राम सर्वच राज्यांतून हरवला; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 07:54 AM2018-07-10T07:54:11+5:302018-07-10T07:56:58+5:30

रामराज्यावरुन शिवसेनेकडून भाजपाचा समाचार

shiv sena slams bjp and pm narendra modi over ram rajya | राम सर्वच राज्यांतून हरवला; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

राम सर्वच राज्यांतून हरवला; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई: ज्या राममंदिरासाठी अयोध्येत रक्ताच्या नद्या वाहिल्या तो राम सर्वच राज्यांतून हरवला आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. बलात्काराच्या घटना रोखणं प्रभू रामचंद्रांनाही शक्य नसल्याचं विधान उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी केलं. या विधानाचा शिवसेनेकडून समाचार घेण्यात आला आहे.  

'रामावर विसंबून राहू नका, तो अबलांच्या इज्जतीचे रक्षण करू शकत नाही, असे भाजप नेत्यांनी बजावले. मग आता करावे काय? बलात्कार ही विकृतीच आहे, पण म्हणून सर्व रामभरोसे सोडायचे? मग राज्यकर्ते म्हणून मिरवायचे कशाला? हा रामप्रभूंचा अपमान आहे,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपावर शरसंधान साधलं आहे. 'हिंदुस्थानात रामराज्य आणायची भाषा ‘भाजप’ मंडळी करत असतात. हे रामराज्य कसे असेल याचा खुलासा आता झाला आहे. उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर तोडगा काढायचं राहिलं बाजूला, उलट बलात्काराच्या घटना रोखणं प्रभू रामचंद्रांनाही शक्य नसल्याचं भाजपतर्फे जाहीर केलं. उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी तसं उघडपणे सांगितलं आहे. उत्तर प्रदेशात बलात्काराच्या ज्या घटना घडल्या आहेत त्यात भाजपचे आमदार आरोपी आहेत. त्यामुळेच बलात्कार रोखणं प्रभू श्रीरामासही शक्य नाही असं राज्यकर्त्यांना वाटत असावं काय?,' असा सवाल 'सामना'मधून उपस्थित करण्यात आला आहे. 

काँग्रेसच्या काळात बलात्काराच्या घटना घडत होत्या. आताही परिस्थिती सारखीच आहे. मग देशात काय बदल झाला?, असा प्रश्न शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे. 'हिंदुस्थानात मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमताचे राज्य येऊनही रामराज्य निर्माण झालं नाही. अयोध्येतील प्रभू श्रीराम वनवासात आहेत व राममंदिर उभे राहू शकले नाही, ते कधी उभे राहील ते ‘रामराज्य’वाल्यांनाही सांगता येणार नाही. बलात्कार होतच राहतील असे सांगणे म्हणजे राज्य करणे नव्हे. दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड घडलं तेव्हा विरोधात असलेल्या आजच्या सत्ताधार्‍यांची भूमिका वेगळी होती. काँग्रेसचं राज्य आहे म्हणून बलात्कार होत आहेत व काँग्रेस पक्षाची सत्ता जात नाही तोपर्यंत बलात्कार सुरूच राहतील असा त्यांचा दावा होता. निर्भया बलात्कार प्रकरण हा त्यामुळे त्यावेळी निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला गेला. नंतर केंद्रात राज्य बदललं. काँग्रेस पक्ष सत्तेवरून पायउतार झाला. मात्र तरीही बलात्कार थांबले नाहीत व आता प्रभू श्रीरामांची साक्ष याप्रश्नी भाजपवाल्यांनी काढली आहे. बलात्कार रोखणे रामप्रभूंना शक्य नाही याचा दुसरा अर्थ असा होतो की, ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचं नियंत्रण नाही,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाला लक्ष्य केलं आहे. 
 

Web Title: shiv sena slams bjp and pm narendra modi over ram rajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.