... म्हणून 'पद्मावत'च्या वादावेळी आम्ही शांत बसलो- शाहरुख खान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 10:40 AM2018-02-21T10:40:35+5:302018-02-21T10:41:10+5:30

काहीवेळा तुमच्या विरोधकांचा आवाज वाढला असेल तेव्हा शांत राहणेच श्रेयस्कर असते.

Nobody is scared fearful Shah Rukh Khan on why major actors did not speak up during Padmaavat protests | ... म्हणून 'पद्मावत'च्या वादावेळी आम्ही शांत बसलो- शाहरुख खान

... म्हणून 'पद्मावत'च्या वादावेळी आम्ही शांत बसलो- शाहरुख खान

Next

मुंबई: 'पद्मावत' चित्रपटाला विरोध होत असताना बॉलिवूड इंडस्ट्री कोणाच्या भीतीमुळे किंवा घाबरल्यामुळे गप्प बसली नव्हती. केवळ आमच्या प्रतिक्रयांमुळे विरोधकांना आणखी प्रसिद्धी मिळून 'पद्मावत'ला बॉक्स ऑफिसवर फटका बसू नये, असे आम्हाला वाटत होते. त्यामुळेच आम्ही या वादात शांत राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण अभिनेता शाहरूख खान याने दिले. तो मंगळवारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होता.

या परिसंवादात भारतीय मीडियाने, सिनेसृष्टीने 'ग्लोबल' होण्याची गरज चर्चासत्रात अनेक वक्त्यांनी बोलून दाखवली. त्यावर, 'रिपब्लिक टीव्ही'चे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी यांनी बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शकांनी न घाबरता, थोडं जाड कातडं पांघरून खऱ्या राजकारणावर, वास्तवदर्शी सिनेमे बनवण्याची सूचना केली. तेव्हा, शाहरुखनं बॉलिवूड स्टार्सची बाजू मांडली. पद्मावत वादाच्या वेळी कुणीच मोठा स्टार पुढे आला नाही. त्यावरून बरीच टीका झाली. पण आम्ही प्रतिक्रिया न दिल्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा नव्हता. उलट, आम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. कारण आम्हीही त्यावर काही बोललो असतो, तर विरोध करणारे उगाचच मोठे झाले असते, प्रसिद्ध झाले असते, असं त्यानं स्पष्ट केलं. प्रत्येकाला कुटुंबासोबत जाऊन कुठल्याही दहशतीविना सिनेमा पाहता यावा, हाच आमचा प्रयत्न असतो, आम्ही घाबरत नाही, असं तो म्हणाला. 

अडचणीच्यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार एकटवत नाहीत, हा गैरसमज आहे. काहीवेळा तुमच्या विरोधकांचा आवाज वाढला असेल तेव्हा शांत राहणेच श्रेयस्कर असते. विरोधाला घाबरून बॉलिवूड कलाकारांनी स्वत:ची कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. बॉलिवूड कलाकारांना केवळ पैसे कमवायेच असतात, समाजाशी त्यांना काहीही देणेघेणे नसते, असेही बोलले जाते. परंतु, तसे नाही. आमचेही समाजावर प्रेम आहे. आम्ही लोकांचे मनोरंजन करणारे चित्रपट तयार करतो, जेणेकरून लोक आनंदात राहतील, असे शाहरूखने सांगितले. 

कल्पनांना कुणीही थांबवू शकत नाही. त्या व्यक्त करण्याची आज अनेक माध्यमं आहेत. त्यामुळे सिनेमे तयार होत राहतील, ते प्रदर्शित होत राहतील. आम्ही संवेदनशील आहोत, पण कातडी थोडी जाड करण्याचा प्रयत्न करू, असंही त्यानं नमूद केलं. 

जगाला सुपरहिरो देऊ शकतो!
आपल्या देशाला मोठी संस्कृती आहे, इतिहास आहे. कथाकथनात आपण सरस आहोत, पण तरीही स्पायडरमॅनसारखा सुरपहिरो आपण देऊ शकलेलो नाही किंवा जंगल बुकसारखी कलाकृती घडवू शकलेलो नाही. आपल्याकडे मीडिया हब तयार झालं आणि सिनेमा, वेब, टीव्ही, बातम्या हा सर्व मीडिया एक झाला, तर जगाला सुपरहिरो देण्याची ताकद आपल्यात आहे, असा विश्वास शाहरुखने व्यक्त केला.
 

Web Title: Nobody is scared fearful Shah Rukh Khan on why major actors did not speak up during Padmaavat protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.