टोलवाटोलवीचे राजकारण थांबवा; प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला प्रतिउत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 06:01 PM2019-03-04T18:01:05+5:302019-03-04T18:13:19+5:30

संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याची बहुजन वंचित आघाडीची मागणी केंद्रीय काँग्रेसला मान्य आहे का, त्यांची या मागणीबाबत काय भूमिका आहे, असा थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Prakash Ambedkar reply to the Congress | टोलवाटोलवीचे राजकारण थांबवा; प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला प्रतिउत्तर

टोलवाटोलवीचे राजकारण थांबवा; प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला प्रतिउत्तर

Next
ठळक मुद्दे'संघाबाबत तुमच्या हायकमांडचे मत काय?' 'संविधान वाचविणे म्हणजे केवळ सत्तेवर येणे नव्हे. ''काँग्रेससोबत आघाडी झाली पाहिजे, हीच भूमिका आम्ही वारंवार मांडली.'

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची बहुजन वंचित आघाडीची मागणी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला मान्य आहे का, असा थेट सवाल करतानाच हा राज्यपातळीवरील निर्णय नाही. संघाबाबतचा मसुदा तयार करण्यासाठी काँग्रेसच्या महाआघाडीतील घटकपक्षांतील कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच,  टोलवाटोलवीचे राजकारण थांबवण्याचा इशाराही काँग्रेसला दिला आहे.

संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याचा मसुदा दिल्यास काँग्रेससोबत जाण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार केली होती. यावर आपणच तसा मसुदा द्या, असे लेखी पत्र काँग्रेस आघाडीकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी २८ फेब्रुवारीला पाठविले होते. त्यांच्या या पत्राला प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर उत्तर पाठविले आहे. संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याची बहुजन वंचित आघाडीची मागणी केंद्रीय काँग्रेसला मान्य आहे का, त्यांची या मागणीबाबत काय भूमिका आहे, असा थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संघाबाबतची वंचित बहुजन आघाडीची मागणी गांभीर्याने घेतली गेली नसल्याचा आरोप करतानाच काँग्रेसकडे वकीलांची फौज असताना त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले नाही. उलट मलाच उपाय विचारणे म्हणजे चेंडू माझ्या कोर्टात ढकलण्यासारखे आहे. या प्रश्नावर राजकारण न करता काँग्रेसमधील विधीतज्ज्ञांचा सल्ला हाच प्राथमिक मसुदा म्हणून चर्चेला घेत पुन्हा एकदा आघाडीच्या चर्चेला सुरूवात करता येईल, असेही आंबेडकर यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

काँग्रेससोबत आघाडी झाली पाहिजे, हीच भूमिका आम्ही वारंवार मांडली. गेल्यावर्षी जुलैमध्ये आम्ही ही भूमिका घेतली त्यानंतर सप्टेंबरपर्यंत काँग्रेसने प्रतिसादच दिला नाही. त्यानंतर एम आय एम सोबत आम्ही आघाडी केली. ओवेसींना रझाकारांचा पक्ष म्हणून विरोध करताना देशाची फाळणी करणाऱ्या मुस्लीम लीगशी आणि महाराष्ट्रात भाजपा सरकारला टेकू देणाऱ्या राष्ट्रवादीशी काँग्रेसने आघाडी केल्याची आठवणही आंबेडकर यांनी पत्रात करून दिली. संघाबाबतची भूमिका स्पष्ट केल्यास निवडणुकीच्या आखाड्यातून बाजूला होण्याची घोषणा ओवेसी यांनी जाहीर सभेत केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर राजकारण करू नका, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सुनावले आहे.

छोट्या पक्षांना शेवटच्या दिवसापर्यंत खेळवत ठेवायचे आणि निवडणुकीतून बाद करायचे ही काँग्रेस नेत्यांची खेळी आपण अन्य राज्यात पाहिली आहे. त्यामुळे टोलवाटोलवी न करता धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहनही आंबेडकर यांनी पत्रातून केले आहे.

- पहिल्या बैठकीत मांडलेल्या तीन मुद्दयांवर उत्तर दिले नाहीत. प्रदेश काँग्रेस केंद्राच्यावतीने बोलत आहे का, यावर आम्ही परवानगी घेऊन बोलू, असे उत्तर तेंव्हा दिले. आजतागायत जागावाटप सोडून कशावरही कळविले नाही. आमच्या तीनही मुद्दयावर खुलासा नाही उलट अनौपचारिक बैठकीतील चर्चेनंतर  दोनपेक्षा एकही जागा जादा सोडणार नसल्याच्या बातम्या काँग्रेसने पेरल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात केला आहे.

- संविधान वाचविणे म्हणजे केवळ सत्तेवर येणे नव्हे. भाजपा शिवसेना युतीला हरवताना घराणेशाही न राहता वंचित घटकांना सत्तेत स्थान मिळणे महत्चाचे आहे. धनगर माळी साळी वंजारी मुस्लिम लहान ओबीसी यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस जिथे सलग तीनवेळा हरली त्याच बारा जागा मागितल्या, अशी आठवणही आंबेडकरांनी पत्रात करून दिली.

- प्रश्न केवळ जागेचा नाही.  गांधीवादावर चालणारा काँग्रेस पक्ष जेंव्हा हिंदुत्ववादी बनू लागतो तेंव्हा या देशातील धर्मनिरपेक्षतेची जागा संकुचित होऊ लागते.  संविधान निर्मितीत काँग्रेसचे मोठे योगदान. आज संविधानाला सर्वांत मोठे आव्हान निर्माण झाले असताना काँग्रेस संघासारख्या संघटनांना संविधानाच्या चौकटीत अाणण्याची चर्चाही व्यापक पातळीवर करायला काँग्रेस तयार नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Web Title: Prakash Ambedkar reply to the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.