Palghar bypoll 2018 : पालघरचे गोरखपूर होईल, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 11:55 AM2018-05-28T11:55:07+5:302018-05-28T11:55:07+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Palghar bypoll 2018 : Uddhav Thackeray Criticized on cm Devendra Fadnavis on palghar by election | Palghar bypoll 2018 : पालघरचे गोरखपूर होईल, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Palghar bypoll 2018 : पालघरचे गोरखपूर होईल, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ''मुख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून पालघर-गोंदियात निवडणुका जिंकण्यासाठी सत्ता राबवत आहेत. कितीही सत्तेचा माज गाजवा जे गोरखपूरला झाले तेच पालघरात घडेल व जे फुलपूर येथे झाले तेच गोंदियात घडेल. गोरखपुरात जनतेने फोडलेले तोंड घेऊन योगी आदित्यनाथ हे पालघरात प्रचारात उतरले व शिवरायांचा अपमान करून गेले. त्यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. नका बोलू, आज मतपेटीतून जनताच बोलेल आणि प्रभू श्रीराम हाती विजयाचा धनुष्यबाण घेऊन प्रत्येक मतपेटीतून बाहेर पडतील. पालघरचे गोरखपूरच होईल'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

- काय आहे आजचे सामना संपादकीय?
राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब अशा राज्यांत मध्यंतरी लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या व भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाचा झटका बसला. महाराष्ट्रातील पालघर आणि गोंदिया येथे दोन पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्राचा निकालही वेगळा लागणार नाही. शिवरायांचे राज्यदेखील परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकील. त्याच पद्धतीचा निकाल दोन्ही लोकसभा मतदारसंघांत लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे बेताल सरकार पालघर-गोंदियात ठाण मांडून बसले. पोलीस, महसूल यंत्रणा यांना हरकाम्यांसारखे वापरून निवडणूक लढवण्याचा त्यांचा उद्योग राज्याच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे. अर्थात या विकृतीवर त्यांच्या चिंतन शिबिरात कधीच चर्चा होणार नाही. राजकारणातले गजकर्ण खाजवत बसायचे व जमेल तसा आनंद घ्यायचा या भोगी वृत्तीचा स्वीकार भाजपने केला आहे. त्यामुळे त्यांच्या पांजरपोळात काय चालले आहे त्यात डोकावून बघण्यात आम्हाला तरी रस नाही. पालघरची पोटनिवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढत आहोत. ही लढाई स्वाभिमानाची व निष्ठेची आहे. पालघरात भारतीय जनता पक्षाने असा प्रचार चालवला आहे की ‘एक मत प्रामाणिकतेला; पालघर भाजपच्या परंपरेला’. मात्र प्रत्यक्षात भाजपने प्रामाणिकता व परंपरेचे थडगे बांधून त्या थडग्यावर काँग्रेसचे अफझलखान राजेंद्र गावीत यांना पहारेकरी म्हणून बसवले आहे, हा चिंतनाचा विषय आहे. 
दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी ठाणे-पालघर जिह्याच्या आदिवासी पट्ट्य़ात एकांड्य़ा शिलेदाराप्रमाणे हिंदुत्वाचा प्रचार केला. जनसंघापासून ते तलासरी, वाडा, मोखाडा, डहाणू या भागात वणवण फिरत राहिले. त्यासाठी स्वतःवरील आणि घरावरील निर्घृण हल्ले सहन केले. जय-विजयाची पर्वा न करता ते भाजपसाठी निवडणुका लढत राहिले. पराभवाने न खचता पुनः पुन्हा उठून उभे राहिले. अशा वनगांचे निधन झाले व भाजपने त्यांच्या कुटुंबीयांना टांग मारली. त्याच वनगांच्या चिरंजीवांनी म्हणजे श्रीनिवास यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेऊन मनगटावर शिवबंधन बांधले व आता पालघरात हाती धनुष्यबाण घेऊन ते लढत आहेत. यात आम्ही काय बेइमानी केली? हिंदुत्वाचा प्रवाह हिंदुत्वास मिळाला, पण काँग्रेसचे गटार तुम्ही तुमच्या प्रवाहात घेऊन कोणत्या नैतिकतेचा आव आणत आहात? असे घाणेरडे राजकारण करून तुम्ही काय प्रामाणिकतेची बूज राखलीत ते सांगा. संपूर्ण पालघरात तुम्हाला निवडणुका लढण्यासाठी एकही भाजपाई, संघ विचाराचा कार्यकर्ता मिळू नये? मुख्यमंत्री म्हणाले, वनगा यांची परंपरा चालवणे कठीण आहे. म्हणून वनगांची परंपरा चालवायला आम्ही गावीत यांना घेतले. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण काय बोलत आहात? आपण शुद्धीवर आहात काय? आपण जे गावीतांविषयी सांगत आहात तो संघ विचार मानायचा का? अट्टल काँग्रेसवाले गावीत यांना एका रात्रीत भाजपवाले बनवून चिंतामण वनगांची परंपरा पुढे नेणे म्हणजे समस्त संघ स्वयंसेवकांचा अपमान आहे. 
राजेंद्र गावीत यांनी संघपरंपरा पुढे नेणे म्हणजे ओवेसी किंवा आझम खानसारख्यांनी सरसंघचालकाची जागा घेण्यासारखे आहे. आता मुख्यमंत्री म्हणतील मला असे बोलायचेच नव्हते. याप्रकारे ते स्वतःच स्वतःला क्लीन चिट देऊन मोकळे होतील. सत्ता ही गोरगरीबांच्या कल्याणासाठी राबवावी. मुख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून पालघर-गोंदियात निवडणुका जिंकण्यासाठी सत्ता राबवत आहेत. अर्थात कितीही सत्तेचा माज गाजवा जे गोरखपूरला झाले तेच पालघरात घडेल व जे फुलपूर येथे झाले तेच गोंदियात घडेल. भाजप एका पिढीस कसे भ्रष्ट व दारूडे बनवत आहे ते पालघरला जाऊन श्री. मोदी यांनी प्रथम पाहावे. या भागात पैसा आणि दारूचा अमाप वापर केला गेला व मंत्री, आमदार त्या वाटपात सहभागी झाले. मुख्यमंत्री वसई-विरारच्या कथित दहशतवादावर बोलले, पण ज्यांच्याविषयी बोलले ते भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून विधानसभेत भाजपच्या मांडीवर बसले आहेत. मांडीवरचे मांडलिक आता काय करणार? त्यांचाही पराभव होईल. शिवसेनेवर घातलेला प्रत्येक घाव त्यांच्यावरच उलटेल. गोरखपुरात जनतेने फोडलेले तोंड घेऊन योगी आदित्यनाथ हे पालघरात प्रचारात उतरले व शिवरायांचा अपमान करून गेले. त्यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. नका बोलू, आज मतपेटीतून जनताच बोलेल आणि प्रभू श्रीराम हाती विजयाचा धनुष्यबाण घेऊन प्रत्येक मतपेटीतून बाहेर पडतील. पालघरचे गोरखपूरच होईल.

Web Title: Palghar bypoll 2018 : Uddhav Thackeray Criticized on cm Devendra Fadnavis on palghar by election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.