विद्यार्थ्यांचे इंग्रजी नाटकांचे परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:43 AM2018-12-25T03:43:32+5:302018-12-25T03:43:55+5:30

मराठी शाळेमध्ये जाऊन आपली मुले इंग्रजी फाडफाड बोलू शकणार नाहीत आणि मग स्पर्धेतही ती टिकणार नसल्याची भीती पालकांच्या मनात असल्याने मराठी शाळेकडील पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे.

Performance of students' English dramas | विद्यार्थ्यांचे इंग्रजी नाटकांचे परफॉर्मन्स

विद्यार्थ्यांचे इंग्रजी नाटकांचे परफॉर्मन्स

Next

मुंबई : मराठी शाळेमध्ये जाऊन आपली मुले इंग्रजी फाडफाड बोलू शकणार नाहीत आणि मग स्पर्धेतही ती टिकणार नसल्याची भीती पालकांच्या मनात असल्याने मराठी शाळेकडील पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. या मराठी हायस्कूलमध्ये ज्या पालकांची मुले आहेत त्या पालकांना मात्र ही भीती नाही. कारण विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील इंग्रजीबद्दलची भीती ओळखून गेल्या तीन वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवला जातोय.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती गायब होऊन त्यांना उत्तम इंग्रजीचे धडे मिळत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाळेतील नववी आणि दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक-पालक सभेत इंग्रजी नाटक सादर केले, इंग्रजीत भाषण केले; आणि पीपीटीद्वारे अस्खलित इंग्रजीत सादरीकरणही केल्याची माहिती शाळेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.
जून २०१६ पासून मराठी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण अभ्यासक्रम’ राबवण्यास सुरुवात केली, अशी माहिती स्पोकन इंग्लिश संभाषण वर्ग घेण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या चार तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या फॅकल्टीजची शाळेने या उपक्रमासाठी नेमणूक केली आहे.
दर आठवड्याला शाळेच्या नेहमीच्या वेळेतच हे प्रशिक्षक स्पोकन इंग्रजीच्या दोन तासिका घेतात. या दोन तासिकांमध्ये भाषिक खेळ (गेम्स), वादविवाद (डिबेट), गट चर्चा (ग्रुप डिस्कशन), भूमिका वठवणे (रोल प्ले) अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांना इंग्रजीत संभाषण साधण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याचे स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षक राकेश दमानिया यांनी सांगितले.
हा उपक्रम सुरू केला तेव्हा काही विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाची इंग्रजी पाठ्यपुस्तकेही वाचता येत नव्हती, अशी स्थिती होती. मात्र आता हेच विद्यार्थी इंग्रजी भाषेतील अवांतर गोष्टीची पुस्तकेही वाचू लागले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेने इंग्रजी पुस्तकांची एक पुस्तकपेढीसुद्धा बनविली आहे, अशी माहिती स्पोकन इंग्लिशच्या प्रशिक्षिका अमिता आचरेकर यांनी दिली. स्पोकन इंग्लिश उपक्रम सुरू केल्यानंतर गेल्या अडीच-तीन वर्षांत विद्यार्थ्यांमध्ये नेमका काय फरक झाला, यासाठी नुकतीच शाळेत या उपक्रमाची मूल्यांकन चाचणी घेण्यात आली. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा इंग्रजी शब्दसंग्रह (व्होकॅब्युलरी), इंग्रजी संभाषण (कन्व्हर्सेशन), इंग्रजी व्याकरण (ग्रामर), इंग्रजी वाचन (रीडिंग) यांची चाचणी घेण्यात आली. शाळेतील साठ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी इंग्रजीत संवाद साधू शकतात, असे या चाचणीतून स्पष्ट झाले.

प्रशिक्षकांशी इंग्रजीत व्हॉट्सअ‍ॅप संवाद!

काही विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलताना एखादा शब्द अडतो किंवा नेमका आठवत नाही. असे काही विद्यार्थी घरी गेल्यावर आम्हा प्रशिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून इंग्रजीत मेसेजेस पाठवितात आणि त्यांच्या अडचणी सांगतात, असे स्पोकन इंग्लिशच्या प्रशिक्षिका अमिता आचरेकर यांनी सांगितले. सोबतच शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शिक्षकांसाठीही दर आठवड्याला स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण वर्ग घेतला जात आहे.

Web Title: Performance of students' English dramas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी