धावपळ, मोठा आवाज अन् मरणाची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 07:13 AM2018-06-29T07:13:07+5:302018-06-29T07:13:18+5:30

जीवदया लेनचा रस्ता माझ्यासाठी रोजचाच.. याच रस्त्यावरून रोज दुपारी ये-जा करतो. लंच टाइम झाला की या रस्त्याने स्टेशन रोडला जायचे हा दिनक्रमच.

Running, loud and fear of death! | धावपळ, मोठा आवाज अन् मरणाची भीती!

धावपळ, मोठा आवाज अन् मरणाची भीती!

Next

स्नेहा मोरे
मुंबई : जीवदया लेनचा रस्ता माझ्यासाठी रोजचाच.. याच रस्त्यावरून रोज दुपारी ये-जा करतो. लंच टाइम झाला की या रस्त्याने स्टेशन रोडला जायचे हा दिनक्रमच. मात्र गुरुवारी दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास इथून जाताना अचानक मोठा आवाज झाला आणि जीव मुठीत घेऊन प्रत्येकाची धावपळ सुरू झाली. काही कळायच्या आत संपूर्ण रस्ता धुराने वेढून गेला.
एका दुकानाच्या मागच्या बाजूला आडोसा मिळाला, मात्र चेंगराचेंगरीमुळे श्वसनाला त्रास होत होता. त्या वेळी समोरचे दृश्य पाहून काही क्षणांसाठी श्वास तिथेच थबकला... घाटकोपर दुर्घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले रफीक अली यांनी ‘लोकमत’ला आँखो देखा हाल सांगितला.
या बांधकाम साईटवर काम करणारा रामप्रसाद वर्मा म्हणाला, मी मध्य प्रदेशहून आलोय. आमच्यासह आणखी तिघे येथे काम करतात. घटना घडली तेव्हा आम्ही जेवायला बाहेर गेलो होतो. मात्र तो भयाण आवाज कानावर पडला. ते सगळं आम्ही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं. ‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो.’ आमच्यातला एका मजूर दिवाकरने तर धसका घेतलाय. बराच वेळ तो बोलत नव्हता. बऱ्याच वेळाने भानावर आला. त्या ठिकाणी काम करणार नाही, असे तो आम्हा सगळ्यांना सांगतोय.
राजावाडी रुग्णालयात उपचार घेणारे या घटनेतील जखमी लवकुश कुमार याने केवळ सुदैवाने वाचल्याचे सांगितले. लवकुश कुमार आणि नरेश कुमार या दोघांनीही हा अपघात डोळ्यांनी पाहिला. या दुर्घटनेत त्यांचे हातपाय भाजले आहेत. त्यांना तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केल्याने वेळेवर उपचार मिळाले.
युसूफ मिर्झा यांनी सांगितले की, आगीचे आणि धुराचे लोट आल्याने लोक गोंधळले. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी धावत होता. एका पादचाºयाचा या घटनेत मृत्यू झाल्याचे दृश्य मी पाहिले. त्या वेळेस खूप धावपळ सुरू होती. काय घडतेय हेच कुणाला समजत नव्हते. मात्र आता त्या क्षणातली हतबलता जाणवतेय. आपण त्या व्यक्तीला मदत करू शकलो नाही, ही सल कायम माझ्या मनात राहील. ते विमान कोसळताना झालेला मोठ्ठा आवाज आताही माझ्या कानात घुमतोय, हा अनुभव सांगताना थरथरणाºया युसूफ यांचा आवाज अंगावर काटा आणणारा होता.

मोबाइल अन्
बघ्यांची गर्दी
घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. यामुळे कुणी गच्चीवरून, कुणी गॅलरीतून तर कुणी खिडकीतून घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी धडपडत होते. घटनास्थळाचे फूटेज सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठीची ही बघ्यांची गर्दी काही वेळा यंत्रणांच्या मदतकार्यात अडथळाही ठरत होती.
मनात केवळ बॉम्बस्फोटाची भीती
विमान आदळल्यानंतरचा आवाज इतका भीषण होता, की केवळ बॉम्बस्फोटच झाला असावा अशी भीती वाटत होती. या भीतीने जीव मुठीत घेऊन सैरभैर पळू लागलो. मुंबईसारख्या शहरात अशा दुर्घटनांची अधिक भीती वाटते, अशी प्रतिक्रिया नंदलाल चौबे यांनी दिली
माझ्याच गॅलरीवर आदळतेय की काय?
विमान पडण्याच्या काही काळ आधी आकाशात काही मर्यादेच्या खाली ते भिरभिरत असल्याचे नजरेस पडले होते. एका क्षणासाठी ते विमान माझ्याच इमारतीच्या गॅलरीला आदळतेय की काय, असा भासही झाला. मात्र तो आवाज अत्यंत घाबरवणारा होता. या घटनेची मनात भीती बसलेय, असे येथील इमारतीत राहणारे व्यावसायिक अनंत कंधोर यांनी सांगितले.
मर्यादेच्या खाली विमानाचे उड्डाण
वैमानिक विमान लँड करण्यासाठी रिकाम्या जागेचा शोध घेत आहे, असे वाटत होते. हा शोध बांधकाम जागेवर येऊन संपला; कारण ज्या वेळी विमान लँड होत होते, तेव्हा काही वेळापूर्वी मर्यादेच्या खाली विमान उडताना पाहिले होते. मात्र त्या वेळी दुर्घटनेची कल्पना नव्हती, अशी माहिती घटनास्थळापासून जवळच्या वसाहतीत राहणारे हरिभाई पाटील यांनी दिली.
उंचीमुळे
रखडली परवानगी
या बांधकाम सुरू असणाºया इमारतीच्या उंचीच्या मुद्द्यावरून बराच काळ काम रखडले होते. कारण हा मार्ग विमान उड्डाणाच्या पट्ट्यातील असल्याने उंचीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच ही परवानगी मिळाल्याने पुन्हा या साईटवरील काम सुरू झाले होते, असे नैना
गाला या स्थानिक महिलेने
सांगितले.

Web Title: Running, loud and fear of death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.