नीरव मोदीच्या कार्यालयांवर छापे; ५,१०० कोटींची संपत्ती केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:14 AM2018-02-16T06:14:47+5:302018-02-16T06:15:17+5:30

पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा घडवून आणणाºया नीरव मोदी याच्या मुंबई, दिल्ली आणि गुजरातमधील ठिकाणांवर सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी धाडी टाकल्या.

Raids on Neerav Modi's offices; Property worth Rs. 5,100 crores seized | नीरव मोदीच्या कार्यालयांवर छापे; ५,१०० कोटींची संपत्ती केली जप्त

नीरव मोदीच्या कार्यालयांवर छापे; ५,१०० कोटींची संपत्ती केली जप्त

Next

मुंबई/ नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा घडवून आणणाºया नीरव मोदी याच्या मुंबई, दिल्ली आणि गुजरातमधील ठिकाणांवर सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी धाडी टाकल्या. यात ५१०० कोटी रुपयांची हिरे, ज्वेलरी, मौल्यवान खडे आणि सोन्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
ईडीच्या एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांंगितले की, मोदी आणि अन्य आरोपींच्या मुंबईतील पाच संपत्ती सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय बँक खात्यातील रक्कम आणि फिक्स डिपॉझिटची ३.९ कोटी रुपयांची रक्कमही सील करण्यात आली.
पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून ही कारवाई केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मुंबई, हैदराबाद, जयपूर, गुजरात आणि दिल्लीमध्ये किमान १७ जागांवर करण्यात आली. ईडीने ज्या जागांवर ही कारवाई केली त्यात मोदीचे मुंबई येथील कुर्ला भागातील घर, काळा घोडा भागातील ज्वेलरीचे दुकान, वांद्रा आणि लोअर परळ भागातील कंपनीची तीन ठिकाणे, गुजरातमधील सुरत येथील तीन ठिकाणे आणि दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी व चाणक्यपुरी भागातील मोदीचे शोरूम यांचा समावेश आहे.

दोषींविरुद्ध पूर्ण क्षमतेने कारवाई करणार
नीरव मोदी प्रकरणातील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात दोषींविरुद्ध पूर्ण क्षमतेने कारवाई करण्यात येईल, असे पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

...तरीही ‘पीएमओ’ गप्प का?
या घोटाळ्यानंतर आम आदमी पार्टीने पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट शरसंधान करीत हिरेव्यापारी नीरव मोदीला देशातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. आपचे वरिष्ठ नेते आशितोष यांनी टिष्ट्वट करून याबाबत पंतप्रधान कार्यालयावर टीका केली आहे. आशितोष यांनी म्हटले आहे की, २६ जुलै २०१६पासून पंतप्रधान कार्यालयाकडे नीरव मोदीविरोधात ४२ तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरीही मागच्या महिन्यात नीरव मोदी डावोसमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत दिसतात!

मोदींशी असलेल्या संबंधांचा घेतला गैरफायदा
नीरव मोदी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांचा गैरफायदा घेत बँकेला फसविले, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली.

सीबीआयने या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगविरोधी (पीएमएलए) प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पीएनबीकडून मोदी आणि अन्य जणांविरुद्ध दाखल तक्रारींचाही आधार घेण्यात आला आहे. सीबीआयने मोदी, त्याचा भाऊ, पत्नी आणि अन्य एक व्यावसायिक भागीदार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २०१७मध्ये बँकेची २८०.७० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे.

ईडीने नीरव मोदीचा भाऊ निशाल, पत्नी एमी आणि मेहुल चीनूभाई चोकसी व दोन बँक अधिकारी गोकूलनाथ शेट्टी आणि मनोज खराट यांच्या घरांवरही धाडी टाकून चौकशी केली. निशाल, एमी आणि मेहुल हे सर्व डायमंड आर यूएस, सोलार एक्सपोर्ट्स आणि स्टेलर डायमंड्सचे भागीदार आहेत. तर, शेट्टी हे सेवानिवृत्त आहेत. सीबीआयच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, या बँक अधिकाºयांनी या फर्मला लाभ देण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. 

कोण आहे नीरव मोदी ?
नीरव मोदीचे कुटुंब हि-यांचा व्यापार करते. वडील बेल्जियममधील अँटवर्पला स्थायिक झाले आहेत, तर नीरव मोदीने स्वत:च्याच नावाने हिरेजडित दागिन्यांचा ‘नीरव मोदी’ हा डिझायनर ब्रँड तयार केला आहे.
सिनेतारका प्रियंका चोप्रा, आंतरराष्ट्रीय मॉडेल अ‍ॅड्रिया डायकोन, रोझी हंटीग्टन-व्हिटले या नीरव मोदीच्या बँ्रड अ‍ॅम्बेसेडर आहेत. न्यू यॉर्क, पॅरिस, लंडन येथेही नीरव मोदी दागिन्यांची प्रदर्शने आयोजित करतो.
मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांत नीरव मोदी बँ्रडचे स्वत:चे
शोरूम्स आहेत. अतिशय विलासी जीवनशैलीसाठी नीरव मोदी जगभर प्रसिद्ध आहे.

Web Title: Raids on Neerav Modi's offices; Property worth Rs. 5,100 crores seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.