बिबट्यांचा शिरकाव नव्हे धोक्याची घंटा; ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज, सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 04:02 AM2017-12-12T04:02:32+5:302017-12-12T04:02:40+5:30

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी परिसरालगतच्या मनुष्यवस्तीमध्ये बिबट्या दाखल होत असल्याच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांपासून वाढ होत आहे. भक्ष्याच्या शोधात येथे बिबट्या दाखल होत असल्याचे प्राणिमित्र संघटनांचे म्हणणे असले तरीदेखील बिबट्यांचे हल्ले होऊ नयेत म्हणून प्रशासन ढिम्म आहे.

No danger of leopards; Need for implementing a concrete action plan, everyone must take the initiative | बिबट्यांचा शिरकाव नव्हे धोक्याची घंटा; ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज, सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक

बिबट्यांचा शिरकाव नव्हे धोक्याची घंटा; ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज, सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक

Next

- सागर नेवरेकर

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी परिसरालगतच्या मनुष्यवस्तीमध्ये बिबट्या दाखल होत असल्याच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांपासून वाढ होत आहे. भक्ष्याच्या शोधात येथे बिबट्या दाखल होत असल्याचे प्राणिमित्र संघटनांचे म्हणणे असले तरीदेखील बिबट्यांचे हल्ले होऊ नयेत म्हणून प्रशासन ढिम्म आहे. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून यापूर्वी अनेक वेळा बिबट्यांच्या हल्ल्याबाबत लगतच्या परिसरात जनजागृती करण्यात आली आहे. मात्र मनुष्यप्राण्याने केलेली जंगलांची तोड, कमी होत असलेले वन क्षेत्रफळ असे अनेक मुद्दे केंद्रस्थानी असून, यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. वाढते बिबट्याचे हल्ले ही धोक्याची घंटा असून, अतिक्रमण नक्की मनुष्याने केले की बिबट्याने याचाही तेवढ्याच प्राधान्याने विचार झाला पाहिजे. प्राणीप्रेमी, प्राणिमित्र संघटना आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने याबाबत आता पुढे येत यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.
अंधेरी येथील शेर-ए-पंजाब कॉलनीमधील ज्युनिअर क्राफ्टिंग नर्सरी शाळेच्या एका वर्गामध्ये रविवारी सकाळी सात वाजता बिबट्या मादीने प्रवेश केला. शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला. जवळच्या मैदानातून काही वेळ फिरून नर्सरीच्या वर्गात ती शिरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्या मादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव पथक आणि ठाणे वनविभाग अधिकाºयांची २५ जणांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तिला पकडण्यासाठीची सर्व तयारी करण्यात आली. त्यानंतर दिवभराच्या प्रयत्नानंतर तब्बल १२ तासांनी सायंकाळी ६.३० वाजता टीमने या बिबट्या मादीला पकडले. परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. भविष्यात तरी बिबट्याच्या हल्ल्यापासून कसे वाचता येईल किंवा बिबट्याचा हल्ला होऊ नये म्हणून काय काय करता येईल, याबाबत प्रशासन बोलते झाले असून, अशाच काहीशा सुरक्षाविषयक सूचनांचा आढावा ‘लोकमत’ने घेतला आहे.

जागोजागी कॅमेरे
वनविभागाने जागोजागी कॅमेरे लावलेले आहेत. त्यात एखादा प्राणी आढळला तर त्याला वनविभागाची रेस्क्यू टीम पकडते. मात्र यासाठी लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. लोकांनीसुद्धा गैरप्रकार टाळले पाहिजे.

कुत्र्यांच्या शोधात बिबट्या
आपण खाद्यपदार्थ फेकतो. मग भटकी कुत्री ते खाद्यपदार्थ खातात. कुत्र्यांना शोधत बिबट्या येतो. बिबट्याचे आवडते भक्ष्य श्वान आहे. मानवी वस्तीमध्ये हजारोंच्या संख्येने भटके श्वान दिसतात. कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी आलेला बिबट्या हा काही वेळा लहान मुलांवर हल्ला करत असतो. समजा जर कोणत्याही प्रकारचे भक्ष मिळाले नाही तर एखादा प्राणी येथे कशाला येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

सीसीटीव्हीमुळे पकडणे झाले सोपे
नर्सरीमध्ये सीसीटीव्ही असल्याने वर्गाच्या बाहेर जमलेले वनाधिकारी त्यांच्या मोबाइलमधून आतमधल्या बिबट्या मादीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्याचा वापर करत शिताफीने वनाधिकारी आणि प्राणिप्रेमींनी बिबट्याला पकडले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग शहराच्या मध्यभागी आहे. वनविभागाच्या सभोवताली ३ कोटी २९ लाख लोक वास्तव्याला आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी आणि ठाणे वनविभाग या ठिकाणी नागरिकांचे वास्तव्य आहे.
उद्यानाच्या बाहेर बिबट्या का येतो? याचीसुद्धा कारणे उद्यान प्रशासन शोधते आहे. मुळात कुठलाही प्राणी बाहेर का येतो? याचे कारण त्याला भक्ष्य मिळत असते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, फिल्मसिटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक आहे. या भागाचा अभ्यास केला, तर शेकडोच्या संख्येने भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात आढळतात.
उद्यान परिसरात हजारो वर्षांपासून बिबट्या वास्तव्य करतो. ज्या क्षेत्रात हल्ले होत आहेत, ते क्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच असलेल्या वस्तीमधील आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच बिबट्याचा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये बिबट्याचा अधिवास हा असणारच.
आपण खाद्यपदार्थ फेकतो. मग भटकी कुत्री ते खाद्यपदार्थ खातात. कुत्र्यांना शोधत बिबट्या येतो. समजा, जर कोणत्याही प्रकारचे भक्ष मिळाले नाही, तर एखादा प्राणी येथे कशाला येईल, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.
बिबट्याचे हल्ले सायंकाळच्या वेळेला होतात. हल्ल्यामध्ये एखादे लहान मूल सापडलेले असल्याचे वारंवार ऐकायला मिळते. लहान मुलांकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होणे, मुलांपासून दूर जाणे याचा फायदा घेत, बिबट्याने हल्ला केला आहे.
बिबट्याच्या क्षेत्रात वावरत असताना एक काळजी घ्यायची असते. आवाज करत चालणे, सायंकाळच्या वेळी जाण्याचे टाळणे, लहान मुलांना घेऊन न जाणे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.

चाळीसगावला आम्ही ८ तारखेला गेलो होतो. आम्ही तेथून निघत असतानाच मुंबईमध्ये बिबट्या घुसल्याचा कॉल आला. ठाणे वनविभागाचे अधिकारी आधीच पोहोचले होते. तेव्हा तेथे शहानिशा सुरू होती. दरम्यान, आम्ही ४.३० वाजता घटनास्थळी पोहोचलो. जागेची पाहणी करण्यात आली. तसेच मादी घुसल्याचे फोटोग्राफ होते. तिला कोणत्याही प्रकारची दुखापत न करता बाहेर काढले. साधारण ती दोन वर्षांची आहे. आता बिबट्या मादीची प्रकृती बरी आहे.
- शैलेश देवरे,
वन अधीक्षक, बचाव पथकाचे प्रमुख, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

बिबट्या मादी सकाळी ७ च्या सुमारात एका क्लासमध्ये शिरली होती. त्या वेळेस आम्ही चाळीसगावला होतो, घटना कळल्यावर त्वरित निघालो. सायंकाळी सहाच्या सुमारास वनविभागाची टीम पोहोचली. दरम्यान, मादीला पकडण्यासाठी दोन इंजेक्शन बंदुकीच्या साहाय्याने मारले गेले. परंतु दोन्ही बेंचला लागून खाली पडले. तिसरा इंजेक्शन तिला लागला. काही वेळाने ती खाली झोपली. मग तिला सलाइन लावण्यात आले. तसेच एका कपड्यात गुंडाळून तिला बाहेर आणले गेले. दरम्यान, तिच्या बॉडीचे चेकअप करण्यात आले. त्यानंतर तिला गाडीत ठेवून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले गेले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. आता ती पहिल्यापेक्षा चांगली आहे. सोमवारी बिबट्या मादीने पाणी व अन्न खाल्ले आहे. आता तिची प्रकृती चांगली आहे.
- डॉ. शैलेश पेठे, पशूवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

अंधेरी परिसरात बिबट्या घुसल्याचा सकाळी मला फोन आला. त्यानंतर वनविभागाला माहिती देऊन घटनास्थळी दाखल झालो. पोलिसांनी आधीच कडक बंदोबस्ताची व्यवस्था केली होती. बिबट्या मादीने मैदानाच्या बाजूने एका इमारतीत प्रवेश केला. इमारतीच्या बाजूला असलेल्या छोट्याशा जागेतून आत गेली. दरम्यान, अधूनमधून मादीच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. कालांतराने नर्सरीचा मालक आला. त्याच्या मोबाइलवरून सीसीटीव्ही फुटेज पाहून मादी कोणत्या दिशेला आहे, हे समजले. ज्या ठिकाणाहून मादी पळू शकते त्या जागेवर जाळी लावून परिसर बंद करण्यात आला. तसेच अग्निशामक दलालादेखील बोलावले होते. आरे कॉलनीतून महाकाली गुंफेच्या येथून मादी आलेली असावी, असे मला वाटते.
- सुनिश कुंजू, वन्यजीवरक्षक, पॉज

मुंबई आणि ठाणे परिसरात बिबट्याचा वावर पूर्वीपासून आहे. वाढत्या लोकसंख्येचादेखील परिणाम आहे. रस्ता चुकलेले, भक्षाच्या शोधात असलेले असे प्राणी मानवी वस्तीमध्ये येतात. माणसांवर हल्ला करण्यासाठी प्राणी येत असल्याचा प्रकार अजून तरी आपल्याकडे घडलेला नाही. अंधेरीमध्ये पकडलेली मादी ही वयाने लहान आहे. आरे कॉलनीच्या परिसरामध्ये याआधीदेखील दिसलेली आहे. जेव्हा अंधेरीमध्ये सापडली तेव्हा तिने काहीच खाल्लेले नव्हते. कदाचित दोन ते तीन दिवस पाणी प्यायलेले नव्हते. ती थकलेल्या स्थितीमध्ये आणि भरकटलेल्या अवस्थेमध्ये आलेली आहे. ज्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आहे त्या परिसरात आपण कॅमेरे लावले आहेत. कॅमेºयाद्वारे सतत पाहणी करत असतो. एखाद्या वेळेस मानवी वस्तीमध्ये बिबट्या पाहण्यात आला तर लोकांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. तसेच बचाव पथक रात्रीच्या वेळेस जाऊन बिबट्यापासून कसे रक्षण करावे, हे सांगितले जाते.
- डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवन संरक्षक,
ठाणे वनविभाग

Web Title: No danger of leopards; Need for implementing a concrete action plan, everyone must take the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई