कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:23 AM2019-01-22T01:23:17+5:302019-01-22T01:23:38+5:30

कोस्टल रोड प्रकल्पाला मच्छीमारांकडून विरोध होत असताना आता नवीन अडचण उभी राहिली आहे.

The route to the coastal road project is difficult | कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग खडतर

कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग खडतर

googlenewsNext

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पाला मच्छीमारांकडून विरोध होत असताना आता नवीन अडचण उभी राहिली आहे. या कामानिमित्त वरळी सीफेसजवळ बॅरिकेट्स उभे केल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा वादात सापडला आहे. याचा फटका प्रकल्पाच्या डेडलाइनला बसू नये, यासाठी पालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी वांद्रे सी-लिंक बाजूपर्यंत ९.९८ किमी लांबीच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले. मात्र, भूमिपूजनाच्या दिवशीच मच्छीमारांनी निदर्शने केली. कोळी बांधवांच्या असहकारामुळे या प्रकल्पाचे काम काही काळ बंद पडले होते. समुद्रात भराव टाकण्यास मच्छीमारांनी विरोध केला आहे. त्यात आता वरळीकरांच्या नाराजीची भर पडली आहे.
या प्रकल्पासाठी वरळी सीफेस येथील काही भाग बॅरिकेट्समुळे झाकला गेला आहे. काम पूर्ण होईपर्यंत वरळी येथील समुद्र पदपथ झाकले जाणार आहेत. कोस्टल रोडलगत मुंबईतील सर्वात मोठा पदपथ तयार होणार आहे. मात्र, वरळी सी फेस व येथील पदपथाची वेगळी ओळख आहे. ती ओळख पुसण्यास वरळीकर तयार नाहीत. त्यामुळे या विरोधात निदर्शनेही करण्यात आली.
>प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत ६.४ कि.मी. लांबीचा सलग पदपथ बांधण्यात येणार आहे. या विस्तीर्ण पदपथाची रुंदी ही २० मीटर म्हणजेच सुमारे ६५ फूट एवढी असणार आहे.
नेताजी सुभाष मार्गालगत असणारा समुद्री पदपथ हा सुमारे ३.५ किमी लांबीचा आहे. त्यामुळे कोस्टल रोडलगत आकारास येणारा हा समुद्री पदपथ मुंबईतील सर्वात मोठा पदपथ ठरणार आहे.
>वरळीकरांच्या मनधरणीसाठी फलक...
वरळी सीफेस परिसरात महापालिकेने मोठे फलक लावले आहेत. वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबईत अशा प्रकल्पांची गरज आहे. त्यामुळे या प्रकल्पाची संपूर्ण माहिती फलकावर देण्यात आली आहे, असे कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी सांगितले.

Web Title: The route to the coastal road project is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.