आरटीईच्या पहिल्या सोडतीत मुंबईतून ३५३२ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:06 AM2019-04-11T06:06:20+5:302019-04-11T06:06:22+5:30

आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू : प्रमाणपत्रे पडताळणी ११ ते २६ एप्रिलदरम्यान

The selection of 3532 students from Mumbai's first edition of RTE | आरटीईच्या पहिल्या सोडतीत मुंबईतून ३५३२ विद्यार्थ्यांची निवड

आरटीईच्या पहिल्या सोडतीत मुंबईतून ३५३२ विद्यार्थ्यांची निवड

googlenewsNext

मुंबई : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी मुंबईतून ३,५३२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या २,७८९ तर इतर बोर्डांतील ७४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे पडताळणी आणि प्रवेश प्रक्रिया ११ ते २६ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे.


आरटीई प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिली सोडत सोमवार, ८ एप्रिलला पुण्यातून जाहीर करण्यात आली. त्यानंतर बुधवारी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. राज्यात आरटीईच्या एकूण १ लाख १६ हजार ७७९ जागा असून पहिल्या सोडतीत ६७,७०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.


मुंबई विभागात उपलब्ध ७,४९१ जागांसाठी पहिल्या सोडतीत ३,५३२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत आरटीईसाठी एकूण ३५६ शाळांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, गुरुवारपासून प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत असून पालकांनी एसएमएस व याद्यांवर अवलंबून न राहता पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाची कार्यवाही सुरू करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.


विहित मुदतीत प्रवेश घेण्याचे आवाहन
लॉटरी पद्धतीने ज्या शाळेत पाल्याची निवड झाली आहे त्या शाळेजवळच्याच पडताळणी केंद्रावर जाऊन पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करावी. तसेच सर्व कागदपत्रांच्या दोन प्रती तयार कराव्यात, त्यापैकी एक संच पडताळणी समितीककडे व दुसरा संच शाळेत सादर करावा. तसेच आपला आॅनलाइन प्रवेश झाल्याची पावती तथा प्रवेश पत्र आणि इतर कागदपत्रे घेऊन दिलेल्या मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.


आरटीई प्रवेशासाठी
२६ तारखेपर्यंत पालकांना प्रवेशाची मुदत असली तरी पडताळणी समितीला आपले काम २० तारखेपर्यंत संपविण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या आहेत.

Web Title: The selection of 3532 students from Mumbai's first edition of RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.