निकालानंतर वाढला वडाळ्याचा गुंता; कोळंबकर ‘बॉस’ भरोसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 01:18 AM2019-05-31T01:18:50+5:302019-05-31T01:19:19+5:30

यंदा कोळंबकर गाजावाजा करत युतीच्या प्रचारात सामील झाले. पण वडाळ्यातून युतीच्या उमेदवाराच्या मताधिक्यात भरीव फरक पडला नाही

The result of the result was the development of the Wadalas; Coalbanker 'boss' trust | निकालानंतर वाढला वडाळ्याचा गुंता; कोळंबकर ‘बॉस’ भरोसे

निकालानंतर वाढला वडाळ्याचा गुंता; कोळंबकर ‘बॉस’ भरोसे

googlenewsNext

गौरीशंकर घाळे
विधानसभा । वडाळा

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या विजयानंतर वडाळा विधानसभा क्षेत्रातील राजकीय गुंता भलताच वाढला आहे. भाजपच्या वाटेवर असणारे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर नव्या ‘बॉस’च्या आदेशानंतर युतीच्या प्रचारात उतरले. त्यावर युतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू झालेली धुसफूसही आगामी काळात तीव्र होण्याची शक्यता आहे.
सलग सात वेळा आमदारकी भूषविणारे कालिदास कोळंबकर यांनी नारायण राणे यांच्यासोबत २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही मतदारसंघावरची त्यांची हुकुमत सुटली नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते मुंबईत सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारे आमदार ठरले हाते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे मताधिक्य अवघ्या ८०० मतांवर आले. युती फिस्कटल्यानंतर येथे भाजपने प्रथमच आपला उमेदवार दिला होता. नवख्या मिहीर कोटेचा यांनी कोळंबकरांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत तंगवले होते. बदलत्या राजकीय परिस्थितीशी जुळवून घेत कोळंबकर यांनी भाजपशी जवळीक वाढवली. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकला. त्यांचा भाजपप्रवेश केवळ औपचारिकता मानली जात असताना स्थानिक पातळीवरून विरोधाचे सूर उमटत आहेत. शिवाय, यंदा कोळंबकर गाजावाजा करत युतीच्या प्रचारात सामील झाले. पण वडाळ्यातून युतीच्या उमेदवाराच्या मताधिक्यात भरीव फरक पडला नाही. त्यामुळे कोळंबकरांची सद्दी संपल्याचा दावा स्थानिक भाजप आणि शिवसेना नेते करत आहेत. शेवाळे अडचणीत असल्याचे आढळल्याने प्रदेश स्तरावरून कोळंबकरांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या गेल्या. कोळंबकरांनीही पुरेसा गाजावाजा करत युतीच्या प्रचारात सहभागी होण्याची घोषणा केली.

इतका खटाटोप करूनही वडाळ्यातून युतीच्या उमेदवाराचे मताधिक्य फारसे वाढलेच नाही. उलट कोळंबकरांच्या राजकीय कोलांटउड्यांना जनता कंटाळल्याची चर्चा, शिवसेनेसह भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक नेतेही करू लागले आहेत. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे येतो. श्रद्धा जाधव आदी स्थानिक शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जाहीरपणे कोळंबकरांना विरोध केला होता. शिवाय, कोळंबकर भाजपमध्ये डेरेदाखल होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शिवसेना कोळंबकरांसाठी वडाळ्याची जागा सोडणार का, असा प्रश्न आहे. जागावाटपाचा तिढा न सुटल्यास कोळंबकरांनी सेनेच्या तिकिटावर लढावे, असा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होण्याची शक्यता आहे. राणे यांच्याविरोधात सेना नेतृत्व आक्रमक असले तरी कोळंबकरांबाबत फारशी शत्रुत्वाची भावना नाही, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. जागावाटपाचा तिढा सुटला तरी भाजपमध्येही त्यांना प्रतिस्पर्धी आहेत.

Web Title: The result of the result was the development of the Wadalas; Coalbanker 'boss' trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.