उत्तरपत्रिका तपासणारे ‘रोबोट’ नाही! मुंबई विद्यापीठाचे निकालाच्या विलंबावर हायकोर्टात अजब स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 03:24 AM2017-09-07T03:24:59+5:302017-09-07T03:25:18+5:30

मुंबई विद्यापीठाने सहाव्यांदा निकालाची दिलेली मुदत पुन्हा चुकविली असून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम माणसे करत आहेत रोबोट नाही, हे लक्षात घ्यावे. आम्ही बहुतांशी काम संपवले आहे, असे अजब स्पष्टीकरण विद्यापीठाने निकालाच्या विलंबावर उच्च न्यायालयात दिले.

 No scrutiny 'robot'! Due to the delay in the exit of the University of Mumbai, there is a great explanation in the High Court | उत्तरपत्रिका तपासणारे ‘रोबोट’ नाही! मुंबई विद्यापीठाचे निकालाच्या विलंबावर हायकोर्टात अजब स्पष्टीकरण

उत्तरपत्रिका तपासणारे ‘रोबोट’ नाही! मुंबई विद्यापीठाचे निकालाच्या विलंबावर हायकोर्टात अजब स्पष्टीकरण

मुंबई : मुंबई विद्यापीठाने सहाव्यांदा निकालाची दिलेली मुदत पुन्हा चुकविली असून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम माणसे करत आहेत रोबोट नाही, हे लक्षात घ्यावे. आम्ही बहुतांशी काम संपवले आहे, असे अजब स्पष्टीकरण विद्यापीठाने निकालाच्या विलंबावर उच्च न्यायालयात दिले.
नियमित अभ्यासक्रमांचे निकाल १३ सप्टेंबरपर्यंत लावण्याचा प्रयत्न करू. तर अन्य अभ्यासक्रमांचा निकाल लावण्यास वेळ लागेल, विद्यापीठाच्या वकील रुई रोड्रीग्स यांनी न्यायालयाला सांगितले. आतापर्यंत एकूण ४७७ अभ्याक्रमांपैकी ४६३ अभ्यासक्रमांचा निकाल विद्यापीठाने जाहीर केला आहे. बी.कॉमच्या बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स अभ्यासक्रमाचा निकाल बुधवारी रात्री उशिरा लावण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने उच्च न्यायालयाला सांगितले.
अकाउंट अ‍ॅण्ड फायनान्स अभ्यासक्रमाचा निकाल १३ सप्टेंबरपर्यंत लावण्यात येणार आहे. मात्र उर्वरित ११ अभ्यासक्रमांचा निकाल कधीपर्यंत जाहीर होणार, यावर विद्यापीठाने मौन बाळगले. उच्च न्यायालयाने विधि सीईटीसाठी राज्य सीईटी सेलला २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
निकालाच्या विलंबाच्या याचिकांवरील सुनावणी न्या. अनुप मोहता व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे झाली. बुधवारच्या सुनावणीत विद्यापीठातर्फे रोड्रीग्स यांनी बाजू मांडली. बी. कॉमच्या अकाउटिंग अ‍ॅण्ड फायनान्स अभ्यासक्रमाच्या ८१३२ विद्यार्थ्यांचा निकाल १३ सप्टेंबरपर्यंत जाहीर करून १९ सप्टेंबरपर्यंत गुणपत्रिका देण्याचे आश्वासन विद्यापीठाने न्यायालयाला दिले. मात्र उर्वरित ११ अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर करण्यास आणखी वेळ लागेल, असे रोड्रीग्स यांनी सांगितले.
मुंबईबाहेच्या
विद्यार्थ्यांची अडचण
मुंबईबाहेरच्या विद्यार्थ्यांना १९ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या महाविद्यालयात निकाल मिळेल, असेही रोड्रीग्स यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने सीईटी सेलला विधि सीईटीसाठी फॉर्म भरण्याची तारीख २२ सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचे निर्देश दिले.
मुंबई विद्यापीठाचे अजूनही १२ निकाल लागणे बाकी आहे. बुधवारी विद्यापीठाने बी.कॉमचा बँकिंंग अँड इन्शुरन्सचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल ७४.७० टक्के लागला आहे.
‘सोशिओलॉजी’त बहुतांश विद्यार्थी नापास
मुंबई विद्यापीठाने परीक्षा होऊन तीन महिने उलटूनही अद्याप सर्व निकाल जाहीर केलेले नाहीत, पण जे निकाल जाहीर केले आहेत, त्यातही मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. सोशिओलॉजी अर्थात,
समाजशास्त्र एम. ए. पार्ट १ चा निकाल विद्यापीठाने जाहीर केला, पण या निकालात परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी दोन ते तीन विषयांत नापास झाले आहेत, तर काही विद्यार्थी गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
एप्रिल, मे महिन्यांत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संपल्या, पण सप्टेंबर महिना उजाडूनही विद्यापीठात उत्तरपत्रिकांची तपासणी संपलेली नाही. डिजिटल युगात विद्यापीठाने सहभागी व्हावे, म्हणून उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला. एप्रिल महिन्यात या निर्णयाची घोषणा झाली आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. दोनदा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर, प्रत्यक्षात जून महिन्यात उत्तरपत्रिका तपासणीची सुरळीत सुरुवात झाली. त्यामुळे निकाल लागण्यास उशीर झाला आहे.
सोशिओलॉजीचा निकाल आता लागला असला, तरी या विषयात एम.ए. पार्ट १ चे अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाला असून, काही गैरहजर दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत.
उत्तरपत्रिका गहाळ ?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे समजते. सोशिओलॉजी विषयात ४० गुण मिळाल्यास, विद्यार्थी पास होतो. त्यात काही विद्यार्थ्यांना ४२ ते ४५ गुण दिले आहेत. अन्य सर्व विद्यार्थ्यांना २० ते ३० गुण मिळाले आहेत. यापैकी अनेक विद्यार्थ्यांना टीवाय परीक्षेत ९० गुणांहून अधिक गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांनी सांगितले की, विद्यापीठाशी संपर्क साधल्यास, पुनर्मूल्यांकनाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात त्याचा निकाल कधी जाहीर होणार हे माहीत नाही. पार्ट २ ला प्रवेश घेतला, तरीही हा निकाल महत्त्वाचा आहेच. ‘नेट’ची परीक्षा द्यायची आहे. या निकालामुळे आमचे भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यापीठाने लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Web Title:  No scrutiny 'robot'! Due to the delay in the exit of the University of Mumbai, there is a great explanation in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.