अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर, अग्निशमनविषयी लेखापरीक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 03:45 AM2018-12-18T03:45:49+5:302018-12-18T03:45:53+5:30

अग्निशमनविषयी लेखापरीक्षण नाही : दोन वर्षांपासून प्रस्ताव धूळखात पडून

Rules for fire safety are not feasible, fire-related audit | अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर, अग्निशमनविषयी लेखापरीक्षण नाही

अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर, अग्निशमनविषयी लेखापरीक्षण नाही

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अग्निशमनविषयी नियम धाब्यावर बसविले जात आहेत. अग्निशमनविषयी लेखा परीक्षणाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून धूळखात पडून आहे. कार्यालयांमधील आग विझविण्यासाठीचे फायर इस्टिंगविशर २००३ पासून बदलण्यात आले नाहीत. प्रशासनासह व्यापाऱ्यांनीही काहीच उपाययोजना केली नसल्यामुळे एक लाखपेक्षा जास्त नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

देशातील पहिले राष्ट्रीय मार्केट म्हणून मुंबई बाजार समितीची घोषणा करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनीही याविषयी सूतोवाच केले आहे. इनाम प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केली जात आहे. इनामसाठी नोंदणी सुरू केली आहे. बाजार समिती मुख्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर डिजिटल बोर्ड बसविण्यात आले आहेत. आधुनिकतेचा दिखावा करणाºया प्रशासनाला मार्केटच्या सुरक्षेचा मात्र विसर पडला आहे. ७२ हेक्टर क्षेत्रफळावर सहा मार्केट उभारण्यात आली आहेत. बाजार समितीच्या मध्यवर्ती सुविधागृह इमारतीसह सहा व्यापारी संकुले आहेत. यामधील एकाही इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. बाजार समितीच्या मुख्यालयामध्येही आग लागल्यास ती विझविण्यासाठी काहीही उपाययोजना नाही. येथील प्रत्येक मजल्यावर दोन फायर इस्टिंगविशर बसविले आहेत. २००३ पासून त्यांचे नूतनीकरण केलेले नाही. सचिव, अभियांत्रिकी विभाग व इतर सर्वच कार्यालयांमधील यंत्रसामग्री १५ वर्षांपासून बदलण्यात आलेली नाही. फक्त दिखाव्यासाठीच इस्टिंगविशर ठेवण्यात आलेले आहेत. फळ मार्केटमधील निर्यातभवन, मध्यवर्ती सुविधागृह, मसाला मार्केटमधील दोन्ही इमारतींमध्येही काहीही यंत्रणा नाही. अनावश्यक कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाºया प्रशासनाने आग लागल्यास ती विझविण्यासाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत.
दोन वर्षांपूर्वी मसाला मार्केटमधील एका गोडाऊनला व फळ मार्केटमधील गाळ्याला आग लागली होती. मार्केटमधील गवतालाही अनेक वेळा आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर एकाही व्यापारी गाळ्यामध्ये आग विझविण्यासाठी काहीही यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानेही यापूर्वीच बाजार समितीला नोटीस दिलेली आहे. परंतु या नोटीसलाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे. मसाला मार्केटमधील आगीनंतर प्रशासनाने मार्केटमधील सर्व इमारतींचे फायर आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
व्यापारी संघटनाही याकडे दुर्लक्ष करत आहेत. मार्केटमध्ये पाच ते सात मजल्यांच्या इमारती आहेत. परवानगी न घेता रचनेमध्ये बदल करण्यात आले असून आग लागल्यास
सातव्या मजल्यावरील नागरिकांना सुरक्षितपणे खाली उतरवणे अशक्य होणार असून अजून किती दिवस दुर्लक्ष केले जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महानगरपालिकेकडून कारवाई नाही
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने यापूर्वीही बाजार समितीला अग्निशमन यंत्रणा सुस्थितीमध्ये ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु फक्त नोटीस देण्याव्यतिरिक्त काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे महानगरपालिकाच व्यापाºयांना व प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप होवू लागला आहे.

कांदा मार्केट
एकूण गाळे : २४३
लिलावगृह : २५२० चौ. मी.
कार्यालय : ३९९६ चौ. मी.
मसाला मार्केट
मोठे गाळे : ५९८
छोटे गाळे : १०९
मध्यवर्ती इमारत : २७२ कार्यालये
धान्य मार्केट
गाळे : ४१२
अतिरिक्त शॉप कम गोडाऊन : १९३ कार्यालये
फळ मार्केट
मोठे गाळे : ७३२
लहान गाळे : २९७
मध्यवर्ती सुविधागृह : २२५ कार्यालये
 

Web Title: Rules for fire safety are not feasible, fire-related audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.