...तरच रेल्वे अपघात रोखले जातील!, वाहतूक तज्ज्ञांनी सुचवल्या उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:23 AM2017-10-03T00:23:49+5:302017-10-03T00:24:16+5:30

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेने मुंबई हेलावली असून, रेल्वे प्रशासनासह सर्वच यंत्रणांवर टीका होत आहे.

... only then train accidents will be stopped! The solutions suggested by traffic experts | ...तरच रेल्वे अपघात रोखले जातील!, वाहतूक तज्ज्ञांनी सुचवल्या उपाययोजना

...तरच रेल्वे अपघात रोखले जातील!, वाहतूक तज्ज्ञांनी सुचवल्या उपाययोजना

googlenewsNext

मुंबई : एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेने मुंबई हेलावली असून, रेल्वे प्रशासनासह सर्वच यंत्रणांवर टीका होत आहे. विशेषत: रेल्वे स्थानकांवरील जिने, पादचारी पूल अशा सेवा-सुविधांकडे व्यवस्थित लक्ष देण्यात आले नाही. परिणामी, एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना घडली, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे बुलेट टेÑन दाखल करण्यापूर्वी केंद्राने रेल्वे सुधारण्यावर भर द्यावा, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकंदर एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आता तरी रेल्वे प्रशासनाने जागे व्हावे आणि रेल्वे प्रवाशांना दिलासा द्यावा, असे म्हणत तज्ज्ञांनी वाहतूक व्यवस्थेत अनेक सुधारणाही सुचवल्या आहेत.
वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी सांगितले की, एल्फिन्स्टन रोड-परळ पादचारी पुलावर झालेली घटना ही आणीबाणी परिस्थितीची होती. मुंबईमधील पार्किंगची असुविधा, वाढणाºया उंच इमारती, वेडेवाकडे रोड यामुळे मुंबईची रचना खूप वेगळी झालेली आहे. रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. सर्व बेशिस्त कारभार सुरू आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च करता. ८-१० वर्षांनी ते प्रकल्प पूर्ण होणार; पण त्याआधी मुंबईच्या पायाभुत सुविधा पूर्ण होत नाहीत, ते आधी होणे गरजेचे आहे. हे सर्वांना कळत आहे; पण कळत नाही असे भासवले जात आहे. प्रशासनही आपली जबाबदारी झटकत आहे. दुसºयाकडे बोट दाखवले जात आहे. खरेतर, प्रत्येकाने स्वत:हून शिस्तीने वागायला हवे. पार्किंग नीट जागेत करणे, ध्वनिप्रदूषण कमी करणे अशा गोष्टींपासून सुरुवात करायला पाहिजे. दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असायला हवे. रेल्वेचे भाडे वाढवले तरी चालेल; पण प्रवास हा सुखकर होणे गरजेचे आहे.
वाहतूकतज्ज्ञ यशवंत जोगदेव यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत रोज रेल्वे अपघात होत आहेत. त्यामधील एल्फिन्स्टन रोड-परळ पादचारी पुलावर झालेला अपघात हा हृदय हेलावणारा होता. या घटनेचे मूळ कारण पादचारी पुलावर झालेली गर्दी. रेल्वे प्रशासनाने या गर्दीचे व्यवस्थापन करणे गरजेचे होते. पण तसे काही झाले नाही. त्यामुळे ही घटना घडली. पुलावर झालेले अतिक्रमण यामुळे गर्दी वाढते. काही भागात फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आर.पी.एफ.ने गर्दीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. स्थानकावरील रेल्वेच्या अधिकाºयांनी अपघाताच्या घटना होऊ नयेत यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रेल्वे पूल आहेत; पण त्यांचा वापरच होत नाही. लोक जवळचा पर्याय म्हणून रेल्वेमार्ग ओलांडतात. पुलावर ठरावीक ठिकाणी दुभाजक असणे गरजेचे आहे. बुलेट टेÑनला काही जण विरोध करीत आहेत; पण बुलेट ट्रेन ही येत्या काही वर्षांत खूप उपयुक्त आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्वयंचलित द्वार असायला हवे. टी.सी. जास्त प्रमाणात असायला हवेत. वेगवान पोलीस यंत्रणा हवी. गर्दीचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा असावी.
वाहतूकतज्ज्ञ रोहित कात्रे यांनी सांगितले की, मुंबईतील जुने बांधकाम हे ब्रिटिशकालीन आहे. त्यातील काही बांधकाम आपल्याला आयत्या स्वरूपात मिळाले आहे. दक्षिण मुंबईमध्ये आपण काहीच नवीन करू शकलेलो नाही. उत्तरेकडे मुंबई फुगीर होत चाललेली आहे. मुंबईमध्ये याआधी मिल होत्या. त्यादृष्टीने त्या काळी केलेले बांधकाम व प्रवास खूप सोईस्कर होत होता. त्या काळी तीन पाळ्यांमध्ये कामे होत होती. त्यामुळे होणारी गर्दी ही कमी प्रमाणात असे. पण आता त्याजागी टोलेजंग व्यावसायिक कार्यालये झाली आहेत. एकाच वेळी सर्वांच्या कामाची वेळ असते. त्यामुळे जागोजागी अशा कार्यालयांमुळे गर्दी वाढलेली आहे. कोणतेही सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही. कोणत्याही पक्षाकडे दूरदृष्टी नाही. मुंबईत नानाविध प्रकारचे विभाग आहेत. रेल्वे प्रशासन रेल्वे सांभाळते, महानगरपालिका रस्त्यांचा कारभार सांभाळते. असे अनेक विभाग आहेत ते आपापले कारभार सांभाळत आहेत. पण या सर्व कारभारावर लक्ष ठेवणारा कोणी जबाबदार आधिकारी नाही. त्यामुळे असे अनेक प्रकल्प रखडले आहेत. मुंबईमध्ये कोकण रेल्वे व मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे असे नवीन प्रकल्प योग्य आहेत. मेट्रो रेल्वे हा योग्य प्रकल्प आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास थोडा सुखावणारा झाला आहे. डबल रेल्वे ट्रॅकचा प्रकल्प हा एक उपाय सुचवता येऊ शकतो. पण मेट्रोआधी डबल रेल्वे ट्रॅकचा प्रकल्प येणे गरजेचे होते. रेखीव पायाभूत सुविधा व गैररेखीव पायाभूत सुविधा अशा दोन प्रकारचे प्रकल्प बनवण्याचे काम असते. रेखीव पायाभूत सुविधेमध्ये आधीच्या रस्त्यांवर जंक्शन, पूल बांधणे तर गैररेखीव पायाभूत सुविधांमध्ये रस्ते हे एकमेकांना ९० अंश जोडणे अपेक्षित आहे. गैररेखीव पायाभूत सुविधा या प्रकारची मुंबईला गरज आहे. या प्रकारात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो ट्रेन बनली आहे. बुलेट ही योग्य आहे; पण त्याबरोबर रेल्वे व इतर वाहतूक सुविधांवर लक्ष देणे गरजेचे आहे. बुलेटवर करण्यात आलेला खर्च योग्यच आहे. जपानकडून आपल्याला कमी व्याजात कर्ज मिळालेले आहे. मुंबईमध्ये आधी एखाद्या प्रकल्पावर निर्णय घेतला जातो; मग त्याविरुद्ध निदर्शने केली जातात. त्यानंतर त्यावर चर्चा केली जाते. आणि मग शेवटी ते प्रकल्प सुरू होतात. आपल्याकडे खूप तांत्रिक बाबी आहेत. पण आपल्याकडे टिकाऊपणाचा अभाव आहे.

Web Title: ... only then train accidents will be stopped! The solutions suggested by traffic experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.