गोविंदांची प्रायोजकत्वासाठी पदरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:43 AM2017-08-13T03:43:26+5:302017-08-13T03:43:36+5:30

उच्च न्यायालयाच्या निर्णयाने पुन्हा एकदा गोविंदा पथकांमध्ये उत्साह संचारला खरा, मात्र आता उत्सव साजरा करण्यासाठी पैशांची जमवाजमव करताना नाकीनऊ येत आहेत.

Pudrod for sponsoring Govind | गोविंदांची प्रायोजकत्वासाठी पदरमोड

गोविंदांची प्रायोजकत्वासाठी पदरमोड

googlenewsNext

मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्णयाने पुन्हा एकदा गोविंदा पथकांमध्ये उत्साह संचारला खरा, मात्र आता उत्सव साजरा करण्यासाठी पैशांची जमवाजमव करताना नाकीनऊ येत आहेत. बड्या प्रायोजकांचे उंबरठे झिजवूनही पदरी निराशा येत असल्याची खंत गोविंदा पथकांनी व्यक्त केली आहे. परिणामी, आता पथकातील गोविंदांनीच पदरमोड करीत अर्थकारणाची गाडी पुढे रेटत असल्याचे चित्र आहे.
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवासाठी वाहन, विमा, टी-शर्ट्स, बॅनर्स, जेवण, नाश्ता या सगळ्याचेच व्यवस्थापन पाहावे लागते. परंतु, यंदा न्यायालयाच्या संभ्रमामुळे याची तयारीच गोविंदा पथकांनी केली नव्हती. आता ७ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अचानक उत्साहाचे, जोशाचे वातावरण गोविंदा पथकांमध्ये दिसून आले. या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांनी प्रायोजक मिळविण्यासाठी धावाधाव सुरू केली. पण त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. राजकारणी असो वा संस्था, संघटना असो, अजूनही त्यांच्यामध्ये दहीहंडीच्या न्यायालयीन प्रक्रियेविषयी संभ्रम असल्याने कोणीच पुढाकार घेत नसल्याची व्यथा वेगवेगळ्या पथकांतील गोविंदांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
एकीकडे दोन दिवसांवर उत्सव आल्याने सरावावर लक्ष केंद्रित करायचे आहे, पण दुसºया बाजूला व्यवस्थापनही कासवगतीने सुरू असल्याने गोविंदा पथकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. आता तरी मराठी सणांसाठी, मराठी माणसांसाठी आवाज उठविणाºया लोकप्रतिनिधींनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी गोविंदा पथकांची मागणी आहे. जेणेकरून हा उत्सव साजरा करण्यास गोविंदा पथकांना हातभार लागेल.

वीकेंडला गोविंदांचा सराव जोमात
न्यायालयाच्या कचाट्यातून सुटलेल्या दहीहंडी उत्सवाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. त्यामुळे आता उत्सवापूर्वीच्या शेवटच्या वीकेंडला गोविंदा पथकांनी कसून सराव करायचे ठरविले. यानंतर, शनिवार-रविवारी शहर, उपनगरांत गोविंदा पथके जोशात सराव करताना दिसून आली. दहीहंडी उत्सवावर उंचीचे निर्बंध नसल्याने, आता पूर्वीप्रमाणेच ‘थरथराट’ होणार असल्याने, गोविंदा पथकांनी सरावालाच ६-७ थरांची मजल गाठली आहे.
न्यायालयीन निर्बंध आणि संभ्रमावस्था नसल्याने, यंदा गोविंदा पथकांतील उत्साह वेगळाच दिसून येत आहे. शहर-उपनगरातील प्रसिद्ध गोविंदा पथकांचा सराव पाहण्यासाठी, त्यांच्या प्रशिक्षकांकडून धडे गिरविण्यासाठी काही छोटी गोविंदा पथकेही अशा सरावांना आवर्जून हजेरी लावतात. या माध्यमातून थरांची रचना, थर लावण्याची पद्धत आणि एक्के उचलण्याची पद्धत यांचे निरीक्षण करून, लहान गोविंदा पथके शिकत असतात. मोठ्या गोविंदा पथकांकडून लहान आणि नव्याने सुरुवात करणाºया गोविंदा पथकांची शिकण्याची पद्धत फार पूर्वापारपासून चालत आली आहे.
याशिवाय, वीकेंड असल्याने शनिवारी रात्री बाराच्या ठोक्यापर्यंत दहीहंडीचा सराव सुरू असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे, या सरावानंतर बºयाचदा पथकातील गोविंदा एकत्र येऊन, उत्सवाचे व्यवस्थापन करण्याविषयी चर्चा करताना दिसतात, तसेच रविवारीही काही ठिकाणी सकाळी, तर काही पथकांकडे दुपारी सुरू झालेला दहीहंडीचा सराव, सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असतो. या शेवटच्या सरावाच्या वेळी पथकाकडून जेवण, न्याहारीचेही आयोजन करण्यात येते.

Web Title: Pudrod for sponsoring Govind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.