काश्मीरसाठी हेलीकॉप्टर नाही, पण बँकेतून पैसे उडाले; अशी झाली फसवणूक

By गौरी टेंबकर | Published: February 13, 2024 12:05 PM2024-02-13T12:05:36+5:302024-02-13T12:05:53+5:30

व्यवसायिकाची बुकींगच्या नावे फसवणूक

No helicopter for Kashmir, but money flies from the bank; This is how the fraud happened | काश्मीरसाठी हेलीकॉप्टर नाही, पण बँकेतून पैसे उडाले; अशी झाली फसवणूक

काश्मीरसाठी हेलीकॉप्टर नाही, पण बँकेतून पैसे उडाले; अशी झाली फसवणूक

गौरी टेंबकर

मुंबई: काश्मीर फिरण्यासाठी एका व्यवसायिकाने ऑनलाईन हेलीकॉप्टर बुक केले. त्यातून त्यांनी उड्डाण केले नाही पण त्यांच्या बँक खात्यातून पैसे मात्र उडाले. या प्रकार बोरिवली पोलिसांच्या हद्दीत घडला सोन्याविरोधात अनोळखी भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

बोरिवली पश्चिम परिसरात तक्रारदार अमरीश नाईक (४५) हे राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ते मित्र परिवारासोबत काश्मीर फिरायला जाणार होते. यासाठी त्यांनी गुगलवर वैष्णोदेवी ते कटराचे ऑनलाइन तिकीट सर्च केले. त्यात त्यांना हेलिकॉप्टर बुकिंग डॉट कॉम ही वेबसाईट मिळाली आणि त्यांनी त्यावर क्लिक केले. तेव्हा ते ऑनलाइन हेलिकॉप्टर बुकिंग नमूद असलेल्या एका व्हाट्सअप क्रमांकावर जाऊन पोहोचले. त्यांनी त्या नंबरवर असलेल्या ऑटो सिस्टमवर हेलिकॉप्टर बुकिंग सुविधा हवी असल्याचे मेसेज केले. त्यानंतर त्यांना वैष्णोदेवीला हेलिकॉप्टरने जाण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचे ऑप्शन आणि त्यासाठी भरावी लागणारी रक्कम याचे पत्रक दिसले. तसेच एका व्यक्तीने त्यांना व्हाट्सअप वर फोन केला. तक्रारदाराने त्याला एकूण सदस्यांची संख्या आणि जाण्याची तारीख याबाबतची माहिती व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवली.

मंदिरात हेलिकॉप्टरने जातेवेळी प्रत्येक व्यक्ती मागे २ हजार १०० असा दोन्ही बाजूचा ४ हजार २०० रुपये खर्च येईल असे कॉलरने सांगितले. त्यावर दुसऱ्या दिवशी नाईक यांनी एकूण जाणाऱ्या व्यक्तींची संख्या सदर व्यक्तीला कळवत त्यांनी सांगितल्यानुसार ५१ हजार ७६५ रुपये त्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर पत्नी आणि स्वतःच्या खात्यातून थोडे-थोडे करून पाठवले. मात्र अशाप्रकारे पैसे पाठवल्याने तिकीट बुकिंग होत नसून एकत्र पैसे पाठवा असे कॉलर सांगू लागला. त्यावर नाईक यांनी त्याच्याकडे पैसे परत मागत त्याच्या ऑफिसचा पत्ता मागितला. मात्र त्याने खरा पत्ता न देता पैसेही परत देणार नाही असे सांगितले. अखेर फसवणूक प्रकरणी नाईक यांनी त्याच्या विरोधात बोरिवली पोलिसात तक्रार केल्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: No helicopter for Kashmir, but money flies from the bank; This is how the fraud happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.