स्पर्धा परीक्षांची तयारी १०वी, १२वीला करा!

By admin | Published: June 1, 2017 04:28 AM2017-06-01T04:28:34+5:302017-06-01T04:28:34+5:30

विद्यार्थ्यांनी जर दहावी-बारावीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि पुढे साधे तीन वर्षांचे बी.ए., बी.कॉम किंवा बी.एस.सी. केले. तसेच

Preparation of competition exams should be 10V, 12V! | स्पर्धा परीक्षांची तयारी १०वी, १२वीला करा!

स्पर्धा परीक्षांची तयारी १०वी, १२वीला करा!

Next

विद्यार्थ्यांनी जर दहावी-बारावीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि पुढे साधे तीन वर्षांचे बी.ए., बी.कॉम किंवा बी.एस.सी. केले. तसेच नंतर स्पर्धा परीक्षा दिली, तर ते कमी वयात अधिकारीपदापर्यंत पोहोचू शकतात.

अलीकडे सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. कुठल्याही नोकरीसाठी वा अभ्यासक्रमासाठी स्पर्धेतूनच जावे लागते. अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्याव्या लागतात. स्पर्धा परीक्षांची तयारी जर दहावी-बारावीपासून केली, तर त्याचा खूप फायदा होतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने या परीक्षांची काठिण्य पातळी ही वाढत आहे.
स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी कमीत कमी चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे यश पदरी पडते. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. अलीकडे बहुतांश विद्यार्थी हे मेडिकल व इंजिनीअरिंगला प्राधान्य देतात व त्यानंतर ते स्पर्धा परीक्षांकडे वळतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तर आता बहुतांश मुले ही अभियांत्रिकी शाखेची पदवीधर नियुक्त झाली आहेत. अशा विद्यार्थ्यांनी जर दहावी-बारावीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केली व पुढे साधे तीन वर्षांचे बी.ए., बी.कॉम किंवा बी.एस.सी. केले व नंतर स्पर्धा परीक्षा दिली, तर ते कमी वयात अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकतात. बरेच विद्यार्थी बारावीनंतर चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे परत चार-पाच वर्षे अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत. जर दहावी-बारावीपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमास सुरुवात केली, तर पदवी होईपर्यंत विद्यार्थ्यांचा जवळपास ५० टक्के स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पूर्ण करणारे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होतील.
जे विद्यार्थी कमी वयात अधिकारी होतील, ते सहजपणे सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात. राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड हे वयाच्या २४-२५व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यामुळे ते मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचले. अनेक जण पदवी शिक्षणानंतर खासगी नोकरी पत्करतात व त्यानंतर दोन-तीन वर्षांनंतर स्पर्धा परीक्षेकडे वळतात. त्यामुळे त्यांची द्विधा मन:स्थिती होते. परिणामी, त्यांच्याकडून एकही धड होत नाही. काही विद्यार्थ्यांना तर खासगी नोकरी केल्यानंतर आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वात बदल होतो, असे वाटते. ते अगदी खरे आहे. वाचन, लेखन, बैठका, नियोजन यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. याचा मुलाखतीसाठी उपयोग होऊ शकतो; परंतु नोकरीमध्ये गेलेला वेळ भरून निघत नाही. परिणामी, आपली उशिराने निवड होऊ शकते. त्यामुळे नोकरी न करता लगेच पदवी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायला हरकत नाही; पण शक्यतो दहवी-बारावीपासून तयारी करणे कधीही चांगले! बऱ्याचदा पाल्यांना पुढे स्पर्धा परीक्षांसाठी पाठवायचे असल्याने, दहावी नंतर कला का विज्ञान निवडावे? असा प्रश्न पडतो. खरे तर विद्यार्थ्यांनी दहावी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा. विज्ञान शाखेमुळे इंग्रजी सुधारते, त्याचप्रमाणे अधिक अभ्यास करण्याची सवय लागते. बारावी नंतर मात्र ज्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊनच करिअर करायचे आहे, त्यांनी मात्र विनाकारण वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेकडे वळून आपला वेळ खर्ची घालवू नये. तसेच दुसऱ्या एका विद्यार्थ्याची जागा वाया घालवू नये. त्यांनी सरळ बी.ए., बी.कॉम किंवा बी.एस.सी.ला प्रवेश घ्यावा. जर आपण दहावी-बारावीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, तर निश्चितपणे जीवनामध्ये कोणती ना कोणती, ‘वर्ग-१’ अथवा ‘वर्ग-२’ पदाची नोकरी हमखास मिळू शकते.
- डॉ. बबन जोगदंड,
लेखक हे ‘यशदा’ या संस्थेत संशोधन अधिकारी आहेत.

Web Title: Preparation of competition exams should be 10V, 12V!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.