Shiv Sena richest regional party aap at second position | धन धना धन! शिवसेना सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष
धन धना धन! शिवसेना सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेसह राज्य आणि केंद्रातील सत्तेत सामील असलेला शिवसेना हा देशातील सर्वात धनाढ्य प्रादेशिक पक्ष ठरला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) आकडेवारीनुसार 2016-17 या आर्थिक वर्षात शिवसेनेला तब्बल 25.65 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. देशभरातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारावर एडीआरनं हा अहवाल तयार केला आहे. 

शिवसेनेनंतर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला 3 हजार 865 देणगीदारांकडून 24.75 कोटी रुपयांची देणग्या मिळाल्या आहेत. सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्षांच्या यादीत पंजाबमधील शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पक्षाला 2016-17 या आर्थिक वर्षात 15.45 कोटी रुपयांची रक्कम देणगी स्वरुपात मिळाली आहे. शिवसेना सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरला असला तरी, 2015-16 च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या देणग्यांच्या रकमेत 70 टक्क्यांची घट झाली आहे. 2015-16 मध्ये शिवसेनेला 61.19 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.

2015-16 ते 2016-17 या कालावधीत आसाम गण परिषद आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या दोन पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. आसाम गण परिषदेला 2016-17 मध्ये 0.43 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ तब्बल 7 हजार 183 पट इतकी आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला 4.2 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. 2015-16 च्या तुलनेत ही वाढ 596 पट इतकी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांना बऱ्याच कालावधीनंतर राज्यात सत्ता मिळाली आहे. आसाम गण परिषद आसाममध्ये भाजपासोबत सत्तेत आहे. तर 224 आमदार असलेल्या कर्नाटकमध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) काँग्रेसच्या पाठिंब्यानं सत्तेत आहे. 
 


Web Title: Shiv Sena richest regional party aap at second position
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.