भाजपा-सेनाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच आता लढत- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 06:00 AM2019-03-03T06:00:45+5:302019-03-03T06:01:22+5:30

लोकसभा निवडणुकीत ‘भाजपा-सेना विरुद्ध काँग्रेस आघाडी’ अशी लढत होईल.

Now the fight against the BJP-shivsena of Bahujan Leading party by Prakash Ambedkar | भाजपा-सेनाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच आता लढत- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

भाजपा-सेनाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच आता लढत- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

- धनाजी कांबळे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ‘भाजपा-सेना विरुद्ध काँग्रेस आघाडी’ अशी लढत होईल. त्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चुरशीची लढत देतील. विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए विरुद्ध वंचित बहुजन आघाडी’ अशीच लढत होईल, असे भारिपचे व ‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
ते म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी जवान सीमेवर पहारा देतात, शहीद होतात. मात्र, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, सवलती याबाबत सरकार गांभीर्याने पाठपुरावा करीत नाही. आजही विविध दलांतील जवानांना शहिदाचा दर्जा नाही. आपल्या कोणत्याही दलातील सैनिक असला तरी त्याचा सन्मान झालाच पाहिजे. पुलवामा हल्ल्यानंतर शहिदांचे भांडवल करून मते मागणे खेदजनक आहे. सैनिक असल्याने आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव राजकारण्यांनी ठेवायला हवी.
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत सुशिक्षित मध्यमवर्गीय जनता आमिषांना भुलणार नाही. पंधरा लाखांचं काय झालं? २ कोटी रोजगाराचं काय झालं? राममंदिराचं काय झालं? धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाचं काय झालं? विकास नेमका कुणाचा झाला? कोण आहे खरे लाभार्थी? असे सवाल जनता करीत आहे. राजकारणी मते मागायला जातील, तेव्हाही जनता त्यांना हे सवाल करेलच. त्यामुळे आता निवडणूक सोपी राहिलेली नाही. भाजपाने सोशल मीडियाचा वापर करून सत्ता मिळवली, तोेच सोशल मीडिया आज त्यांच्यावर उलटला आहे.
अ‍ॅड आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी जनतेतून तयार झाली आहे. सर्व समाजघटकातील लोक यात आहेत. केवळ दलित, मुस्लिमांच्या मतांवर जिंकता येत नाही. इतर समाजाची मते मिळायची असतील, तर आघाडीत सामील व्हायला पाहिजे, असाही सूर ऐकायला येतो. आमच्यासोबत बलुतेदार-आलुतेदार, गरीब मराठा, साळी, माळी, कोळी, आदिवासी, धनगर समाजाचे हजारो लोक व नेते आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये साधारण १८ ते २० सभा झाल्या. या सभांना लाखोंच्या संख्येने गर्दी होती. हे लोक पैसे देऊन बोलावलेले नव्हते. घरातील भाजी-भाकरी बांधून, गाडीखर्च पदरचा करून आलेले होते. भीमा कोरेगाव य्हल्ल्यानंतर एक खदखद असंतोष जनतेमध्ये आहे. तीच वंचित जनता आमच्यासोबत आहे. जनतेला बदल पर्याय हवा आहे. तो ‘वंचित बहुजन आघाडी’च्या रूपाने उपलब्ध झाला आहे.’
‘एमआयएमचे नेते खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्यामुळे काँग्रेसची आघाडी करण्यात अडचण झाली असल्याविषयी ते म्हणाले की, एमआयएमचे सगळे कार्यक्रम हे राज्यघटनेनुसार होतात. त्यांना पक्ष वाढविण्याचे, कुणाशी आघाडी करावी, याचे स्वातंत्र्य आहे. ओवेसी जे काही बोलतात, ते कायद्याच्या चौकटीत असते. ते भडकाऊ भाषण करतात, अशी त्यांची बनविलेली प्रतिमा चुकीची आहे. काँग्रेसची अडचण दूर करण्यासाठी ओवेसी यांनी अशोक चव्हाण यांना तुम्हाला अडचण वाटते, तर आम्ही बाजूला होतो. पण सन्मानाने काही जागा सोडा, असे म्हटले आहे.
>काँग्रेससोबत आघाडीविषयी...
आम्ही काँग्रेससोबत चर्चेची दारे खुली ठेवली आहेत. मात्र, आता मुद्दा जागा किती देणार याचा राहिलेला नाही. आरएसएसला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याबद्दल काँग्रेसकडे काय आराखडा आहे, हे त्यांनी सांगावे. काँग्रेसचे उत्तर आल्यावर निश्चितपणे आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. पण, आता चेंडू काँग्रेसच्या पारड्यात आहे.

Web Title: Now the fight against the BJP-shivsena of Bahujan Leading party by Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.