माणुसकीच्या वेशातील खाकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:22 AM2018-05-10T05:22:01+5:302018-05-10T05:22:01+5:30

पोलीस भरतीची परीक्षा देऊन घराकडे परतत असलेल्या चौघींना माणुसकीच्या वेशातील खाकीचा अनुभव आल्याचे पाहावयास मिळाले. अपघातानंतर पोलिसांनी चौघींना रुग्णालयात दाखल केले. केवळ रुग्णालयात दाखल करून न सोडता, पोलिसांनी त्यांच्या शेजारी रात्रंदिवस जागून त्यांची काळजी घेतली.

 Police Humanity News | माणुसकीच्या वेशातील खाकी...

माणुसकीच्या वेशातील खाकी...

Next

मुंबई - पोलीस भरतीची परीक्षा देऊन घराकडे परतत असलेल्या चौघींना माणुसकीच्या वेशातील खाकीचा अनुभव आल्याचे पाहावयास मिळाले. अपघातानंतर पोलिसांनी चौघींना रुग्णालयात दाखल केले. केवळ रुग्णालयात दाखल करून न सोडता, पोलिसांनी त्यांच्या शेजारी रात्रंदिवस जागून त्यांची काळजी घेतली. प्रसंगी स्वत:च्या खिशातील पैसे मोडून अगदी मुलीप्रमाणे तिला हव्या त्या औषधांसाठी धडपड केल्याचे यात जखमी झालेल्या महिला उमेदवार चैत्राली पांगे हिने सांगितले. यात चैत्रालीसह काजल करडे (१९), दीपाली काळे (१९) या चौघींचा भरधाव कारच्या धडकेत अपघात झाला. यापैकी चैताली आणि काजलला घरी सोडण्यात आले आहेत, तर चैत्राली आणि दीपालीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर पोलिसांनी जखमी मुलींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, खेडोपाड्यांतून आलेल्या मुलींच्या कुटुंबीयांसोबत संपर्क होत नव्हता. रात्री उशिराने संपर्क झाला. अशात मुंबईत येईपर्यंत पालकांना दुसरा दिवस उजाडणार असल्याने, तेथे तैनात असलेल्या पोलिसांनीच त्यांची पालकांप्रमाणे अगदी प्रेमाने काळजी घेतली. रात्रीही या मुलींच्या शेजारी जागून पोलिसांनी त्यांची देखरेख केली. प्रसंगी स्वत:च्या खिशातील पैसे मोडून मुलींची काळजी घेतल्याचे चित्र या वेळी पाहावयास मिळाल्याचे चैत्रालीचे वडील संतोष पांगे यांनी सांगितले. चैत्रालीनेही पोलिसांच्या या प्रेमळ, वात्सल्यपूर्ण भूमिकेबाबत आदर व्यक्त केला. तसेच त्यांच्यामुळे मोलाचा आधार मिळाल्याचेही तिने सांगितले.

मुलीला पाहून जिवात जीव आला...
पुण्याच्या निमगाव या खेडेगावात आईवडील आणि भावंडासोबत चैत्राली संतोष पांगे राहते. पांगे हे शेतकरी आहेत. मुलीच्या पोलीस होण्याच्या हट्टापायी त्यांनी शिरुळ येथील अकॅडमीमधून तिचे शिक्षण सुरू केले. तिला पोलीस भरतीसाठी पाठविले. सकाळीच मुलीसोबत बोलणे झाले. परीक्षा व्यवस्थित पार पडली आणि घराकडे निघणार असल्याचे तिने फोन करून सांगितले. रात्री तिच्या अपघाताच्या कॉलने धक्काच बसला. मुंबईत जवळचे कोणी नाही. त्यात तिची बॅग, कपडेही मैत्रिणी घेऊन गेल्या. मुलीची काळजी कोण घेणार या विचाराने आम्ही हादरून गेलो होतो. पोलीस आम्हाला धीर देत होते. सकाळी रुग्णालय गाठून मुलीला पाहिले आणि जिवात जीव आल्याचे पांगे यांनी सांगितले. आम्ही येण्यापूर्वीच पोलीस तिची मुलीप्रमाणे काळजी घेताना दिसले. त्यामुळे खूप धीर आल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title:  Police Humanity News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.