मुंबईचा गड ठाकरे गट राखणार का? भाजप-शिंदे गट-मनसेचे आव्हान; निवडणुकीत चुरस वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:10 AM2024-03-27T11:10:39+5:302024-03-27T11:11:41+5:30

Mumbai Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाने मुंबईतील चार उमेदवार जाहीर केले असून, यंदाची लोकसभा निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते, अशी चर्चा आहे.

shiv sena thackeray group declared candidates for four mumbai lok sabha election 2024 | मुंबईचा गड ठाकरे गट राखणार का? भाजप-शिंदे गट-मनसेचे आव्हान; निवडणुकीत चुरस वाढणार!

मुंबईचा गड ठाकरे गट राखणार का? भाजप-शिंदे गट-मनसेचे आव्हान; निवडणुकीत चुरस वाढणार!

Mumbai Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबईतील उमेदवार घोषित केले आहेत. ठाकरे गटाची पहिली १७ उमेदवारांची यादी जाहीर झाली असून, मुंबईत ४ जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटासाठी मुंबईची निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते, असा कयास बांधला जात आहे.

ठाकरे गटाने ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर आणि दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी भाजपाने उत्तर मुंबईतून पियूष गोयल आणि उत्तर पूर्व मुंबईतून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटासाठी मुंबईतील निवडणूक सोपी नसेल, अशी चर्चा आहे. 

ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना तिसऱ्यांना उमेदवारी 

दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. २०१४ मध्ये अरविंद सावंत पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर २०१९ मध्ये अरविंद सावंत दुसऱ्यांदा खासदार झाले. या दोन्ही निवडणुका भाजपा आणि शिवसेना युतीत लढवण्यात आल्या होत्या.अरविंद सावंत दोन्हीवेळा निवडून आले, तेव्हा मोदी लाट होती, असे सांगितले जाते. दुसरे म्हणजे, दोन्हीवेळा अरविंद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. पण तेच मिलिंद देवरा आता शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभेचे खासदार झाले आहेत. त्यामुळे अरविंद सावंत यांच्यासाठी ही निवडणूक कठीण जाऊ शकेल, असे म्हटले जात आहे. 

दरम्यान, दक्षिण मुंबईतून भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. मनसे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास ही जागा त्यांना मिळू शकते. ठाकरे गटाने ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संजय दिना पाटील हे माजी खासदार आहेत. २००९ मध्ये किरीट सोमय्या यांना पराभूत करुन ते लोकसभेवर गेले होते. २०१४ मध्ये  लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता. संजय दिना पाटील पहिल्यांदा खासदार झाले, तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ठाकरे गटात आलेल्या संजय दिना पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे.
 

Web Title: shiv sena thackeray group declared candidates for four mumbai lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.