पुनर्वापरायोग्य पार्सल कंटेनरला कारवाईतून सूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:30 AM2018-06-29T04:30:04+5:302018-06-29T04:30:07+5:30

हॉटेल व्यावसायिकांनी वापरात आणलेल्या पुनर्वापरास योग्य आणि पुन:प्रक्रिया होणाऱ्या पार्सल कंटेनरला प्लॅस्टिक बंदीतून सूट देण्यात आल्याचा दावा हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेचे सरचिटणीस विश्वपाल शेट्टी

Reusable parcel container suit for action! | पुनर्वापरायोग्य पार्सल कंटेनरला कारवाईतून सूट!

पुनर्वापरायोग्य पार्सल कंटेनरला कारवाईतून सूट!

Next

चेतन ननावरे 
मुंबई : हॉटेल व्यावसायिकांनी वापरात आणलेल्या पुनर्वापरास योग्य आणि पुन:प्रक्रिया होणाऱ्या पार्सल कंटेनरला प्लॅस्टिक बंदीतून सूट देण्यात आल्याचा दावा हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेचे सरचिटणीस विश्वपाल शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. यासंदर्भात आहार आणि मनपा उपायुक्त निधी चौधरी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पार्सलसाठी हे पुनर्वापर होणारे कंटेनर वापरण्यात येणार असल्याने पार्सल जेवण महागण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
एकदाच वापरात येणाºया प्लॅस्टिकच्या कंटेनरवर पर्यावरण विभागाने याआधीच बंदी लादलेली आहे. या कंटेनरला पर्याय म्हणून अधिक जाडीचे आणि पुनर्वापर व पुन:प्रक्रिया होणाºया पर्यावरणपूरक पार्सल कंटेनरचा वापर सुरू केला. मात्र चेंबूर येथे काही हॉटेल व्यावसायिकांविरोधात हे पर्यावरणपूरक कंटेनर वापरल्याबाबत मनपाच्या प्लॅस्टिक निर्मूलन पथकातील निरीक्षकांनी दंड आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे भयभीत झालेल्या हॉटेल व्यावसायिकांनी पार्सल काउंटरच बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र मनपा उपायुक्त निधी चौधरी यांनी स्वत: सोशल मीडियावर संबंधित पुनर्वापरास योग्य कंटेनरवर कारवाई न करण्याची पोस्ट केली. तसेच निरीक्षकांनाही यासंदर्भात कारवाई न करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा आहारचे सरचिटणीस विश्वपाल शेट्टी यांनी केला आहे.
शेट्टी म्हणाले, या पर्यावरणपूरक पार्सल कंटेनरला भंगारातही प्रति किलोला ५० रुपयांचा दर आहे. शिवाय यासंदर्भातील बाय बॅक पॉलिसी येत्या महिन्याभरात आहार राबवणार आहे. त्याआधी आहारच्या मुंबईतील ८ हजारांहून अधिक सदस्यांपर्यंत हे पर्यावरणपूरक पार्सल कंटेनर पोहोचविण्याचे आव्हान संघटनेसमोर आहे. दरम्यान, ज्या सदस्यांकडे हे कंटेनर आहेत, त्यांनी त्याचा वापर करण्याचे संदेश सदस्यांना मोबाइलद्वारे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

विल्हेवाट लावण्यात ‘महालक्ष्मी’ अव्वल!
मुंबई : भक्तांनी वापरलेल्या प्लॅस्टिक बाटल्या नष्ट करण्यासाठी रिव्हर्स वेंडिंग मशीन (आरव्हीएम) बसवणारे मुंबईचे महालक्ष्मी मंदिर हे देशातील पहिले देवस्थान ठरले आहे. या मशीनमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे तुकडे करून ते पुनर्वापरासाठी पाठविण्यात येणार आहेत.
बाटली जमा केल्यावर या ठिकाणी डिस्काउंट कुपन्स देण्यात येणार आहेत. आरआयएलने देश स्वच्छ ठेवण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात केली असून त्यामुळे आता या वापरलेल्या बाटल्या जमिनीत खोलवर जाणार नाहीत. आरआयएलने आधीच मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी १४ आरव्हीएम बसविल्या आहेत. आॅगस्ट महिन्यापर्यंत आणखी ३०
आरव्हीएम बसविण्याची योजना असल्याचेही आरआयएलने स्पष्ट केले. लोकांना सुलभता देण्यासाठी व रिसायकलिंग उपक्रमात त्यांना सहभागीदार बनविण्यासाठी आरआयएलने सिटी सेंटर मॉल, वॉक्हार्ट रुग्णालय, डायमंड बोर्स अशा महत्त्वाच्या ठिकाणी आरव्हीएम बसविली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात दोन, तर मुंबईतील रिलायन्सच्या विविध रिलायन्स स्मार्ट रिटेल्समध्ये आणि सहकारी भांडारांत मशीन्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
वापरलेल्या प्लॅस्टिक बाटल्या जमा करून बाराबंकी, यूपी आणि होशियारपूर, पंजाब येथे असलेल्या पेट रिसायकलिंग फॅसिलिटीमध्ये पाठविण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी या प्लॅस्टिकपासून रेक्रोन ग्रीन गोल्ड फायबर्सची निर्मिती केली जाईल. यामुळे हरितवायू उत्सर्जन कमी होते आणि पाण्याचा वापरही बराच कमी होतो. परिणामी, टाकून दिलेल्या बाटल्या जमा करून त्यांचे परिवर्तन रेक्रोन ग्रीन गोल्ड पर्यावरणस्नेही पॉलिएस्टर फायबरमध्ये होणार असल्याने पर्यावरणाचेही संवर्धन होणार आहे.

अशी असेल बाय बॅक पॉलिसी
जेवण पार्सल देण्यात येणाºया प्लॅस्टिक कंटेनरसाठी हॉटेल व्यावसायिक प्रत्येक कंटेनरमागे त्याच्या आकारानुसार पैसे आकारत आहेत. त्यामध्ये
एक रुपयापासून पाच रुपयांच्या पार्सल कंटेनरचा समावेश आहे.
ग्राहकांनी वापरलेले पार्सल कंटेनर परत आणून दिल्यास कंटेनरसाठी मोजलेल्या रकमेतील ठरावीक रक्कम कापून ग्राहकांना काही रक्कम परत देण्यात येईल. पार्सल कंटेनर धुण्यासाठी ही रक्कम कापली जाईल.
येत्या महिन्याभरात सर्व सदस्यांच्या हॉटेलबाहेर बाय बॅक पॉलिसीच्या पाट्या लावण्यात येतील. जे सदस्य ही पॉलिसी राबविणार नाहीत, त्यांच्याविरोधात मनपाने कारवाई केल्यास आहार संघटना प्रशासनाच्या बाजूने असेल.

Web Title: Reusable parcel container suit for action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.