अक्षय चोरगे 
मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील सर्वात जास्त गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक म्हणजे वडाळा रोड रेल्वे स्थानक. या स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामानाने पूल अरुंद आहे. स्थानकाबाहेर जाण्यासाठी स्थानकावर एक्झिट गेटवर धक्काबुक्की ही रोजचीच ठरलेली आहे. त्यामुळे अनेकदा रेल्वे पोलिसांना गर्दीचे व्यवस्थापन करावे लागते. गळके पत्रे, गर्दुल्ले यांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
वडाळा रेल्वे स्थानकावरील उत्तरेकडील पुलाचा सर्वांत जास्त वापर केला जातो. सकाळी व सायंकाळी या पुलावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते, असे प्रवाशांनी सांगितले, तसेच रेल्वेस्थानकाच्या मध्यभागी नवीन पूल बांधण्यात आला आहे, परंतु त्या पुलावरून फलाट क्रमांक २/३ वर उतरण्यासाठी जिना बांधलेला नसून, हा पूल फक्त फलाट क्रमांक १ आणि फलाट क्रमांक ४ ला जोडतो.
फलाट क्रमांक १ वरील वांद्रे-अंधेरीला जाणाºया लोकलची संख्या कमी आहे. दिवसभरात अनेक वेळा या लोकल रद्द केल्या जातात, त्यामुळे वांद्रे-अंधेरीला जाणाºया लोकांची फलाट क्रमांक १ वर गर्दी होते. याच फलाटावर पनवेल-वाशीकडे जाणाºया लोकल येत असल्यामुळे, या फलाटावर पनवेल-वाशीकडे जाणारे प्रवासीही उभे असतात. फलाट क्रमांक २, ३ आणि ४ वर उतरणारे प्रवासी फलाट क्रमांक १ वर येऊन रेल्वे स्थानकाबाहेर पडतात. त्यामुळे अशा वेळी चेंगराचेंगरी, धक्काबुक्कीसारखे प्रसंग घडतात, तसेच गर्दीचा फायदा घेऊन काही विकृत मनोवृत्तीचे प्रवासी महिलांशी छेडछाड करतात.
रेल्वे स्थानकाच्या बाहेर एक्झिट गेटवर पालिकेच्या हद्दीतील फेरीवाल्यांची डोकेदुखी नित्याचीच झालेली आहे. मागील तीन दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना हटविण्यात आले. तथापि, फेरीवाल्यांनी त्यांचे साहित्य, पेट्या मुंबई पोर्ट ट्रस्टने बांधलेल्या येथील पादचारी पुलावरच ठेवल्या आहेत. त्यामुळे तो पूल चालण्यासाठी अरुंद बनला आहे.
तिकीटघर हवे-
वडाळा रोड स्थानकावर फक्त दोनच तिकीट घरे आहेत. स्थानकाच्या पश्चिमेला असणा-या तिकीटघरासमोर नेहमीच मोठ्या
रांगा लागलेल्या असतात, तर दक्षिणेकडील पुलावर दुसरे तिकीट घर आहे, जेथे फक्त दोनच तिकीट खिडक्या आहेत. यातील एकच खिडकी चालू असते. त्यामुळे पुलावरही लोकांच्या तिकिटासाठी रांगा लागतात, असे प्रवाशांनी सांगितले.
गळके पत्रे त्रासदायक-
फलाट क्रमांग १ आणि ४ वरील पत्रे पावसात गळतात, अशी समस्या प्रवाशांनी मांडली. दोन्ही फलाटांवरील पत्रे अतिशय जुने असून पत्रे तुटलेले आहेत, अनेक ठिकाणी पत्र्यांना छिद्रे पडली असल्याने, पावसाळ्यात फलाटावर अनेकांना छत्री
घेऊनच लोकलची वाट पाहावी लागते.
१० आॅक्टोबरला होती गंभीर स्थिती-
१० आॅक्टोबर २०१७ रोजी अंधेरीला जाणा-या लोकल रद्द करण्यात आल्या. परिणामी, फलाटावर गर्दी झाली. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल फलाट क्रमांक ४ वर आली. त्यानंतर, फलाट क्रमांक १ वर धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. रेल्वे पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळविल्याने दुर्घटना टळल्याचे प्रवाशांनी सांगितले.
सूचना, तक्रारी, व्हिडीओ : ‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ºहास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास ८८४७७४१३०१ या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.
पाठपुराव्यानंतरही प्रशासन ढिम्म : वडाळा स्थानकावरील पादचारी पुलाची नुकतीच पाहणी केली. पुलाची बांधणी खासदार निधीतून केली आहे. वडाळा स्थानकावरील पूल अरुंद आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी फलाट क्रमांक २ व ३ वर जाण्यासाठी पूल गरजेचा आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. - अमेय घोले, नगरसेवक


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.