वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 10:32 AM2018-07-10T10:32:47+5:302018-07-10T10:34:35+5:30

पालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे चिमुरड्यानं जीव गमावला

potholes kills five year old in kalyan | वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात!

वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात!

मुंबई : रस्त्यांवरील खड्डे पावसात जीवघेणे ठरत आहेत. महेश आठवले यांनी गेल्याच महिन्यात याचा कटू अनुभव घेतला. हा वेदनादायी अनुभव त्यांना आयुष्यभर लक्षात राहिल. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महेश यांनी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गमावला. कल्याणमध्ये ही घटना घडली. मात्र तरीही अद्याप पालिका प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा काल याच ठिकाणी अपघात झाला आणि त्यात एका महिलेचा जीव गेला. 

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे नवीन नाहीत. मात्र पावसात हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. 2 जूनला महेश आठवले त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आरवसोबत दुचाकीवरुन जात होते. कल्याणमधील शिवाजी चौक आणि सहजानंद चौक यांच्या दरम्यान असलेल्या खड्ड्यांमुळे मागे बसलेला आरव दुचाकीवरुन खाली पडला. तितक्यात मागून येणाऱ्या ट्रकनं आरवला चिरडलं. पावसाचं तुंबलेलं पाणी आणि त्यामुळे न दिसलेले खड्डे यांच्यामुळे हा अपघात झाला. त्यात चिमुरड्या आरवचा निष्कारण बळी गेला. 

काल आरवचे वडील महेश अपघातस्थळी आले. त्यांनी आरवला आवडणारा दही-भात रस्त्यावर ठेवला. हे दृश्य पाहून अनेकांच्या पापण्या ओलावल्या. मन हेलावून टाकणारं हे दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. मात्र एका चिमुरड्याचा जीव जावूनही पालिका प्रशासनाला जाग आलेली नाही. आपल्यावर ओढवलेली परिस्थिती इतर कोणावरही ओढावू नये, यासाठी महेश यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला पत्र लिहिलं. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. पालिकेनं खड्डे बुजवलेले नाहीत. त्यामुळे सोमवारी एका दुचाकीस्वाराचा तोल गेला. दुचाकीवर बसलेली महिला रस्त्यावर पडली आणि मागून येणाऱ्या बसनं तिला चिरडलं. पावसातील खड्डे आणखी किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला. 
 

Web Title: potholes kills five year old in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.