मुंबईकरांना मिळणार पावसाचा अचूक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 01:35 AM2019-06-08T01:35:29+5:302019-06-08T06:12:35+5:30

१४० पर्जन्यमापक केंद्रे : मुंबईत २, ठाण्यात १, नवी मुंबईत १ रडार बसणार

Mumbaikars will get the exact forecast of rain | मुंबईकरांना मिळणार पावसाचा अचूक अंदाज

मुंबईकरांना मिळणार पावसाचा अचूक अंदाज

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पडणारा पाऊस मोजण्यासाठी मुंबई महापालिकेची ६० स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे कार्यान्वित असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून आणखी ८० स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे बसविण्यात येणार असून त्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे याव्यतिरिक्त हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यासाठी ठाण्यात एक, नवी मुंबईत एक आणि मुंबईत दोन रडार बसविले जाणार असून, रडारचा फायदा पुढील पावसाळ्यात मुंबई महानगर प्रदेशाला (एमएमआर) होणार आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग, मुंबई महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि इंडियन मेटेरोलॉजिकल सोसायटी (मुंबई विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दुपारी २ वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या सभागृहात प्रसारमाध्यमांसाठी आयोजित कार्यशाळेत मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मान्सून संदर्भातील अद्ययावत उपकरणांबाबत माहिती देण्यात आली आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले
की, मान्सूनदरम्यान कोणताही आपत्कालीन प्रसंग ओढावल्यास हवामान खाते नागरिकांना स्थलांतरित करू शकत नाही, पण हवामानासंबंधी इत्थंभूत माहिती संबंधित विभागांना प्रदान करत नागरिकांचे जीव वाचवू शकतो.

आपल्या सर्वांसमोर काही मर्यादा असून, काही आव्हानेही आहेत. मात्र त्यावर उपाय योजले जात आहेत. विज्ञान बदलत आहे; तसे आपणही बदलत आहोत. हवामान खाते प्रथमत: राज्यस्तरावर हवामानाची इत्थंभूत माहिती देत होते. त्यानंतर जिल्हास्तरीय हवामानाची इत्थंभूत माहिती देण्यावर भर देण्यात आला आणि आता विभागीय स्तरावर म्हणजे (ब्लॉक लेव्हल) हवामानाची इत्थंभूत माहिती दिली जात आहे.

मुंबई महापालिकेची आजघडीला ६० स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे कार्यान्वित असून, हवामान खात्याकडून ८० स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे उभारली जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे केंद्राचे काम केवळ पावसाळ्यात होते असे नाही तर उर्वरित ऋतूंमध्येही या केंद्रांचा फायदा होतो. मुंबई समुद्रकिनारी वसली असून, येथील हवामान दमट असले तरी येथील काही भाग हे उष्ण आहेत. परिणामी याची माहितीही केंद्राद्वारे मिळण्यास मदत होईल, असेही होसाळीकर यांनी सांगितले.

एमएमआरडीएचे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पावसाळी तक्रारींचे निवारण करण्यासाठी १ जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. २६५९१२४१, २६५९४१७६, ८६५७४०२०९० आणि १८००२२८८०१ (टोल फ्री) या दूरध्वनी क्रमांकांवर मदत मिळू शकणार आहे. हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार असून तेथे प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी
२४ तास उपस्थित राहणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

प्राधिकरणाचे प्रकल्प राबवित असलेल्या परिसरामध्ये पावसाळ्यात होणारी वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी या नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी प्रकल्पांचे काम सुरू असलेल्या भागात पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी घेणार आहेत.

सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात पाणी साचणे, झाडांची पडझड होणे, अपघात, वाहतूककोंडी अशा अनेक कारणांसाठी नियंत्रण कक्षाकडून मदत मिळू शकते. संभाव्य अपघात किंवा दुर्घटनेची आगाऊ माहिती नागरिकांनी नियंत्रण कक्षाला कळविल्यास त्याचेही स्वागत केले जाईल, अशी माहिती प्राधिकरणाचे सह प्रकल्प संचालक जनसंपर्क दिलीप कवठकर यांनी दिली.

हवामानाची माहिती मिळणार अ‍ॅपवर : जून महिन्याच्या अखेरीस मुंबई वेदर लाइव्ह अ‍ॅपही सेवेत येणार असून, यासंदर्भातील आदेश निघाले आहेत. याचा फायदा मुंबईकरांना होणार असून, यावर हवामानाची इत्थंभूत माहिती मिळेल, असा दावा हवामान खात्याने केला आहे.

रडार नेमके काय करते?
मुंबईचे हवामान सातत्याने बदलत असते. मान्सूनमध्ये मुंबईसह लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतो. अशा वेळी ५० किलोमीटरच्या परिघातील चित्र अर्थात हवामानाचा अंदाज रडारद्वारे हवामान खात्याला मिळू शकतो. म्हणजे पुढील चार ते सहा तासांत जेथे कोठे मुसळधार पाऊस कोसळणार असेल तेथील नागरिकांना रडारद्वारे हवामानाची इत्थंभूत माहिती दिली जाईल आणि याद्वारे होणारी हानी रोखता येईल. तर सॅटेलाइटचा वापर अधिक कालावधीतील माहिती देण्यासाठी केला जातो.

Web Title: Mumbaikars will get the exact forecast of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.