शिवतीर्थावर गर्दीचा उच्चांक, ठाकरे गटात चैतन्य; दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचे मनोबल वाढविणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 06:20 AM2023-10-25T06:20:24+5:302023-10-25T06:20:53+5:30

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या मेळाव्यात ठाकरे गटाने जोरदार  शक्तिप्रदर्शन करून सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा प्रयत्न केला.

peak of crowd at shivtirth vitality in thackeray group dasara melava boosts uddhav thackeray morale | शिवतीर्थावर गर्दीचा उच्चांक, ठाकरे गटात चैतन्य; दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचे मनोबल वाढविणारा

शिवतीर्थावर गर्दीचा उच्चांक, ठाकरे गटात चैतन्य; दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचे मनोबल वाढविणारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची परंपरा ठाकरे गटाने यंदाही कायम राखली. शिवसेनेच्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला ठाकरेंशी निष्ठा कायम राखणाऱ्या शिवसैनिकांची मोठी गर्दी शिवाजी पार्कवर उसळली. ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘मर्दांचे एकच ठिकाण, शिवतीर्थ दादर’ अशा घोषणा देत या शिवसैनिकानी आपली निष्ठा दाखवून दिली. शिवतीर्थावरील गर्दीचा उच्चांक ठाकरे गटाचा उत्साह वाढविणारा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनोबल वाढविणारा ठरला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या मेळाव्यात ठाकरे गटाने जोरदार  शक्तिप्रदर्शन करून सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या फुटीनंतरचा हा दुसरा मेळावा होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून रेल्वे, खासगी गाड्या तसेच बसेसमधून आलेल्या शिवसैनिकांमुळे माटुंगा आणि दादरचा  परिसर ओव्हरपॅक झाला होता. गळ्यात भगवे उपरणे, डोक्यावर भगवी टोपी, हातात मशाल चिन्ह असलेला भगवा झेंडा आणि परिसरात लावलेल्या भगव्या झेंड्यामुळे शिवाजी पार्कचा परिसर भगवामय झाला होता. त्यातच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो... हम तुम्हारे साथ है... या शिवसैनिकांकडून दिल्या जाणाऱ्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

शिवसैनिकांनी आणल्या पेटत्या मशाली 

पेटती मशाली घेऊन साताऱ्याचे शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले. याच मशालीत गद्दारांना जाळू, असा निर्धार शिवसैनिकांनी बोलून दाखवला. त्याचप्रमाणे अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या शिवसैनिकांनीही मशाली आणल्या होत्या. मशाली घेऊन येणारे शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर नतमस्तक झाले.

पोलिसांची खबरदारी 

एक मेळावा मध्य मुंबईत, तर दुसरा दक्षिण मुंबईत होता. दोन्ही गटांमध्ये टोकाचे मतभेद असल्याने मुंबईत प्रवासादरम्यान कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता होती. यामुळे कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी उद्धव ठाकरे यांचे शिवतीर्थावर आगमन होताच शिवसैनिकांच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. उद्धव ठाकरेंच्या हस्ते शस्त्रपूजन झाल्यानंतर नेतेमंडळींनी त्यांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा दिल्या.

सेनाभवनसमोर सेल्फीसाठी गर्दी 

दादर रेल्वे स्थानकाहून येणारी ठाकरेंच्या सैनिकांची गर्दी शिवसेनाभवनजवळ थांबत होती. साक्ष म्हणून ते सेनाभवनाच्या साक्षीने ग्रुप फोटो तर कोणी सेल्फी काढत होते. त्यांच्यासाठी शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय जणूकाय सेल्फी पॅाइंटच बनले होते.

बाळासाहेब अवतरले...

शिवाजी पार्कवरील गर्दीत अचानक बाळासाहेब ठाकरे अवतरले. सफेद दाढी, गाॅगल, कपाळावर टिळा आणि त्यांनी घातलेल्या पेहराव्यामुळे ते हुबेहुब बाळासाहेबच दिसत होते. त्यांना पाहताच शिवसैनिकांनी गराडाच घातला. कांती मिश्रा असे त्यांचे नाव. ते पुण्यातील असून गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईत स्थायिक झाले आहेत.मिश्रा हे बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सिम भक्त असून ते दरवर्षी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येतात.

 

Web Title: peak of crowd at shivtirth vitality in thackeray group dasara melava boosts uddhav thackeray morale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.