नुकसानभरपाई नाहीच; कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:53 AM2019-01-02T01:53:36+5:302019-01-02T01:54:40+5:30

घाटकोपर येथे विमान कोसळून झालेल्या अपघाताला सहा महिने उलटूनही अद्याप मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही.

 No indebtedness; Trying to divide the family | नुकसानभरपाई नाहीच; कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न

नुकसानभरपाई नाहीच; कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न

Next

- खलील गिरकर

मुंबई : घाटकोपर येथे विमान कोसळून झालेल्या अपघाताला सहा महिने उलटूनही अद्याप मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. शिवाय नुकसानभरपाई देण्याच्या मुद्द्यावरून मृतांच्या कुटुंबीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
२८ जून २०१८ रोजी घाटकोपर येथील जीवदया गल्लीमध्ये यूवाय एव्हिएशन या कंपनीचे विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. विमानाची देखभाल करण्याचे काम एन्डेमेअर एव्हिएशन कंपनीकडे होते. विमानाची किंमत २ कोटी रुपये असताना त्याचा ७ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला होता. अपघातानंतर नुकसानभरपाई दिली नाही, उलट आमच्या कुटुंबामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कंपनी करत असल्याचा खळबळजनक आरोप या विमान अपघातात निधन झालेल्या तंत्रज्ञ मनीष पांडे यांच्या पत्नी सुनीता चतुर्वेदी यांनी केला.
आम्हाला नुकसानभरपाईची अपेक्षा नाही. मात्र, मनीष यांना या विमानात जायचे नसताना त्यांना ज्यांनी बळजबरीने पाठवले त्यांच्याविरोधात कारवाई झाल्यास आम्हाला किमान मानसिक समाधान लाभेल, अशी भूमिका चतुर्वेदी
यांनी व्यक्त केली. उड्डाण बेकायदा असल्याने विमा मिळण्याची
शक्यता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विमानाची स्थिती उड्डाण करण्यास योग्य नसताना वैमानिक, सहवैमानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांना बळजबरीने या विमानाचे उड्डाण करण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे या विमानाची मालकी असलेल्या व देखभाल करणाºया कंपनीविरोधात अपहरणाचा व हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सहवैमानिक मारिया जुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया व सुरभी गुप्ता यांचे पती ब्रिजेश कुमार हे दोघे जण लवकरच करणार आहेत. नोकरीत कायम नसलेल्या मुख्य वैमानिकाला विमान चालवण्यास सांगितल्याने कंपनीने त्यांना नुकसानभरपाई दिली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीविरोधात कारवाई करू नये, यासाठी असे करण्यात आल्याचा आरोप कथुरिया यांनी केला. आम्हालादेखील पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न झाला; मात्र आम्ही त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत लढा देणार असल्याचे कथुरिया यांनी स्पष्ट केले.

विम्याचे पैसे मिळण्याची शक्यता कमी
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने या विमानाची देखभाल करणाºया कंपनीच्या कामावर ठपका ठेवला आहे. तर, कामगार विषयक संसदीय स्थायी समितीनेदेखील त्या विमानाचे चाचणी उड्डाण बेकायदा असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदवला आहे. समितीचे अध्यक्ष खासदार किरीट सोमय्या यांनी या उड्डाणामध्ये अनेक बाबींची अनियमितता असल्याचे अहवालात नमूद केले आहे. विमानाचा विमा काढतानादेखील अनेक निकष धाब्यावर बसविण्यात आल्याने विम्याची रक्कम मिळविताना कुटुंबीयांना अनेक अडचणी येण्याची शक्यता समितीने वर्तवली होती. त्यामुळे विमा कंपनीकडून कुटुंबीयांना काही आर्थिक मदत मिळण्याची शक्यतादेखील दुरपास्त झाली आहे. याबाबत यूवाय एव्हिएशनच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title:  No indebtedness; Trying to divide the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.