पालिका अधिका-याकडे कोट्यवधीचा खजिना? महिन्याला ७० लाखांचा हफ्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 07:38 AM2017-12-31T07:38:54+5:302017-12-31T07:39:08+5:30

महिन्याला ७० लाखांचा हफ्ता, ठाण्याच्या उच्चभ्रू वसाहतीत ३ बीएचके फ्लॅट आणि गावाकडे कोट्यवधीची जागा ही फक्त मोघम संपत्ती. मात्र याहूनही जास्तीचा खजिना कमला मिल आग प्रकरणामुळे बदली झालेल्या साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळेकडे असल्याची माहिती मुलुंडमधील काही बार आणि हॉटेल व्यावसायिक सूत्रांकडून समोर येत आहे.

 Municipal Corporation's billions of treasures? Week of Rs 70 lakh per month | पालिका अधिका-याकडे कोट्यवधीचा खजिना? महिन्याला ७० लाखांचा हफ्ता

पालिका अधिका-याकडे कोट्यवधीचा खजिना? महिन्याला ७० लाखांचा हफ्ता

Next

- मनीषा म्हात्रे
मुंबई : महिन्याला ७० लाखांचा हफ्ता, ठाण्याच्या उच्चभ्रू वसाहतीत ३ बीएचके फ्लॅट आणि गावाकडे कोट्यवधीची जागा ही फक्त मोघम संपत्ती. मात्र याहूनही जास्तीचा खजिना कमला मिल आग प्रकरणामुळे बदली झालेल्या साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळेकडे असल्याची माहिती मुलुंडमधील काही बार आणि हॉटेल व्यावसायिक सूत्रांकडून समोर येत आहे. यापूर्वी सपकाळे मुलुंड टी वॉर्डमध्ये कार्यरत होते. तेथून त्यांची बदली जी-दक्षिणमध्ये करण्यात आली आहे. कमला मिल आग प्रकरणात पालिका आयुक्तांचेही कुंपण मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळेच स्वत:ला वाचविण्यासाठी मेहतांनी सपकाळेंना निलंबित न करता त्यांची बदली केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मूळचे जळगावचे रहिवासी असलेले सपकाळे मार्च महिन्यापासून जी-दक्षिणमध्ये साहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. यापूर्वी तीन वर्षे त्यांनी मुलुंड ‘टी’ विभागात साहाय्यक आयुक्त म्हणून भूमिका बजावली. पदभार स्वीकारल्यानंतर कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून नगरसेवकांमध्ये त्यांचा धाक बसला. मात्र बार आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी हे चित्र वेगळेच होते. कारवाईच्या भीतीने प्रत्येकाकडून महिना १ लाखाचा हफ्ता त्यांना दिला जाई. अशा एकूण ७० बारमालकांकडून ७० लाख महिन्याला त्यांच्यापर्यंत पोहोचविले जात असल्याची माहिती मुलुंडमधील काही बार आणि हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात आली. अनेकदा मी स्वत: पैसे एकत्रित करून पुरविल्याचेही व्यावसायिकाचे म्हणणे आहे. त्यांची ठरलेली माणसे येऊन पैसे घेऊन जायची. येथीलच एक कर्मचारी त्यांच्याच वशिल्यावर जी-दक्षिण विभागात रुजू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सपकाळे यांचे उत्पादन शुल्क विभागात नातेवाईक आहेत. सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांसोबतही त्यांचे चांगले लागेबांधे असल्याने त्यांना कुणाची भीती नसल्याची चर्चाही मुलुंडमधील व्यावसायिक गटात होती. त्यांनी याच पैशांतून ठाण्यातील एका उच्चभ्रू वसाहतीत अंदाजे २ कोटी किमतीचा ३ बीएचके फ्लॅट घेतला आहे. शिवाय त्यांनी गावाकडेही खूप सारी जागा विकत घेतली आहे. त्यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर संपत्ती असून एसीबीने याबाबत अधिक खोलवर तपास केल्यास ही माहिती उघड होईल, असेही काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
जी-दक्षिण विभागात साहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर सपकाळेंनी कमला मिलकडे
मोर्चा वळविला होता. त्यांच्याकडून वेळोवेळी कारवाई झाली.
कमला मिलच्या आगीत भस्मसात झालेला मोजोस् आणि वन अबव्हला वरिष्ठांचा आधार होता. २३ आॅगस्ट रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता निरीक्षकांमार्फत मोजोस्ची पाहणी केली. त्या
वेळी त्यांना तेथे ध्वनिप्रदूषण
तसेच जेवणाच्या ठिकाणीच
नशा केली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबत संचालक
युग पाठकला नोटीस बजाविण्यात आली होती. १२ तासांच्या आत
अवैध धंदे बंद करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यावर कारवाईसाठी सपकाळेने पुढाकार घेतला होता. मात्र आयुक्त अजय मेहता यांनीच याबाबत काढता पाय घेण्यास सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच या आग प्रकरणानंतर सपकाळे यांचेही निलंबन होणे गरजेचे असताना त्यांची फक्त बदली करण्याचा आव आणत स्वत:लाच सुरक्षित करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे चौकशीअंतीच यामागील सत्य उघड होईल.

आरोप खोटे...

मी ओएनजीसीमध्ये कार्यरत होतो. त्यातील पैशांतूनच मी ठाण्यातील फ्लॅट विकत घेतला आहे. शिवाय माझ्याकडे कुठलीही बेनामी संपत्ती नाही. मुलुंडमध्ये वॉर्ड अधिकारी असताना मी कधीच कुणाकडून पैसे घेतले नाहीत.
७० लाख रुपये घेणे हा विनोदाचाच भाग असू शकतो. माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. तसेच मोजोस् आणि वन अबव्हवर कारवाईसाठी पुढाकार घेणारा मी एकमेव अधिकारी आहे.
वेळोवेळी तोडक कारवाईबरोबरच जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना नोटीसही बजाविण्यात आली होती. त्यामुळे माझ्यावरील सर्व आरोप खोट असल्याचे प्रशांत सपकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मनावरील घाव कधी भरणार?


मुंबई : पार्टी, डिनर, बर्थडे, गेट-टुगेदर, नववर्षाचे प्लानिंग अशा सेलीब्रेशनसाठी गेलेल्या जिव्हाळ्याच्या माणसांना कमला मिल आग प्रकरणात अचानक गमवावे लागल्याने मृतांचे कुटुंबीय आणि जखमींच्या मनावर कधीही पुसता न येणारे घाव झाले आहेत. या घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांच्या डोळ्यांसमोरून ही घटना, किंचाळण्याचे आवाज, चहूबाजूला पसरलेला धूर, आगीचे लोट हे भीषण चित्र सरतच नाही आहे. त्यामुळे शरीरावरचे घाव भरतीलही कदाचित पण मनावरच्या जखमा कधी पुसणार, हा प्रश्न निरुत्तरित आहे.
शहर-उपनगरातील विविध रुग्णालयांत कमला मिल आग प्रकरणातील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ताडदेव येथील भाटिया रुग्णालयात दाखल असलेल्या तीन रुग्णांना शनिवारी घरी सोडण्यात आले आहे. तर ३० टक्के भाजलेल्या एका रुग्णाची प्रकृती स्थिर असून अन्य एका रुग्णावर त्वचारोपण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
याशिवाय, एका रुग्णाची प्रकृती गंभीर असून त्यात सुधारणा झालेली नाही. तो रुग्ण ३० ते ३५ टक्के भाजला आहे. दोन्ही हात, डोके आणि पाठीलाही भाजल्याच्या जखमा आहेत. या रुग्णाच्या भाजल्याच्या जखमा खोल असल्याने प्रकृती अत्यवस्थ आहे, अशी माहिती रुग्णालयाचे प्लॅस्टिक सर्जन डॉ. अशोक शहा यांनी दिली. या रुग्णाला कोलेजन ड्रेसिंग देण्यात येत असून प्रतिजैविकांचा डोस सुरू करण्यात आला आहे.

Web Title:  Municipal Corporation's billions of treasures? Week of Rs 70 lakh per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.