ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजपाचे नगरसेवक दया गायकवाड यांनी लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी गायकवाडसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गायकवाड आणि ठाण्याच्या भीमनगर येथील या २५ वर्षीय तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी ओळख झाली. याच ओळखीतून गायकवाड यांनी लग्नाचे आमिष दाखवून टिटवाळा आणि बदलापूर येथील लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आणि शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी सुरुवातीला तिने थेट ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे ही आपबिती कथन केली. हीच तक्रार आता ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात सोमवार, ११ सप्टेंबर रोजी दाखल झाली. या प्रकरणात मध्यस्थी करणाºया कल्याण राष्टÑवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी धुमाळ आणि त्यांच्या पतीनेही या तरुणीला ब्लॅकमेल करून बलात्कार करण्यास मदत केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा सोमवारी रात्रीच दाखल झालेला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्यामुळे अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ही तरुणी ब्लॅकमेल करून पैसे मागत असल्याची उलट तक्रार गायकवाड यांच्या पत्नीने खडकपाडा पोलिसात केली आहे.