वीजग्राहकांना ‘बेस्ट’ दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 02:49 AM2018-08-08T02:49:53+5:302018-08-08T02:50:16+5:30

कंपन्यांचे वीजदरवाढीचे प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर झाले असतानाच, आता बेस्टने आयोगाकडे दाखल केलेल्या प्रस्तावानुसार, बेस्टचे वीजदर कमी होणार आहेत.

Power Consumers 'Best' console | वीजग्राहकांना ‘बेस्ट’ दिलासा

वीजग्राहकांना ‘बेस्ट’ दिलासा

googlenewsNext

मुंबई : भांडुप, मुलुंड येथे वीजपुरवठा करत असलेल्या महावितरणसह उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या वीज कंपन्यांचे वीजदरवाढीचे प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर झाले असतानाच, आता बेस्टने आयोगाकडे दाखल केलेल्या प्रस्तावानुसार, बेस्टचे वीजदर कमी होणार आहेत. तसा दावाच बेस्ट प्रशासनाने केला असून, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा प्रस्तावित वीजदर ७ रुपये ६९ पैसे प्रतियुनिट, तर २०१९-२० साठीचा प्रस्तावित वीजदर ६ रुपये ७४ पैसे प्रतियुनिट एवढा आहे.
आर्थिक वर्ष २०१६-१७ करिता बेस्ट उपक्रमाचा सरासरी वीजदर १० रुपये ३३ पैसे प्रतियुनिट इतका होता. आर्थिक वर्ष २०१७-१८ करिता सरासरी वीजदर ८ रुपये २६ पैसे प्रतियुनिट झाला. २०१६-१७ पेक्षा आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सरासरी वीजदर २ रुपये ७ पैसे इतका कमी झाला. आता आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा प्रस्तावित वीजदर ७ रुपये ६९ पैसे प्रतियुनिट असून, २०१९-२० साठीचा ६ रुपये ७४ पैसे प्रतियुनिट एवढा आहे. या संदर्भातील प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, प्रस्तावानुसार बेस्टचे वर्गवार वीजदर हे इतर वीज कंपन्यांच्या वीजदरांपेक्षा कमी आहेत, असा दावा बेस्टने केला आहे.
>प्रस्ताव मंजुरीसाठी
बेस्टचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, प्रस्तावानुसार बेस्टचे वर्गवार वीजदर हे इतर वीज कंपन्यांच्या वीजदरांपेक्षा कमी आहेत, असा दावा बेस्टने केला आहे.
>विद्युत वितरण क्षमता १७ मेगावॅटने वाढली
परिवहन विभाग तूट वसुली आकार वीजदरातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आॅक्टोबर २०१६ पासून वसूल करणे बंद करण्यात आले आहे.
प्रकाश व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ७/९ वॅटचे १.१३ लाख एलईडी बल्ब, २० वॅटच्या १,७८४ एलईडी ट्यूबलाइट, ५० वॅटचे १३१ पंख्यांचे वाटप बेस्टने केले आहे. परिणामी, १.२६ दशलक्ष युनिटची बचत झाली आहे. विजेच्या कमाल मागणीमध्ये ३.५ मेगावॅटची घट झाली आहे.
भारनियमन टाळण्यासह विजेच्या मागणी आणि पुरवठा यातील तफावत टाळण्यासाठी बेस्टने खुल्या बाजारातून अल्प मुदतीची ऊर्जा खरेदी करणे सुरू केले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या वीजग्राहकांमध्ये १.२१ टक्के वाढ झाली आहे. युनिट विक्रीमध्ये ३.२१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
२४ नवीन उपक्रेंद्र स्थापन करण्यात येत असून, यामुळे विद्युत वितरण क्षमता १७ मेगावॅटने वाढली आहे.
मुंबई शहरातील ४० हजार ८३७ पथदिव्यांचे एलईडीमध्ये रूपांतरण करण्यात येत आहे. आतापर्यंत १३ हजार ७९२ पथदिवे बदलण्यात आले असून, यासाठी २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने बेस्टला याकरिता ६.६१ कोटी दिले आहेत.
थकीत वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या योजनेंतर्गत १.९२ कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली.
बेस्टने मुंबई शहरातील विविध ठिकाणी मेट्रो प्रकल्पासाठी ४ हजार ४५२ किलोवॅट भाराची जोडणी देण्यात आली.
>विजेचे दर कमी झाले; कारण...
बेस्ट यापूर्वी वीज दरातून वाहतूक चार्ज वसूल करत होते. मात्र आता त्यांना तो चार्ज वसूल करता येत नाही. परिणामी हा एक घटक वीज दर कमी होण्यास कारणीभूत आहे. दुसरे असे की टाटाचे एक युनिट बंद पडले असतानाच बेस्टने खुल्या बाजारातून वीज खरेदी केली; ही वीज त्यांना स्वस्त दराने खरेदी करता आली. हा आणखी एक घटक वीजदर कमी होण्यास कारणीभूत आहे. तिसरे असे की, कोळशाच्या किंमती कमी झाल्याने बेस्टला कमी दरात विजेची खरेदी करता आली. या तिन्ही घटकांचा विचार करता बेस्टने कमी किंमतीत वीज विकत घेतली. त्यामुळे त्यांना वीज कमी दराने देणे शक्य आहे, अशी माहिती वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी दिली.

Web Title: Power Consumers 'Best' console

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज