शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर त्यांच्या बाजूने कुणीच का बोलले नाही?

By अतुल कुलकर्णी | Published: October 4, 2018 10:45 AM2018-10-04T10:45:12+5:302018-10-04T12:01:51+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण केल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पवारांच्या समर्थनार्थ कोणीही ज्येष्ठ नेता समोर का आलेला नाही, याची चर्चा सध्या पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये आहे.

No one side on Sharad Pawar | शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर त्यांच्या बाजूने कुणीच का बोलले नाही?

शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर त्यांच्या बाजूने कुणीच का बोलले नाही?

Next

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण केली. त्यावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करत पवारांच्या भूमिकेचे कौतुक केले. मात्र ही मुलाखत चुकीच्या पद्धतीनं घेतली गेली. त्याचे चुकीचे अर्थ काढले गेले, असा आवाज राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि आ. जितेंद्र आव्हाड वगळता कोणीही उठवला नाही. पवारांच्या समर्थनार्थ पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांपैकी कोणीही समोर आले नाही, असे का घडले याचीच चर्चा सध्या पक्षातल्या दुस-या फळीतल्या नेत्यांमध्ये आहे. 
लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यावर असे आरोप होणे हे पक्षासाठी नुकसान करणारे आहे, हे आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समजते, ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्षात येत नाही का? असा सवाल काही नेत्यांनी लोकमतकडे केला. यावर पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने बोलकी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणामुळे पक्षाचे नेते आपापसात पवार असे का बोलले याचे अनेक तर्क आणि अर्थ काढत बसले, पण कोणीही पवारांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, यात भाजपाचा हात आहे, असे बोलण्याची हिंमत दाखवली नाही.

तो नेता म्हणाला, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असताना छगन भुजबळ, सुनील तटकरे, अजित पवार यांच्यावर कितीतरी आरोप झाले. मात्र त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. विधिमंडळात या तीनही नेत्यांनी स्वतःचा बचाव स्वतःच केला. आमच्याकडे सुभेदार जास्ती आहेत. ते इतरांची काळजी करत नाही. तुम्ही केले तुम्ही निस्तारा, असेच सगळे वागतात, असेही तो नेता म्हणाला. 

काँग्रेसने आमच्यात आणि पवारांमध्ये कसलेही मतभेद नाहीत असे सांगितले. पण पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर जेव्हा आरोप होतात तेव्हा त्यांच्या मदतीला स्वपक्षातलेच नेते धावू जायला नको का?, या प्रश्नावर तो नेताही निरुत्तर झाला.   पवार यांनाच बीडमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमात खुलासा करावा लागला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. विशेष म्हणजे तोपर्यंत पवारांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या तारीक अन्वर यांनीही पवारांच्या विधानावर खेद व्यक्त करत राष्ट्रवादीलाच सोडचिठ्ठी दिली.

Web Title: No one side on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.