'मुंबई दर्शना'च्या नावाखाली लूट, महानगरीचं नाव होतंय बदनाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:26 AM2018-01-25T02:26:37+5:302018-01-25T10:04:14+5:30

राज्यातच नव्हे, तर देश-परदेशातून मायानगरी मुंबईला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी येथे धडकत असतात. मुंबईतील पर्यटनस्थळांच्या माहितीअभावी असंख्य पर्यटक ‘मुंबई दर्शन’ नामक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आधार घेतात.

 National Tourism Day: Plunder in the name of 'Mumbai Darshan' | 'मुंबई दर्शना'च्या नावाखाली लूट, महानगरीचं नाव होतंय बदनाम

'मुंबई दर्शना'च्या नावाखाली लूट, महानगरीचं नाव होतंय बदनाम

Next

राज्यातच नव्हे, तर देश-परदेशातून मायानगरी मुंबईला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी येथे धडकत असतात. मुंबईतील पर्यटनस्थळांच्या माहितीअभावी असंख्य पर्यटक ‘मुंबई दर्शन’ नामक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आधार घेतात. मात्र, शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या धूळखात पडलेल्या प्रस्तावामुळे, खासगीरीत्या मुंबई दर्शन घडविणाऱ्या पर्यटन एजन्सींकडून पर्यटकांची लूट होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी मुंबई दर्शन सहलीत प्रत्यक्ष सहभागी होत रिअ‍ॅलिटी चेकच्या माध्यमातून उघडकीस आणले आहे. पर्यटनाच्या नावावर बहुतेक गाइड्स आणि कंपन्या मुंबईची प्रतिमा मलीन करत असल्याचेही या रिअ‍ॅलिटी चेकमधून समोर आले आहे. हजारो रुपये गोळा करूनही पर्यटकांना पर्यटनस्थळाच्या नावावर धावती भेट घडविली जाते. हा गोरखधंदा उघडपणे सुरू असतानाही प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. या संदर्भात तक्रार करायची तरी कुणाकडे? असा सवाल मनात घेऊन पर्यटक केवळ रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून ‘मुंबई दर्शना’च्या नावावर पर्यटकांना लुटणाऱ्या कंपन्यांची झाडाझडती होणार का, दोषी कंपन्यांवर कारवाई करणार का, असे अनेक प्रश्न या रिअ‍ॅलिटी चेकने निर्माण केले आहेत.

मुंबईची चुकीची ओळख
कंपन्यांनी नेमलेल्या गाइड्सकडून पर्यटकांना येथील हेरिटेज वास्तूची आणि पर्यटनस्थळांची माहिती देताना सकारात्मक गोष्टी कमी सांगितल्या जातात. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची ओळख या ठिकाणी झालेल्या आंतकवादी हल्ले आणि बॉम्बस्फोटाची माहिती देऊन केली गेली. धक्कादायक बाब म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाची ओळख संजय दत्तचे ‘ससुराल’ अशी करण्यात आली.

दिवसाला लाखो रुपयांची करचोरी-
एका गाडीत ३५ ते ४० पर्यटक बसवून प्रति माणसी ६०० ते १ हजार रुपये उकळण्यात येत होते. अशा प्रकारे एक गाडी दिवसाला २५ ते ३० हजार रुपयांचा गल्ला जमवते. या ठिकाणी एकाच कंपनीच्या ५ गाड्यांपासून ४० गाड्यांचा ताफा असल्याचे दिसले. पर्यटकांकडून ६०० ते १ हजार रुपये आकारल्यानंतरही, त्यांना केवळ ट्रॅव्हल्सची १५० ते २५० रुपयांची बसण्याच्या जागेची पावती दिली जाते. याउलट उरलेल्या रकमेचा कोणताही पुरावा दिला जात नाही. त्यामुळे येथे लाखो रुपयांची करचोरीही होत असल्याचे दिसते.

पर्यटकांचा अनुभव वाईट!
राज्यातील खासकरुन मुंबईतील पर्यटक मलेशिया, सिंगापूर, दुबई येथे पर्यटनासाठी नित्याने सध्या जातात. या देशांमध्ये, शहरांमध्येही सिटी टूर असतात. तथापि, या देशांमधील सिटी टूर आणि वाहनांचा दर्जा मुंबईतील दर्जाशी तोलला तर त्यात प्रचंड तफावत असल्याचे काही पर्यटकांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

दुरून दर्शन
जैन मंदिर, हाजीअली दर्गा, माउंट मेरी चर्च ही पर्यटनस्थळे पर्यटकांना गाडीमधूनच दाखविली जातात, तर बॉलीवूड सेलिब्रिटींच्या बंगल्यांचेही दुरूनच दर्शन घडविले जाते. त्यामुळे पर्यटकांना धड डोळे भरून दर्शन तर घेता येत नाहीच, मात्र पर्यटनस्थळांची खरी माहितीही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे दिसले.

‘राम भरोसे’ दर्शन!
मुंबईतील नामांकित मंदिरांमधील एक असलेल्या महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक मंदिरांच्या दर्शनाचा समावेश मुंबई दर्शन ट्रीपमध्ये केला जातो. मात्र, या ठिकाणी पोहोचल्यावर पर्यटकांना दर्शनाच्या रांगेत उभे केले जाते. त्यानंतर, दर्शन घेण्याची जबाबदारी पर्यटकांवर सोडून दिली जाते. त्यामुळे कित्येक पर्यटकांना दर्शनापासून वंचित राहावे लागते. महत्त्वाची बाब म्हणजे, या मंदिरांबाबतची कोणतीही माहिती पर्यटकांना दिली जात नाही.

पर्यटन काळात एमटीडीसी ठप्प!
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) गाड्या मुंबईतील दादर आणि नरिमन पॉइंट येथून शनिवार आणि रविवारी सुटतात, परंतु जानेवारी महिन्यामध्ये एमटीडीसीच्या गाड्या बंद आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव पर्यटक खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल्सची वाट धरत आहेत.

नेहरू तारांगण
मुंबईमधील विज्ञानाची पुरेपूर माहिती देणारे स्थळ म्हणून नेहरू तारांगणची ओळख आहे, पण नेहरू तारांगणमध्ये काय बघावे, हे न सांगताच एक तासाचा अवधी देऊन पर्यटकांना स्वत:च फिरण्याचा सल्ला दिला जातो. याच वेळेमध्ये पर्यटकांनी जेवण करणे अपेक्षित असते. त्यामुळे खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मालकांनी इतक्या चांगल्या पर्यटनस्थळाचे पैसे कमावण्याचे केंद्र बनविले आहे.

अशी चालते लूट
खासगी पर्यटन कंपनी मुंबईतील ३२ ठिकाणे दाखविण्याचा दावा करते. मात्र, त्यातील ६ ते ७ ठिकाणे प्रत्यक्ष दाखवली जातात, तर इतर ठिकाणे दुरूनच गाडीत बसल्या जागेवरून पाहण्यास सांगितले जाते. एमटीडीसीकडून मुंबई दर्शनासाठी एका व्यक्तीचे एक हजार रुपये प्रमाणे शुल्क आकारले जाते. याउलट खासगी टुर्सवाल्यांकडून मनमानी लूट केली जात आहे.

शंकांचे निरसन नाहीच
भाऊचा धक्का या पर्यटनस्थळाची सफर घडवताना गाइड बोटीबाहेरच थांबतो, तर पर्यटकांना माहिती देण्यासाठी आॅडिओ स्वरूपात टेप वाजविली जाते. त्यामुळे पर्यटकांच्या कोणत्याही शंकेचे निरसन केले जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, पर्यटकांप्रमाणेच या वेळी त्यांची सुरक्षाही वाºयावरच असल्याचे दिसते.

पर्यटकांची देवाण-घेवाण
शहरासह उपनगरात खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल्स् कंपन्यांत मोठी साखळी तयार झाली आहे. खासगी कंपन्या या एकमेकांशी जोडल्या गेल्याने, मोठ्या प्रमाणात पर्यटकांची देवाण-घेवाण केली जात असल्याचे रिअ‍ॅलिटी चेकमध्ये निदर्शनास आले.

गेटवे आॅफ इंडियाला भेट : मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया गेटवे आॅफ इंडियाची पर्यटकांना गाइडकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. त्यामुळे पर्यटकांपर्यंत गेटवे आॅफ इंडियाचा खरा इतिहास पोहोचतच नाही.

समुद्रकिनाऱ्यांची कुप्रसिद्धी-
बहुतेक पर्यटकांनी आयुष्यात प्रथमच समुद्र पाहण्यासाठी मुंबईला भेट दिली होती. मात्र, मुंबई दर्शनाच्या या सफरमध्ये पर्यटकांना नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, वरळी सीफेस, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, बँडस्टँड हे किनारे दुरूनच दाखविण्यात आले. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांची कोणतीही माहिती पर्यटकांना दिली जात नाही. याउलट समुद्रकिनारी बसणाऱ्या तरुणाईचा सरसकट प्रेमी युगुल म्हणून उल्लेख करून, समुद्रकिनाऱ्यांची कुप्रसिद्धी केली जात असल्याचे दिसले. संतापजनक बाब म्हणजे, किनाऱ्यांवर उतरणे सोडाच, मात्र चालू गाडीतून पर्यटकांना किनारे दाखविणाऱ्या गाइड्सने गाडी थांबविण्याचेही सौजन्य दाखविले नाही. या दर्शन यात्रेतील शेवटचा स्टॉप असलेल्या जुहू चौपाटीवर तर पर्यटकांना रात्रीच्या वेळेस नेण्यात आले. त्यामुळे चौपाटीवरील समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याचा आनंद पर्यटकांना लुटता आला नाही. याबाबत बहुतेक पर्यटकांनी नाराजीही व्यक्त केली.

पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर
मुंबई दर्शनासाठी विविध देशांतून आणि राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांशी नम्रतेने बोलले जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, बहुतेक पर्यटनाच्या स्थळांवर गाइड्सकडून पर्यटकांना मोकळेच सोडले जाते. पर्यटकांनी स्वत:हून संबंधित ठिकाणी फिरण्याच्या सूचना देणारे गाइड्स त्यांच्या सुरक्षेकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचे निदर्शनास आले.

मुंबईहून गोवा ‘बेस्ट’!
राजस्थानवरून आलेल्या पर्यटकांनी मुंबई दर्शनाच्या तुलनेत गोवा दर्शनाला अधिक पसंती दर्शविली. येथील तुलनेत गोवा दर्शनामध्ये गाइड्सकडून विविध ठिकाणी थांबून माहिती देण्यात आल्याचा दावा पर्यटकांनी केला.

Web Title:  National Tourism Day: Plunder in the name of 'Mumbai Darshan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.