‘आमचे वेसाव्याला हाय शानदार शिमगा’

By admin | Published: March 11, 2017 03:49 AM2017-03-11T03:49:14+5:302017-03-11T03:49:14+5:30

आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. मुंबईतील वेसावे गावच्या होळीची मजा आणि पारंपरिक थाट काही औरच आहे. येथील हावली पाहण्यासाठी

'Our Vesavila will be fantastic' | ‘आमचे वेसाव्याला हाय शानदार शिमगा’

‘आमचे वेसाव्याला हाय शानदार शिमगा’

Next

- मनोहर कुंभेजकर,  मुंबई
आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. मुंबईतील वेसावे गावच्या होळीची मजा आणि पारंपरिक थाट काही औरच आहे. येथील हावली पाहण्यासाठी परदेशी पाहुणे आवर्जून येत असून, पारंपरिक साज लाभलेल्या होळीने वेसाव्याची शान आणखी वाढली आहे.
येथे गोताच्या किंवा पाटलांच्या हावलाच्या दिवशी पारंपरिक वेशभूषेत रात्री ८.३० च्या सुमारास मिरवणूक काढली जाते. ज्यात वेसावे गावातील बाजार गल्ली व मांडवी गल्ली जमातीचा सहभाग असतो. कोळी महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर रंगीत मातीचे मडके घेऊन गावात मिरवतात. त्याचप्रमाणे पुरुष मंडळी विविध देवी-देवतांचे अथवा इतर सोंग घेत सादर करत अथवा गाणी म्हणत गावात फिरतात. त्यांना साथ असते ती सुमधुर कोळीगीत वाजवणाऱ्या कोळी बँड पथकांची. त्याचबरोबर वेसावे गावातील ९ गल्ल्या दरवर्षी मोठ्या उत्साहात होळी साजरी करतात, असे वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष व मांडवी गल्ली जमातीचे सदस्य जगदीश भिकरू यांनी सांगितले.
शिमगा अथवा होलीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्त्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. मुळात कोळी लोकांची हावली ही १५ दिवस साजरी होते. सुरुवात होते ती गावातील लहान मुलांच्या होळीपासून. पण शेवटचे दोन दिवस होलीका दहनासाठी महत्त्वाचे मानले जातात. होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या होळीला कोळी भाषेत कोमार/कोंबार हावली म्हटले जाते; जी गावातील तरुण पोरे साजरी करतात. होळी पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या होळीला गोताची हावली किंवा पाटलाची होळी म्हणतात. याचा मान गावचा पाटील अथवा गल्लीच्या अध्यक्षाला असतो. होळी पेटवताना बोंबा मारण्याची परंपरा पाहायला मिळते. रात्री १२ ते १ च्या सुमारास होळीभोवती मडकी रचून, प्रदक्षिणा घालत वाजतगाजत होळी पेटवली जाते, असे राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी सांगितले.

- यंदा बाजार गल्ली वेसावे दहीहंडी उत्सवाचे मानकरी असल्याकारणाने गल्लीतील अध्यक्ष पराग भावे व इतर कार्यकर्त्यांनी गल्लीतील माहेरवाशिणींनादेखील मडकी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.
- आमच्या माहेरच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आम्ही सगळ्या उत्सुक आहोत, असे एक माहेरवाशीण सारिका साठी यांनी सांगितले. त्यामुळे या वर्षी जवळजवळ ३०० महिला व २०० पुरुष मंडळी मिरवणुकीत पारंपरिक थाटात दिसतील, असे बाजार गल्लीतील ज्येष्ठ सभासद व मार्गदर्शक सुरेश कालथे यांनी सांगितले.

Web Title: 'Our Vesavila will be fantastic'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.