मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:18 AM2023-12-10T09:18:59+5:302023-12-10T09:20:32+5:30

एससीएलआरचा एमएमआरडीएकडून विस्तार; वेस्टर्नवरील डेक उभारणी.

Road construction has been started from BKC to the airport in mumbai | मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा 

मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा 

मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला असून, वाकोला नाला आणि पानबाई इंटरनॅशनल स्कूलदरम्यान पूल उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलाच्या उभारणीसाठी ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचा वापर करण्यात येणार असून,  डेक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. विस्ताराचे काम पूर्ण झाल्यावर बीकेसी-विमानतळ प्रवास अधिक जलद होणार आहे.
 
एप्रिल २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्प हा मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या (एमयूआयपी) अंतर्गत सुरू आहे, त्यासाठी६७० कोटी रुपये खर्च करण्यात येत असून,  प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गामधील प्रवास सिग्नलमुक्त होणार आहे. पहिल्या भागातील या प्रकल्पाची लांबी ५.४० किमी आहे. या प्रकल्पातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक उभारणीचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे.

केबल-स्टेड ब्रिजची लांबी २१५ मीटर आहे आणि त्याची रुंदी १०.५  मीटर ते १७.५ मीटर आहे.  या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचे वजन १७८० मेट्रिक टन आहे.  जमिनीपासून पुलाची उंची २२ मीटर असून, वाकोला उड्डाणपुलापासून ९ मीटर उंचीवर पूल बांधण्यात आला. 


कलिना अंधेरीदरम्यानची वाहतूक सुलभ :

  सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याच्या पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणारा हा पूल पश्चिम द्रुतगती मार्गावरून जाणारा असून, या पुलामुळे कलिना आणि अंधेरीदरम्यानची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. 
  पूल उभारत असलेल्या भागातील एकूण परिस्थिती लक्षात घेता एमएमआरडीएने इथे केबल स्टेड पूल बांधण्याचा निर्णय घेतला. हा पूल २०० मीटरपेक्षा अधिक लांबीचा आहे.
  जमिनीपासून ज्या उंचीवर हा पूल बांधण्यात आला आहे, ती उंची पाहता यासाठी केबल स्टेड पूल बांधणे गरजेचे असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.

९२% काम :

सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम ९२ टक्के पूर्ण झाले आहे.
या मार्गावरील केबल स्टेड पूल आणि त्यासाठी ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी आता सुरू झालेली आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. 


हलका आणि मजबूत :

काँक्रीटच्या तुलनेत वजनाने हलका आणि मजबूत त्यासोबतच बांधकाम प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी या प्रकल्पात ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचा (ओएसडी) वापर करण्यात आला आहे. 

ओएसडीच्या निर्मितीसाठी चांगल्या दर्जाच्या स्टीलचा वापर करण्यात येत असून, त्यावर गंजप्रतिरोधक रंगाचा फवारा मारण्यात येणार आहे. या पुलासाठीच्या ओसडीसाठी ४ x १०.५ मीटरचे ५८ तुकडे जोडून डेक तयार करण्यात येणार आहे. हे तुकडे जोडण्यासाठीच्या वेल्डिंगचे काम वाडा येथे सुरू राहणार आहे. ओएसडीचे २ भाग पुलावर ठेवण्याचे काम सध्या सुरू असून उरलेले भाग ठेवण्याचे काम फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होईल. हा डेक पूर्णपणे उभारला गेला की केबल जोडणी, काँक्रिटीकरण, डांबरीकरण ही कामे सुरू केली जाणार आहेत.

सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता विस्तार हा शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे वांद्रे-कुर्ला संकुलातील व्यावसायिक संकुलांपर्यंत पूर्व किंवा पश्चिम द्रुतगती मार्गावरून जलदगतीने पोहोचता येईल. हा उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. - डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त एमएमआरडीए

Web Title: Road construction has been started from BKC to the airport in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.