No Confidence Motion : बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 07:39 AM2018-07-20T07:39:17+5:302018-07-20T07:42:22+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टोला हाणला आहे.

No Confidence Motion : Uddhav Thackeray's comment on no trust motion against bjp government | No Confidence Motion : बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

No Confidence Motion : बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Next

मुंबई - विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला आहे. या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. पण ठराव संमत होण्याची शक्यता अजिबातच नाही. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टोला हाणला आहे. ''सगळा माणुसकीशून्य कारभार सुरू आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठीच डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही. बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही. जनता सर्वोच्च आहे!'',अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?
लोकसभेत मोदी सरकारवर विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. त्यावर चर्चेचा गडगडाट होईल. आरोप-प्रत्यारोपांच्या विजा कडाडतील. शेवटी पंतप्रधान मोदी हे कुरुक्षेत्रावरील युद्ध जिंकल्याच्या थाटात नेहमीच्या पद्धतीने भाषण करतील. भाजपकडे आकडय़ांचे बहुमत आहे. त्यामुळे मतदानानंतर सरकार पडेल असा विचार कोणी करीत नाही. सोनिया गांधी यांनी सांगितले आहे, ‘आकडा आमच्याकडेही आहे.’ राजकारणात सैन्याचा आत्मविश्वास जागविण्यासाठी अशा गर्जना कराव्या लागतात. सरकार पाडण्याइतका आकडा आपल्याकडे नाही हे विरोधकांना माहीत आहे, पण विरोधकांनी आणलेला हा अविश्वास ठराव सरकार पाडण्यासाठी नसून मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांची सालटी काढण्यासाठी आहे. संसदेत सरकारवर हल्लाबोल होईल व त्या आरोपांना तीच बुळबुळीत उत्तरे देऊन बाकडी वाजवून घेतली जातील. त्यामुळे लोकशाही मूल्यांचे नेहमीप्रमाणे जतन वगैरे होईल. मुळात सध्या बहुमताचा अर्थ लोकभावनांची कदर असा नसून बहुमतवाल्यांची दडपशाही असा बनला आहे. लोकांना स्वप्ने दाखवायची. श्रद्धा आणि भावनांना हात घालून मते मागायची व लोकांनी एकदा भरभरून मतदान केले की हे सर्व चुनावी जुमले कधीही स्वच्छ न होणाऱ्या गंगेत बुडवून टाकायचे. जाहीर सभांना होणारी गर्दी व त्यातून उठणाऱ्या उन्मादी आरोळय़ा म्हणजेच राज्य करणे असे कुणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. मुळात सध्याच्या सरकारने जे बहुमत किंवा विश्वास प्राप्त केला तोच संशयास्पद आहे. ज्या विजयावर प्रश्नचिन्ह आहे त्यांनी बहुमताची भजने गाऊ नयेत. 
प्रचंड पैसा, सत्तेची दडपशाही आणि मतदान यंत्रांची हेराफेरी हीच विजयाची त्रिसूत्री असेल तर लोकशाहीचे फक्त बुजगावणेच आपल्या देशात उभे आहे व या बुजगावण्याच्या अस्तित्वासाठी लढाईचा खणखणाट आता सुरू आहे. लोकसभेत विरोधकांचा अविश्वासदर्शक ठराव स्वीकारल्याबद्दल आता स्वतःचीच पाठ थोपटून घेतली जात आहे, पण हा ठराव स्वीकारणे ही सरकारची मजबुरी होती. नाहीतर हे अधिवेशनसुद्धा गोंधळात वाहून गेले असते. आता प्रश्न असा विचारला जात आहे की, विरोधकांची एकजूट दिसेल काय? विरोधकांची एकी ठेवणे हे सोनिया गांधींपुढचे आव्हान आहे. हाच प्रश्न ‘एनडीए’ नामक टांग्याच्या रथावर स्वार झालेल्यांनाही विचारला जाऊ शकतो. भाजपकडे स्वतःचा आकडा मोठा आहे, पण ज्यांनी हा अविश्वास ठराव आणलाय ते ‘तेलगु देसम’वाले कालपर्यंत ‘एनडीए’च्या गोटात होते. ते का सोडून गेले? महाराष्ट्रात ज्यांनी दुधाचे आंदोलन पेटवले आहे ते राजू शेट्टीही ‘एनडीए’चेच पालखीवाहक होते ना? इतर हवशा, नवशा आणि गवशांचे सोडा हो, ज्या शिवसेनेने पडत्या काळात भाजपला साथ दिली, हिंदुत्वासाठी भाजपचे नगारे वाजवले ती शिवसेनाही कागदावर ‘एनडीए’सोबत आहे. पण पंचवीस वर्षे साथ देणाऱ्या शिवसेनेवर अविश्वास दाखवून यापुढे ‘आमचे आम्हीच’ हा जो तोरा मिरवला तो तोराही शेवटी उतरलाच ना? देशभरातील पोटनिवडणुकांत पराभव होताच सुटलेल्या लेंग्याच्या नाडय़ा आवळीत‘युती’चे वीणावादन नव्याने सुरू झाले. 
पण ‘बुंद से गयी वो हौद से नही आती.’ खरे म्हणजे ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या विकृतीने केलेले राज्य लोकांच्या अविश्वासाला पात्र ठरले आहे. प्रश्न कश्मीरचा असेल नाही तर जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवण्याचा, महागाईचा असेल नाही तर आमच्या नाणार प्रकल्पग्रस्तांचा, सर्व स्तरांवर जनतेच्या पाठीत फक्त खंजीरच खुपसले गेले. सत्य बोलणे हा देशद्रोह ठरतो, पण विश्वासघात करणे, जनतेला गंडवणे हा शिष्टाचार ठरत आहे. जगात आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो. ठीक आहे, पण त्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेने आमच्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारातून सोडवलेले नाही. त्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेने कश्मीरातील शेकडो जवानांचे हौतात्म्य रोखलेले नाही. नाणारमधील रिफायनरीचे गॅस चेंबर रोखा असे ओरडून सांगणाऱ्या जनतेच्या छाताडावर बंदुका रोखणारी अर्थव्यवस्था हुकूमशाहीच्या मार्गाने जाणार असेल तर त्यावर फुले उधळण्यापेक्षा आम्ही जनतेच्या न्यायासनासमोर उभे राहून पापक्षालन करू. ज्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत गरीबांना, बेरोजगारांना स्थान नाही ती अर्थव्यवस्था काय कामाची! येथे बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे ‘कसाई’ राज्य करतात. सगळा माणुसकीशून्य कारभार सुरू आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठीच डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही. बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही. जनता सर्वोच्च आहे!

Web Title: No Confidence Motion : Uddhav Thackeray's comment on no trust motion against bjp government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.