धावत्या मुंबईनेही गिरवले योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:19 AM2018-06-22T02:19:06+5:302018-06-22T02:19:06+5:30

जागतिक योग दिवस गुरुवारी मुंबईत सर्वत्र साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, सरकारी कार्यालये या सर्व ठिकाणी योगाभ्यासाचे प्रशिक्षण घेण्यात आले.

Running Mumbai also taught yoga lessons | धावत्या मुंबईनेही गिरवले योगाचे धडे

धावत्या मुंबईनेही गिरवले योगाचे धडे

Next

जागतिक योग दिवस गुरुवारी मुंबईत सर्वत्र साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, सरकारी कार्यालये या सर्व ठिकाणी योगाभ्यासाचे प्रशिक्षण घेण्यात आले. या योग दिनानिमित्त सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही हिरिरीने भाग घेऊन योगाभ्याचे धडे गिरवले. या संपूर्ण योग दिनाचा लोकमतने घेतलेला हा आढावा.
वडाळा आगारात योग शिबिर
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारातील टी.टी.सी. येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बेस्ट उपक्रमाचे माजी विभागीय अभियंता एकनाथ चौधरी यांनी अधिकारी व कर्मचारी यांना योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले. उपक्रमातील कर्मचारी व अधिकारी यांनी याचा लाभ घेतला. या प्रसंगी बेस्टचे उपमहाव्यवस्थापक आर.जे. सिंह, परिवहनचे उपमुख्य व्यवस्थापक अशोक जवकर, विभागीय अभियंता दक्षता विभागाचे मनोज भोसले आणि इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहक सेवा जी उत्तरचे विभागीय अभियंता पी.पी. कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
>योग दिन फक्त योग दिनापुरता मर्यादित नाही
अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलमध्ये योग दिन साजरा झाला. मन आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी योग खूप महत्त्वाचा आहे. योग एक अशी शक्ती आहे; ज्यामुळे मनुष्यास आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळवता येऊ शकतो, असे शाळेचे एन.सी.सी. आर्मी विभागाचे अधिकारी योगगुरू विजय अवसरमोल यांनी सांगितले. योग करण्यासाठी कोणतीही साम्रगी लागत नाही. मैदान, पोषाख, क्रीडा साम्रगीच्या विना योगासने करता येतात. योग दिन फक्त योग दिनापुरता मर्यादित राहता कामा नये. योग सक्तीने नाही तर भक्तीने करायला पाहिजे, असे नौदल छात्रसेना मुख्याधिकारी उदय नरे यांनी सांगितले.
भवन्स महाविद्यालयात ‘योग दिन’
मुंबई : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अंधेरी पश्चिमेकडील भवन्स महाविद्यालयात योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या एसएफसी इमारतीच्या प्रांगणात सकाळी ७.३० वाजता योग साधना कार्यक्रम पार पडला. आसन, प्राणायाम, ध्यान, शवासन अशा विविध योगिक क्रियांचे सामूहिक सादरीकरण करण्यात आले. या वेळी उपप्राचार्या डॉ. रेखा शर्मा, कर्नल सिंग, एन.सी.सी. कॅप्टन मालिनी शर्मा, एनएसएसचे अक्षय राणे आणि सुनंदा पाटील यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गीता शेट्टी म्हणाल्या की, ‘योग साधना’ म्हणजे एक प्रकारची जीवनशैली आहे. त्यातून जीवनाला एक प्रकारची शिस्त लागते व जीवन तणावमुक्त होते, त्यातून योग साधनेचे आचरण नियमित केले पाहिजे.
‘नाद योग’ योग साधना : बोध मार्ग फाउंडेशनच्या वतीने ‘नाद योग’ या योग साधनाचे आयोजन करण्यात आले आहे. माटुंगा पूर्वेकडील भाऊदाजी मार्गावरील म्हैसूर असोसिएशन सभागृहात सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजता योग कार्यक्रम पार पडला. योग साधनेत शरीरातील ‘नाद’ यावर योगाचे प्रकार करण्यात आले. गेल्या १० वर्षांपासून नाद योगावर संशोधन सुरू आहे. नाद योगाबाबत माहिती देताना नाद योगी रिवेश वदे म्हणाले की, नाद योग केल्याने आपले मानसिक विचार जे आहेत. यात नकारात्मक विचार, ताण-तणाव हे सर्व एकप्रकारचे तरंग असतात. तरंग जे आहेत ते नाद योगामध्ये परावर्तीत होतात. ताण-तणाव, भीती आणि नकारात्मक विचार कमी झाल्याने त्या अनुषंगाने येणारे आजारही कमी होतात. आध्यात्मिक आणि मानसिकतेची प्रगती होऊ लागते. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृता अनुभव या ग्रंथामध्ये नाद योगाबद्दल लिहिले आहे. ज्ञानेश्वरांचे कार्य संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवण्याचे कार्य बोध मार्ग फाउंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे करण्यात येत आहे.
अस्मिता शाळेत योग शिबिर
जोगेश्वरी पूर्वेकडील अस्मिता संचालित जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय व श्री अंबिका योगाश्रम यांच्या वतीने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून अस्मिता शाळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जवळपास सहाशे विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, योगाश्रमाचे साधक, नागरिकांनी योग शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष फडतरे, योगाश्रमाच्या शीला शहा, डॉ. शेवाळे, पर्यवेक्षिका विजया गोळे, मनाली केणी, दीपक खानविलकर यांची उपस्थिती होती. सायन येथील एसआयईएस कॉलेज आॅफ आर्ट, सायन्स मध्ये योग दिन साजरा झाला. या वेळी एन.एन.सी.च्या विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योगासनाची प्रात्यक्षिके टीव्हीद्वारे दाखविण्यात आली.

>आंबेडकर प्रतिष्ठान कॉलेजमध्ये योगासन शिबिर
मुंबई : जी.डी. आंबेडकर प्रतिष्ठान कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या संयुक्त विद्यमाने तसेच इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशन (आय.एन.ओ.) यांच्या सहकार्याने परेल येथील मामासाहेब फाळके सभागृहात कॉलेज विद्यार्थी आणि महिलावर्गाने जागतिक योग दिनानिमित्त योगासन शिबिर पार पडले. योग शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी केले.
योग शिबिरावेळी गोविंद मोहिते म्हणाले की, जीवनात ताजेतवाने राहण्यासाठी आणि पचनव्यवस्था नीट राहून नैसर्गिक प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी योगासन महत्त्वाचे ठरते. रोग प्रतिकारशक्ती वाढवून शरीर सक्षम ठेवण्यासाठी योगासनाशिवाय दुसरा पर्याय नाही. पण योगासन मात्र नियमित करावयास हवे. तसेच योगाभ्यासक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे माजी शिक्षणप्रमुख राम नायकुडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
योग शिबिरामध्ये इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशनचे साहाय्यक सेक्रेटरी आणि योगशिक्षिका स्मिता डेकाटे यांनी प्राणायाम अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रीका, ताडासन, वृक्षासन, उष्ट्रासन आणि ध्यानधारणा मुद्राविषयक योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. याप्रसंगी योगशिक्षिका इंदुमती खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, खजिनदार निवृत्ती देसाई, कॉलेजचे संचालक जी.बी. गावडे, प्राचार्य केतन सारंंग, सचिव शिवाजी काळे, शिक्षण विभाग साहाय्यक मोहन पोळ यांची उपस्थिती होती.
>गेट-वे आॅफ इंडिया येथे योग दिन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई शहर आणि पतंजली योग समिती व मुंबई ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गेट-वे आॅफ इंडिया येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, मंगल प्रभात लोढा, मुंबई येथील भारत स्वाभिमानी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश यादव, पतंजली समितीचे अध्यक्ष पोपटराव कदम, महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा मेधा चिपकर, सीआरपीएम, सीआयएसएफचे जवान
तसेच सिंडिकेट बँकेचे कर्मचारी, एमबीपीटीचे सदस्य, ओएनजीसीचे अधिकारी, होलीनेम हायस्कूल, सर जे. जे. हायस्कूल, बाईका बी बाई हायस्कूल, सेंट अ‍ॅनीस हायस्कूल, जय हिंद कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेज, सेंट जोसेफ हायस्कूल, सर जे.जे. गर्ल्स हायस्कूल, एल्फिन्स्टन कॉलेज, स्कॉलर हायस्कूलचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. स्वाभिमानी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी विद्यार्थी व उपस्थितांना योगाची विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर करून दाखविली.
>सेंट कोलंबो स्कूलमध्ये साजरा झाला ‘योग दिन’
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी मुंबईतील मुलींची पहिली शाळा ओळखल्या जाणाºया सेंट कोलंबो स्कूलला भेट दिली. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत योग दिन साजरा करण्यात आला.
शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, मुंबईकरांनी आपल्या धकाधकीच्या जीवनात किमान ५ मिनिटे योग अभ्यास करावा तर विद्यार्थ्यांनी स्कूल बसमध्ये केवळ ५ मिनिटे योगाभ्यास केल्यास, त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनात होऊ शकतो. दैनंदिन जीवनात काही वेळ योगाभ्यासासाठी दिल्यास त्याचा फायदा निरोगी आरोग्यासाठी होऊ शकतो.
विनोद तावडे म्हणाले की, शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि शैक्षणिक प्रगती साधण्याच्या दृष्टीने दरदिवशी थोडा वेळ योगाभ्यास केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, पतंजली योग समितीचे योग अभ्यासक यांच्या समवेत योगाची काही प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी केली. या वेळी शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होते.
कोळी समाजानेही साजरा केला योग दिवस
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त प्रभाग क्रमांक ४६ मध्ये नगसेविका योगिता सुनील कोळी यांच्या वतीने मालाड कोळी समाज सभागृहात योग दिवस साजरा करण्यात आला. या वेळी सुनील कोळी, रमेश दोषी, हरीश जालन, माधवी भुत्ताजी, किशोर लट्टू, गौतम वर्मा, सुनील शेठ आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Web Title: Running Mumbai also taught yoga lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग