Prabhadevi Temple 300 Years! | प्रभादेवी मंदिराला ३०० वर्षे!
प्रभादेवी मंदिराला ३०० वर्षे!

मुंबई : मुंबईची सांस्कृतिक परंपरा जोपासणारी तसेच प्रभादेवीवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी मंदिराला ३०० वर्षे पूर्ण होत असून, देवीचा त्रिशतकोत्तर वर्धापन दिन सोहळा २९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.
प्रभादेवीच्या प्रभावती देवीचा फार जुना इतिहास आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शाखंभरी पौर्णिमेला प्रभादेवी मातेची यात्रा असते. ही यात्रा म्हणजे प्रभादेवी परिसरातील नागरिकांसाठी मोठा उत्सव असून, देवीची यात्रा आजही मुंबईची सांस्कृतिक परंपरा जोपासत आहे.
बाराव्या शतकात देवीला शाकंबरी नावाने ओळखले जात होते. गुजरातमधील यादवांचा राजा बिंब यांची ती कुलस्वामिनी होती. मुघल साम्राज्यांनी गुजरातमध्ये जेव्हा आक्रमण केले त्या वेळेस ती मूर्ती कर्नाटकमध्ये हलविण्यात आली होती. तिथून पुढे ती मूर्ती माहीमच्या खाडीत वाहत येऊन आता जिथे प्रभावती देवीचे वास्तव्य आहे; त्याशेजारील विहिरीत वाहत आली. तब्बल सहा शतकांनंतर श्याम नायक यांच्या स्वप्नात येऊन प्रभावती देवीच्या रूपात त्यांना दर्शन झाले. प्रभादेवी परिसराला ज्या देवीमुळे नाव प्राप्त झाले त्या प्रभावती देवीची स्थापना वैशाख शुद्ध एकादशीला सन १७१६ साली पाठारे प्रभू समाजातील श्याम नायक यांनी केली.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभावती देवी, चंडिका देवी व कालिका देवी अशा देवीच्या तीन मूर्ती असून, लक्ष्मी नारायण, शिव लिंग, हनुमंताची व खोकला देवीच्या मूर्तीची स्थापना मंदिरात करण्यात आली आहे. गोल्फादेवी, प्रभादेवी व जाखादेवी अशा या तीन बहिणी. या देवींमुळे वरळी, प्रभादेवी, दादर परिसराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले
आहे.
प्रभावती देवी अनेक ज्ञाती-समाजाची कुलदेवता असल्याने विविध जाती-धर्मांतील लोक दूरहून देवीची ओटी भरण्यासाठी येतात. प्रभावती देवीच्या त्रिशतकोत्तर सोहळ्यानिमित्ताने मंदिरात असणाऱ्या प्रभावती-चंडिका-कालिका देवीला वस्त्र परिधान करून विविध सुवर्ण अलंकारांचा साज चढविण्यात आला आहे. तर मंदिराला केलेल्या रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे. प्रभावती देवीच्या वर्धापन दिनी उद्योजक चेतन खाटपे व सचिन खाटपे यांच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने ५ हजार महिलांची ओटी भरण्यात येणार आहे, असे प्रभादेवी जन समितीचे अध्यक्ष धनंजय खाटपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


Web Title: Prabhadevi Temple 300 Years!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.