Mumbai Anthem Row: महागुरू सचिन, अशी चूक पुन्हा करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 09:30 PM2018-08-30T21:30:54+5:302018-08-30T21:31:41+5:30

मुंबई ही तुमची जन्मभूमी - कर्मभूमी. तुमच्या यशात मुंबईचा मोठा वाटा आहे, हे तुम्हीही नाकारत नाही. त्यामुळे मुंबईची महती तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. तरीही, तुमचा मार्ग इतका कसा भरकटला, असा प्रश्न आम्हाला पडलाय. 

A open letter to Sachin Pilgaonkar over Mumbai Anthem row | Mumbai Anthem Row: महागुरू सचिन, अशी चूक पुन्हा करू नका!

Mumbai Anthem Row: महागुरू सचिन, अशी चूक पुन्हा करू नका!

Next

स. न. वि. वि. 

पत्राचा विषय वेगळा सांगायची काहीच गरज नाही. कारण आपण 'महागुरू' आहात. मराठी माणसाची नस अचूक ओळखून, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडगोळीला सोबत घेऊन तुम्ही महाराष्ट्राला खळखळून हसवलंय. 'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महानायकासोबत बॉलिवूडच्या पडद्यावर तुम्हाला पाहताना आम्हाला कायमच अभिमान वाटला. म्हणूनच टीव्हीच्या पडद्यावरूनही आम्ही हसत हसत तुमचं स्वागत केलं. सिनेसृष्टीतील तुमच्या कारकिर्दीला ५० वर्षं झाली, तेव्हा अवतरलेली ताऱ्यांची मांदियाळी पाहून आमचे डोळे दीपून गेले होते. 'हाच माझा मार्ग' हे तुमचं आत्मचरित्र वाचताना एक सिनेमाच आमच्या डोळ्यांपुढे तरळला होता. पण, काल 'मुंबई अँथम'च्या नावाखाली जो अत्यंत ओंगळवाणा प्रकार तुम्ही केलात, तो पाहून, तुमचा मार्ग इतका कसा भरकटला, असा प्रश्न आम्हाला पडलाय. 

खरं तर, मुंबई ही तुमची जन्मभूमी - कर्मभूमी. तुमच्या यशात मुंबईचा मोठा वाटा आहे, हे तुम्हीही नाकारत नाही. त्यामुळे मुंबईची महती तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. पठ्ठे बापुरावांनी याच मुंबापुरीचं वर्णन 'मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका' असं केलंय. या मायानगरीची किमया काही औरच आहे. इथल्या जगण्यात एक वेगळीच नशा आहे, असं म्हटलं जातं. पण, नशा या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतल्याचं व्हिडीओत पाहायला मिळालं. ही नशा मुंबईची शान घालवणारी आहे, याचं भानही तुम्हाला कसं राहिलं नाही, याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय.

मुंबईकरांना दोन सचिनबद्दल नेहमीच कौतुक वाटत आलंय. ते म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सचिन पिळगांवकर - अर्थात तुम्ही. तुम्ही दोघेही आपापल्या क्षेत्रातले ऑल-राउंडर आहात. फक्त अभिनयच नाही, तर गायन आणि नृत्यकलेतील तुमचं कौशल्यही आम्ही अनेकदा पाहिलंय. त्याला दादही दिलीय. पण, हे गाणं आणि त्यावरचं नाचकाम (तुम्ही केलेला प्रकार नृत्य म्हणण्याच्या पात्रतेचा तो नाही) अत्यंत अशोभनीय होतं. आपलं वय आणि जनमानसातील प्रतिष्ठेचा विचार तुम्ही एकदा तरी करायला हवा होतात. 

भाषा हाही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेवर तुमची भक्कम पकड आहे. मग तरीही, आपण ज्या शब्दांत 'आमची मुंबई'चं वर्णन करतोय, त्यातले बव्हंशी शब्द आक्षेपार्ह आहेत, आपली मुंबई अशी नाहीच, हे तुमच्या लक्षात कसं आलं नाही हो?

आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. जसं चांगल्या गोष्टींना सोशल मीडिया डोक्यावर घेतो, तसाच वाईट गोष्टींना फाडून खातो. तुमचा व्हिडीओ तर वाईट नव्हे, वाईट्टच होता. त्याचा नेटकऱ्यांनी जो निकाल लावला, तो बिनतोड आहे. महागुरू असो किंवा आणखी कुणी; मुंबईबद्दल आम्ही काहीही वावगं खपवून घेणार नाही, हे मुंबईकरांनी ठणकावून सांगितलं. हेच तर मुंबईचं स्पिरिट आहे. पण तुम्ही वेगळ्याच 'स्पीरिट'च्या प्रेमात पडलात आणि व्हिडीओ मागे घेण्याची नामुष्की तुमच्यावर ओढवली.

आपल्यावर झालेल्या टीकेची दखल घेऊन तुम्ही फेसबुकवर त्याला उत्तर दिलंत. हा तुमच्या मनाचा मोठेपणाच आहे. पण, हे उत्तर काहीसं 'बनवाबनवी'चं वाटतंय. मित्राला मदत करण्याच्या हेतूने मी हे गाणं केलं, दुसऱ्याच्या कामात दखल देण्याचा स्वभाव नाही म्हणून जे होतं त्याला विरोध केला नाही, असं तुम्ही म्हटलंय. पण, तुम्ही तत्त्वांच्या बाबतीत पक्के आहात, हेही आम्हाला ठाऊक आहे. जे मनाला पटत नाही, ते आजवर तुम्ही कधी केलेलं नाही. मग यावेळी असं का केलंत? या कटू अनुभवामुळे मित्रांसाठी चांगुलपणा दाखवायची 'चूक' करणं मी थांबवणार नाही, असंही तुम्ही शेवटी म्हटलंय. पण तुमचा एक चाहता म्हणून, एक मुंबईकर म्हणून तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की, अशी चूक पुन्हा करू नका. कारण, हे गाणं यू-ट्युबवरून डिलीट झालं असलं, तरी या गाण्यामुळे आमच्या मनावर झालेले घाव भरून यायला वेळ लागेल. 

तुम्हीही यापुढे काळजी घ्याल आणि या प्रकारामुळे सगळेच कलाकार थोडे सावध होतील, अशी आशा आहे. चांगल्या कलाकृतीतून तुम्हाला भेटायला नक्की आवडेल. 

आपला, 
मुंबईकर

............................................

सचिन पिळगावकर यांनी केलेला खुलासा

-----------------------------------------------------------------------------

यू ट्युबवरून हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. ज्यांनी तो पाहिलेला नाही, त्यांना या विषयाचं गांभीर्य कळावं म्हणून त्याची एक झलक आम्ही दाखवत आहोत.

Web Title: A open letter to Sachin Pilgaonkar over Mumbai Anthem row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.