणे बंद करावे लागतात. जेणेकरून त्याचे अंश शरीरातून निघून जातात आणि स्पर्धेदरम्यान जेव्हा चाचणी होते, तेव्हा आम्ही कोणत्याही अडथळ्याविना प्रदर्शन करतो. आम्ही जरी ड्रग्ज घेत असलो, तरी ते ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे किंवा मर्यादेत घेतो आणि ते या खेळासाठी जरुरी आहेत.

दोन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या मि. वर्ल्ड स्पर्धेत पदार्पणात कांस्य पटकावल्यानंतर, तुझ्याकडून अपेक्षा खूप वाढल्या. यापुढे काय योजना आहेत?
मुंबईत झालेली स्पर्धा आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी होती. कारण आमचा प्रवासाचा खर्च वाचला होता. त्यामुळे सहजपणे सहभागी होता आले. सध्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा मंगोलिया, रशिया, थायलंड अशा बाहेरच्या देशात होत असल्याने परदेशातील खर्च आम्हाला वैयक्तिकरीत्या परवडत नाही. यासाठी जर एखादा प्रायोजक मिळाला, तर खूप चांगले होईल. कारण हाच खर्च जर आम्ही आमच्या शरीरावर केला, तर कामगिरी आणखी उंचावेल. त्यामुळे गेली २ वर्षे मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलो नाही, पण या वर्षी मी नक्की बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवाय यंदा मि. आशिया स्पर्धा गोव्यात होणार असल्याचे ऐकून आहे. त्यामुळे ही स्पर्धाही भारतीयासांठी सुवर्णसंधी असणार.

सलग चार ‘महाराष्ट्र श्री’ पटकावल्यानंतर, आता सहा जेतेपदे पटकावण्याचा विक्रम तुला खुणावत आहे? काय सांगशील...
सलग सहा ‘महाराष्ट्र श्री’ बनण्याचा विक्रम सुहास खामकर सरांनी रचला आहे. ते माझ्यासाठी आयडियल आहेत. मला त्यांच्यासारखेच बनायचे आहे. किंबहुना, त्यांनी जे काही मिळविले आहे, त्याहून पुढे मला जायला आवडेल. त्यांचा विक्रम मोडायचा म्हणून मी प्रयत्न करणार नाही, पण मला माझ्या स्वत:चा विक्रम रचायचा आहे.

मध्येच सराव सोडणे कितपत गंभीर ठरू शकते?
या खेळात मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलेच येतात. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी सक्षम नसते की, दरवर्षी सातत्याने स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यामुळे अनेक जण अर्धवटपणे शरीरसौष्ठव सोडतात, हे चुकीचे आहे. सातत्य ठेवणे गरजेचे आहे. यासाठी अर्ध वेळ काम करायला पाहिजे. आर्थिक बळाशिवाय काहीच शक्य होणार नाही.

सध्याचा सर्वसामान्य आहार तंदुरुस्तीसाठी योग्य आहे का?
नाही, भारतीय आहार परदेशी लोकांच्या तुलनेत खूप साधा असतो. आपल्या खाण्यात सकाळी प्रोटीन मिळणार नाहीत. सकाळी आपण चहासोबत बिस्कीट घेणार किंवा जास्तीतजास्त चपाती-भाजी खाणार. यामध्ये कार्बोहायडेÑड आणि शुगरचे प्रमाण जास्त असते. तेच परदेशामध्ये सकाळी मांसाहार केला जातो. परदेशी जीवनशैलीमध्ये सकाळचा आहार हाय प्रोटीन आणि कार्बोहायडेÑडयुक्त असतो. पूर्ण दिवस ऊर्जा टिकावी लागते. यानंतर, ते दिवसभरात खाणे हळूहळू कमी करत, ते रात्रीच्या वेळी प्रोटीन आणि फायबर्स घेतात. शरीराची मांडणी खराब होऊ नये, हा त्याचा उद्देश असतो. याउलट आपल्याकडे आहे. त्यामुळे भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये प्रोटीन व फायबरवर जास्त लक्ष दिले गेले पाहिजे. शिवाय सध्या अनेक जण आॅफिसमध्ये बसूनच काम करतात. त्याचाही शरीरावर विपरीत परिणाम होतो. या दृष्टीनेही विचार केला गेला पाहिजे. यासाठी सकाळच्या वातावरणात किमान ३ किमी चालायलाच पाहिजे.

सरकारकडून काय अपेक्षा आहेत?
भारताला आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देणाºया खेळाडूंकडे सरकारकडून दुर्लक्ष होता कामा नये. शरीरसौष्ठवपटूची खूप मोठी मेहनत असते. त्यातून तो देशाचे नाव उंचावतो. यासाठी आम्हाला क्रीडा कोटातून नोकरी मिळावी. मी स्वत: पदवीधर असून, माझ्या अर्जावर सरकारकडून नकारात्मक शेरा मिळाला. तो का मिळाला, हे अद्यापही मला समजलेले नाही. तरीही अजून प्रयत्न सुरू आहे. पुन्हा संधी मिळाली, तर मुख्यमंत्र्यांकडे नक्कीच शिफारस करेल. बघू या काय होतेय. महाराष्ट्राच्या नावाजलेल्या खेळाडूंना सरकारने नोकरी द्यावी. मी १२ वर्षांपासून या खेळात आहे, पण माझे वरिष्ठ खेळाडू अजूनही नोकरीपासून वंचित आहेत. त्यांची गुणवत्ता वाया जाऊ नये, यासाठी सरकारने प्रयत्न करावा.

 

Web Title: Should change the foodstuff for better health - Suneet Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.