सुविधा पुरविता का... सुविधा! एसआरएतील रहिवाशांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:48 AM2018-07-10T04:48:12+5:302018-07-10T04:48:25+5:30

मालाड पूर्वेकडील जानू भोये नगरात असलेल्या एसआरएच्या सहा इमारतींत २ हजार १०० हून अधिक रहिवासी वास्तव्य करतात.

 Providing convenience ... facility! Voice of SRA residents | सुविधा पुरविता का... सुविधा! एसआरएतील रहिवाशांचा आवाज

सुविधा पुरविता का... सुविधा! एसआरएतील रहिवाशांचा आवाज

Next

मुंबई : मालाड पूर्वेकडील जानू भोये नगरात असलेल्या एसआरएच्या सहा इमारतींत २ हजार १०० हून अधिक रहिवासी वास्तव्य करतात. मात्र, पाणीगळती, उघडी गटारे, अग्निशमन यंत्रणांचा अभाव, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची दुरवस्था, टेरेस लिकेज होण्याच्या समस्यांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. विकासकाने इमारत बांधून राहण्याची व्यवस्था करून दिली. मात्र, इमारतीत सुख-सुविधा नसल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
एसआरए योजनेंतर्गत २०१४ मध्ये येथे रहिवासी वास्तव्यास आले. मात्र, राहायला आल्यापासून आजतागायत त्यांना अनेक समस्या उद्भवत आहेत. बी-हायवे व्ह्यु लगत असलेली भिंत मोडकळीस आली आहे. गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी हायवे व्ह्यु इमारतीच्या परिसरात जमा होते. इमारतीच्या परिसरातील पेव्हर ब्लॉक समांतर बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून तळे निर्माण होते. इमारतीतून पश्चिम द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध आहे. परंतु हा मार्ग बंद असल्याने रहिवाशांची गैरसोय होते. तसेच येथील इलेक्ट्रिकल रूममधील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून त्याची दुरवस्था झाली आहे.
याबाबत स्थानिक नगरसेवक विनोद मिश्रा म्हणाले, ५ एप्रिल २०१७ रोजी संबंधित प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार केला. पत्रात इमारतीची जी काही दुरुस्तीची काही कामे असतील ती त्वरित पूर्ण करावीत, असे नमूद केले होते. येथे २३ मजली इमारत असून १४ मजल्यापर्यंतच्या घरांमध्ये छतगळती होते. सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने दोन वर्षांपूर्वी एका मुलाचा मृत्यू झाला होता. आगीची दुर्घटना घडली तर अग्निशमन दलाची यंत्रणा इमारतीमध्ये पोहोचणे शक्य नाही. रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही, तर एसआरएविरोधात आंदोलन छेडू.

वीज बिल भरलेले नाही. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची उंची जमिनीलगत आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी या टाकीमध्ये जाते. पाण्याच्या टाकीजवळून गटाराची लाइन जात असल्याने सांडपाणी पिण्याच्या टाकीत जमा होते.
- केरुबा कट्टे, रहिवासी.

पावसाळा सुरू झाला की घरामध्ये पाणीगळती सुरू होते. सतत जमिनीवर पाणी पडल्याने लादीवरून घसरून पडण्याची शक्यता आहे. घरातील हॉल, बाथरूम, बेडरूम या जागी पाण्याची गळती होते.
- संतोष साळवी, रहिवासी.

Web Title:  Providing convenience ... facility! Voice of SRA residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई