एल्फिन्स्टन दुर्घटनेचा एक महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 03:46 AM2017-10-29T03:46:49+5:302017-10-29T03:49:37+5:30

एल्फिन्स्टन रोड स्थानकात नेहमीप्रमाणे प्रवासी वर्दळ सुरू होती. स्थानकांवर लोकलबाबत उद्घोषणा सुरू होती. दिवाळी दृष्टिक्षेपात असल्यामुळे प्रवाशांच्या चेह-यावर आनंदाचे भाव उमटत होते.

One month of the Elphinstone crash | एल्फिन्स्टन दुर्घटनेचा एक महिना

एल्फिन्स्टन दुर्घटनेचा एक महिना

Next

एल्फिन्स्टन रोड स्थानकात नेहमीप्रमाणे प्रवासी वर्दळ सुरू होती. स्थानकांवर लोकलबाबत उद्घोषणा सुरू होती. दिवाळी दृष्टिक्षेपात असल्यामुळे प्रवाशांच्या चेह-यावर आनंदाचे भाव उमटत होते. रेल्वेमंत्री पीयूष गोयल मुंबई दौ-यावर येणार होते. परिणामी त्यांच्या दिमतीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकारी गुंतले होते. मात्र अचानक रेल्वे अधिका-यांचे फोन खणखणले. प्रवासी वर्दळीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. स्थानकांतील उद्घोषणा यंत्रणा बंद झाली. प्रवासी सुन्न झाले. एल्फिन्स्टन स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा मृत्यू आणि ३२ प्रवासी जखमी झाले. मुंबई उपनगरीय सेवेचा लाभ घेणाºया ७५ लाख प्रवाशांसह देशातील १२५ कोटी जनतेच्या काळजाचा ठोका चुकला.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या कारभारावर सर्व स्तरावरून टीकेची झोड उठली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा पूर्वनियोजित मुंबई दौरा रद्द झाला. ४८ तास रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे बोर्ड यांची मॅरेथॉन बैठक झाली. बैठकीतून अनेक निर्णय जाहीर करण्यात आले. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेतील एक महिन्यातील घडलेल्या घडामोडींचा आढावा.

दुर्घटनेनंतर मॅरेथॉन बैठकीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतलेले निर्णय...
मुंबईतील ८ रेल्वे यार्डसह देशातील ४० यार्डांसाठी एक हजार कोटी
सुरक्षेसंबंधी महाव्यवस्थापकांना १८ महिन्यांसाठी सर्वाधिकारउपनगरीय स्थानकांच्या पाहणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करा
‘पादचारी पूल’ हे प्रवासी सुविधा प्रकारात येत असे, आता स्थानक अनिवार्य गटात त्याचा समावेश करण्यात आलापादचारी पुलांचे काम युद्धस्तरावर पूर्ण करा गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त पादचारी पुलांचे नियोजन कराउपगरीय सर्व रेल्वे स्थानकांवर व बोगीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
राज्य सरकार, महापालिका, एमएमआरडीए आणि सिडको यांसंबंधी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

अजूनही दिनक्रम पूर्ववत नाही
त्या काळ्या दिवसाला एक महिना उलटला हे खरंय, पण ‘त्या’ आठवणी आजही मनात ताज्या आहेत. त्या पुलावरचा आक्रोश, हुंदके, गर्दी हे सगळं डोळ्यांसमोरून जाणं शक्य नाही. एल्फिन्स्टन दुर्घटनेला एक महिना उलटला असला तरी त्या पुलाविषयी ठोस कारवाई झाली नाही. दुर्घटना घडल्यावर जागे होणारे प्रशासन या घटनेबाबत अजूनही झोपेचे सोंग घेऊन आहे. तीच गर्दी, तेवढीच जागा, तेच ढिसाळ नियोजन अजून किती मुंबईकरांचा जीव घेणार. मी माझी मैत्रीण प्रमिता दोघीही एकाच इमारतीत काम करतो. नेहमी आम्ही एकत्रच येतो. पण पहिल्यांदाच मला उशीर झाल्याने ती पुढे गेली. मी तिच्या मागची ट्रेन पकडली होती.माझ्याकडे छत्री नव्हती. त्यामुळे मी जिन्यावरच थांबली होती. पण चेंगराचेंगरी झाल्यानंतर मी खाली पडली आणि माझ्या छातीवर जोर आल्याने माझा श्वास गुदमरला. तो दिवस विसरणे कदापि शक्य नाही.
- रेश्मा कदम, दिवा



गर्दीच्या वेळेत फेरीवाल्यांना
बंदी घालण्यात यावी
महापालिकेने काही विभागांमध्ये फेरीवाल्यांसाठी ठरावीक वेळ निश्चित करण्याचा प्रयोग करावा. सार्वजनिक परिसर, रेल्वे, पूल अशा ठिकाणी गर्दीच्या तासांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करावी. जेणेकरून ट्रेन पकडण्यासाठी धावणाºया चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही, असा पर्याय यासाठी स्थापन विशेष समितीने सुचविला होता.

मोठ्या पदपथांवर फेरीवाले
स्ट्रीट व्हेंडर्स अ‍ॅक्ट २०१४ मध्ये उदरनिर्वाहासाठी फेरीच्या व्यवसायाला संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे या समितीने दादर, अंधेरी पूर्व आणि चेंबूर अशा विभागांचे सर्वेक्षण करून मोठ्या पदपथांवर फेरीवाल्यांना बसण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना केली आहे.

‘तो’ फोटो डोळ्यांसमोर नकोसा वाटतो
एल्फिन्स्टन दुर्घटनेला महिना उलटूनही चित्र बदलले नाही, आजही त्या मृतदेहांचे, जखमींचे चेहरे डोळ्यांसमोरून जात नाही. मी त्या दुर्घटनेचा बळी ठरले, त्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाºया फोटोत मी आहे, ते दृश्य पाहून ढसाढसा रडू येते. आजही अनेक रात्री त्या आठवणी झोप उडवतात. पण अशा वेळी कुटुंबीय पुन्हा उभे राहण्यासाठी बळ देत आहेत. यंत्रणेत सुधारणा नाही, याविषयी कायम खंत आहे. एवढे बळी गेले, शिवाय महिन्याभरात तिकडची परिस्थिती किंचितही बदलली नाही. त्यामुळे आता यंत्रणेवर भरोसा कसा ठेवायचा हेच कळत नाही, असा संताप त्या बोलताना व्यक्त करतात. काळाचौकी येथील राहणाºया अर्पणा सावंत यांच्या कमरेला जबर मुकामार लागल्याने त्यांना बसताही येत नाही. दुर्घटनेच्या वेळी अचानक गुडघे दुमडले आणि त्याच अवस्थेत २५-३० माणसे अंगावर आल्याने कमरेला मार बसल्याचे त्या सांगत होत्या.
- अर्पणा सावंत, काळाचौकी

दुर्घटनेनंतर आईचा मृतदेह ताब्यात घेत असताना रेल्वेने १५ हजार रुपये दिले. त्यानंतर दुसºया दिवशी ४ लाख ८५ हजार रुपयांचा धनादेश मिळाला. त्यानंतर काहीच दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ५ लाख रुपयांची मदत मिळाली. परंतु राज्य सरकारने जाहीर केलेली ८ लाख रुपयांची मदत अद्याप मिळाली नाही. त्यासाठी मध्य रेल्वेच्या कार्यालयात गेले होते. परंतु तेथील कर्मचाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दिवाळीची सुटी आहे, साहेब सुटीवर आहेत, तुम्ही इतक्या लवकर का आलात?
- प्रग्न्या आल्वा, मृत सुजाता आल्वा यांची मुलगी

एल्फिन्स्टन रोड येथील दुर्घटनेत तोंडाला आणि हाताला मुका मार लागला. त्रास अजून होत आहे. १५ दिवस घरी होतो. प्रशासनाने ५० हजार रुपयांची मदत केली. परंतु मदत करून काही उपयोग नाही. प्रवाशांच्या सोयीनुसार सुविधा पुरविल्या पाहिजेत. एल्फिन्स्टन पुलावर आता पोलिसांचा बंदोबस्त असतो. एखादा अपघात घडला तर प्रशासनाला जबाबदार ठरवतो. परंतु अशा अपघाताला नागरिकही तितकेच जबाबदार आहेत. नागरिकांमध्ये शिस्त नाही. आम्ही अजून ही या घटनेतून सावरलो नाही.
- प्रज्ञा बागवे, जखमी प्रवासी

दुर्घटनेनंतर पुलावर रेल्वेचे पोलीस उभे असतात. मात्र काहीच फरक पडलेला नाही. सकाळी आणि रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकावरील गर्दीमध्ये जीव गुदमरतो. महिलांची सुरक्षा अजूनही राम भरोसे आहे. रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले आणि भिकारी हटवणे गरजेचे आहे. तसेच अनेक स्थानकांवरील पुलांवर आणि फलाटांवरील गर्दुल्ल्यांवर कारवाई व्हावी.
- नेहा परदेशी, प्रवासी



गेली सात वर्षे लोकलने प्रवास करतो आहे. पण माझ्या जीवनातला वाईट प्रसंग म्हणजे एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी. पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे स्थानकावर अनेक समस्या आहेत. त्या रेल्वे प्रशासनाने वेळेत सोडविण्याची गरज आहे.
- सोनाल आयरे, प्रवासी

एल्फिन्स्टन-परळला जोडणारा जो पूल आहे तो कित्येक वर्षांपूर्वीचा आहे. मुंबईची लोकसंख्या वाढत असून त्याप्रमाणे सुविधांमध्येदेखील वाढ व्हायला हवी.
- भास्कर खेतले, प्रवासी

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर यंत्रणा अ‍ॅक्टिव्ह होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाल्यासारखे दिसत नाही. मुंबईकर आणि येथील प्रशासन सहजपणे ही दुर्घटना विसरले आहेत. सर्व स्थानकांवर किमान रुंद पूल असायला हवे आणि रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले हटविण्यात आले पाहिजेत.
- अशोक अहिर, प्रवासी

(संकलन : शेफाली परब, स्रेहा मोरे, पूजा दामले, महेश चेमटे, अक्षय चोरगे, सागर नेवरेकर,)

 

Web Title: One month of the Elphinstone crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.