राव यांच्या ‘बेस्ट’ संपाला शिवसेनेने दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 01:06 AM2019-07-24T01:06:13+5:302019-07-24T01:06:42+5:30

दूर राहण्याचा निर्णय : ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक

Shiv Sena challenges Rao's 'Best' solution | राव यांच्या ‘बेस्ट’ संपाला शिवसेनेने दिले आव्हान

राव यांच्या ‘बेस्ट’ संपाला शिवसेनेने दिले आव्हान

Next

मुंबई : बेस्ट कामगारांच्या मागण्यांसंदर्भात जानेवारी महिन्यात केलेल्या संपात शिवसेनेवर मोठी नामुश्की ओढावली होती. या संपातील मागण्यांवर चर्चा करण्यासाठी लवादाची नियुक्ती झाली. यामुळे या संपाचे सर्व श्रेय कामगार नेते शशांक राव यांच्या खिशात गेले होते. त्यांनी पुन्हा संपाची हाक दिली असताना शिवसेनेने मात्र या वेळेस संपापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला असून हा संप करून दाखवाच, असे आव्हान शिवसेनेने दिले आहे.

बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून अनुदान मिळत असल्याने बेस्टचे प्रश्न सुटले असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. परंतु, कामगारांच्या मागण्या जैसे थेच आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे दि बेस्ट वर्कर्स युनियनने ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला आहे. या संपाबाबत मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी चिंता व्यक्त केली. कामगार संघटना व बेस्ट प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाल्यानंतरही कर्मचारी संप कसा काय पुकारतात, असा सवाल सदस्यांनी केला.
या चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे सदस्य व कामगार नेते सुहास सामंत यांनी शशांक राव यांची धमकी पोकळ असल्याचा दावा केला. ७ जानेवारी रोजी झालेल्या संपात सहभागी होणे ही शिवसेनेची मोठी चूक झाली. पण ही चूक पुन्हा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संप मागे घेतला, त्या वेळी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात राव अपयशी ठरले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा दबाव येत असल्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी रावांना पुन्हा संपाची हाक द्यावी लागत आहे. मात्र राव यांनी हा संप यशस्वी करून दाखवावा, असे आव्हान सामंत यांनी या वेळी दिले.

बेस्ट प्रशासनाचे मौन...
संपाचा सामना कसा करणार? याचे कोणतेही उत्तर बेस्ट प्रशासनाकडे नव्हते. याउलट मान्यता प्राप्त कर्मचारी संघटनांबरोबर त्यांच्या मागण्यांबाबत बेस्टने व पालिका आयुक्तांनी केलेला सामंजस्य करारच कसा योग्य आहे, याबाबत महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे सांगत राहिले.

करार बेकायदाच
बेस्ट समितीच्या मान्यतेशिवाय पालिका आयुक्तांसह मान्यताप्राप्त युनियनसोबत केलेला सामंजस्य करार हा बेस्टच्या कायद्याप्रमाणे
बेकायदेशीर ठरतो, अशी नाराजी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केली.
या करारातील अटी संघटना व बेस्टला बंधनकारक आहेत का? करार करूनही युनियनने संप पुकारणे योग्य आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. तर बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी, युनियनने करार करूनही संप पुकारणे हा कराराचा भंग होत नाही का, असा सवाल केला.

संपात शिवसेनेची झाली होती नामुश्की
संप यशस्वी करण्याची ताकद शिवसेना पक्षात असल्याचे बोलले जाते. परंतु राव यांनी ७ जानेवारी रोजी पुकारलेला बेस्ट कामगारांचा संप तब्बल नऊ दिवस चालला. महापालिकेत सत्तेवर असतानाही शिवसेना प्रणीत संघटना या संपात उतरली होती. मात्र ही चूक लक्षात येताच दुसºयाच दिवशी शिवसेनेने संपातून माघार घेतली. परंतु, त्यानंतरही संप सुरूच राहिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतरही संपातून राव यांनी माघार घेतली नाही. याउलट शिवसेनेचे नेते असतील तेथे वाटाघाटी नाहीत, असा पवित्रा शशांक राव यांनी घेतला होता.

Web Title: Shiv Sena challenges Rao's 'Best' solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.